ज्वारीच्या एका पेंढीस विक्रमी तीस रुपये भाव

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

चिचोंडी, जि. नाशिक : ज्वारीचे आगर अशी ओळख असलेल्या या पट्ट्यात यंदा ज्वारीचे क्षेत्र कमालीचे घटल्याने या वर्षी ज्वारीचा चारा शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सुकलेल्या चाऱ्याच्या एका पेंढीस तीस रुपये असा दर मोजावा लागत असून, या वर्षी ज्वारी चारा भावाचा हा उच्चांक मानला जात आहे. ज्वारी पीक कमी झाल्याने आता खाण्यासाठी ज्वारीबरोबरच जनावरांसाठी ज्वारीचा चारा (कडबा) शोधण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.

या वर्षी पावसाने सरतेशेवटी हात दिला. मात्र वर्षातून दोन ते तीन पीकपद्धतीने शेतकऱ्याने आपले जीवनमान उंचावले असून, खास ज्वारीसाठी पावसाळ्यात सोडले जाणारे शेत (गव्हाळीचे रान) आता शेतकरी ठेवत नसल्याने पाच ते दहा वर्षांपूर्वी ज्वारीच्या पिकाने व चाऱ्याने पिवळेधमक चमकणारे या परिसरातील चित्र आता दिसत नाही. या परिसरातील पाचशे हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र करडई व ज्वारीसाठी असायचे, मात्र यात मोठी घट झाली असून, या वर्षी हे क्षेत्र पंचवीस हेक्‍टर असे झाले आहे.

चिचोंडी गावाच्या परिसरात किमान शंभर हेक्‍टरवर ज्वारी असायची. या वर्षी केवळ दहा एकर क्षेत्रावरच ज्वारी दिसून आली. पीक कमी असल्याने परिणामी या पिकांची नासाडी पक्ष्यांनी केली. शेतकऱ्यांना धान्यापेक्षा चारा हवा असल्याने शेतकऱ्यांनी पक्षी हाकलण्याची तसदी घेतली नाही. इतर नगदी पिकांकडे शेतकरी वळण्याने आता ज्वारीच्या आगरातच शेतकऱ्यांना ज्वारीचा चारा (कडबा) उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. 

परिसरात ज्वारीच्या चाऱ्याला तीन हजार रुपये शेकडा असा उच्चांकी भाव झाला आहे. म्हणजे एक चारा पेंढी (जुडी) तीस रुपयांना विकली जात आहे. याउलट परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद, कन्नड तालुक्‍यांत असून, इकडे पंधराशे रुपये असा भाव चाऱ्याला आहे. काही शेतकरी या भागातून ज्वारी चारा मिळवत आहेत. 

येवला तालुक्‍यातील मुखेड परिसर हा पूर्वीपासून ज्वारीचे आगर म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथील उंच वाढलेला, स्वच्छ, जास्त पानांचा फुटवा असलेल्या सुकलेल्या चाऱ्याला मोठी मागणी असते. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून येथील चाऱ्याला दर वर्षीच चांगली मागणी असते. ठाणे व शहापूर येथील गोठा, तबेल्यांचे मालक येथील चारा घेऊन जातात. मात्र दोन ते तीन वर्षांपासून या परिसरातील शेतकरी चाऱ्याच्या शोधार्थ फिरत असल्याचे दिसून येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com