नांदेड, परभणी, हिंगोलीत ३३ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी लटकली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने केली जाणारी तूर खरेदी मंगळवारी (ता. १५) बंद झाल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या ३३ हजार ९७ शेतकऱ्यांची तूर खरेदी लटकली आहे. मंगळवार (ता. १५) पर्यंत या तीन जिल्ह्यांमध्ये २९ हजार ८१ शेतकऱ्यांची ३ लाख ४५ हजार १२६ क्विंटल तूर खरेदी झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या तीन जिल्ह्यांमधील अनेक खरेदी केंद्रांवर अपुरी गोदाम व्यवस्था तसेच बारदान्याअभावी हरभरा खरेदी ठप्प राहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. गेल्या १० ते १२  दिवसांपासून बंद असलेली सेलू येथील हरभरा खरेदी सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मानवत येथील केंद्रावरील हरभरा खरेदी पावसामुळे बुधवार (ता. १६) पासून बंद आहे. बारदान्याभावी अर्धापूर (जि. नांदेड) येथील केंद्रांवरील खरेदी बुधवारी (ता.१६) बंद होती. खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध करून दिला जाणार असल्याने खरेदी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यामधील नांदेड (अर्धापूर), हादगाव, किनवट, भोकर, धर्माबाद, बिलोली, नायगांव, देगलूर, मुखेड, लोहा या दहा केंद्रांवर २८ हजार १७० शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार २८२ शेतकऱ्यांची १ लाख ८० हजार १५६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. अजून १० हजार ८८८ शेतकऱ्यांची तूर खरेदी राहिली आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी गंगाखेड, पूर्णा या सात केंद्रांवर नोंदणी केलेल्या २० हजार २८२ शेतकऱ्यांपैकी ५४९३ शेतकऱ्यांची ९३ हजार ७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. 

अद्याप १४ हजार ७८९ शेतकऱ्यांची खरेदी शिल्लक आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव या पाच केंद्रावर १३ हजार ७२६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु प्रत्यक्षात ६,३०६ शेतकऱ्यांची ७१ हजार ९६३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या ६२ हजार १२८ शेतकऱ्यांपैकी २९ हजार ८१ शेतकऱ्यांची ३ लाख ४५ हजार १२६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, ३३ हजार ९७ शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप राहिले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com