अपरिहार्यतेत विष वापरा; पण उताराही जमिनीत निर्माण करा

जळगाव ः जमीन सुपीकता चर्चासत्राचे बुधवारी कांताई सभागृहात उद्‌घाटन करताना महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर. सोबत डावीकडून सकाळच्या खानदेश आवृत्तीचे सहयोगी संपादक विजय बुवा, ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण.
जळगाव ः जमीन सुपीकता चर्चासत्राचे बुधवारी कांताई सभागृहात उद्‌घाटन करताना महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर. सोबत डावीकडून सकाळच्या खानदेश आवृत्तीचे सहयोगी संपादक विजय बुवा, ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण.

जळगाव  ः पाणी, खतांच्या अनियंत्रित वापराने जमिनीमधील सेंद्रिय कर्ब घटत आहे. उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. जमिनीमधील सेंद्रिय घटक निर्माण करण्यासाठी जमिनीतून मिळणारे अवशेष शेतातच गाडा, ते आहे त्याच जागी कुजवा. अनेकदा मजूरटंचाई व इतर कारणांमुळे तणनाशके किंवा इतर विषाचा वापर जमिनीत करावा लागतो, परंतु या विषाचा उतारा किंवा जैविक विघटन करणारे घटक जमिनीत निर्माण करा. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे रक्षण केले नाही तर पुढे विष मारक ठरेल, असे मत ॲग्रोवनतर्फे बुधवारी (ता.३०) आयोजित जमीन सुपीकता चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले. 

कांताई सभागृहात हे चर्चासत्र झाले. यूपीएल हे या चर्चासत्राचे प्रस्तुतकर्ते असून, राईज एन शाईन हे त्याचे सहप्रायोजक आहेत. चर्चासत्रात पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडिकर, ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रीय शेतकरी पुरस्काराने सन्मानित प्रभाकर चौधरी (धुळे) व कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी, मशागतीविना शेतीचा मंत्र देणारे प्रताप चिपळूणकर यांनी मार्गदर्शन केले. ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.

सकाळच्या खानदेश आवृत्तीचे सहयोगी संपादक विजय बुवा व व्यवस्थापक संजय पागे यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वालनाने कार्यक्रमास सुरवात झाली. 

जमीन सुपीकता हा अतिशय गंभीर प्रश्‍न आहे. जमिनीचे आरोग्य चांगले असले, तरच पुढे चांगले उत्पादन येईल. जमीन सुपीकतेबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता यावी, या दृष्टीने ॲग्रोवनने २०१८ हे जमीन सुपीकता वर्ष म्हणून जाहीर केले असून, राज्यभर चर्चासत्रांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडली. 

पिकासह जमीन सुपीकतेच्या  मागेही लागा ः प्रताप चिपळूणकर शेतकऱ्यांनी पिकांचे उत्पादन अधिकाधिक घेण्यासह जमीन सुपीक कशी राहील, याकडेही लक्ष दिले पाहिजे. अलीकडे मजूरटंचाई आहे. शेणखत किंवा बाहेरून सेंद्रिय खत आणण्यासाठी हवा तसा निधी नसतो, परंतु शेतात जे पिकाचे अवशेष असतात तेच शेतात कसे कुजतील यासाठी काम करावे. नांगरणी न करता आपल्या भागाला अनुरूप अशी पीकपद्धती स्वीकारली पाहिजे. केळीचे पीक घेतले की त्याचे अवशेष फेकून न देता, ते न जाळता शेतातच कुजविले पाहिजेत. केळी घेतल्यानंतर त्यात तूर किंवा कापसाचे पीक कुठलीही मशागत न करता घेता येईल. आमच्या भागात उसात मशागत न करता भाताचे पीक घेण्याचे यशस्वी प्रयोग आम्ही केले आहेत. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढल्याचे लक्षात आले. पिकांना अन्नद्रव्य पुरविणारा व जमिनीतील सेंद्रिय घटक कुजविणारा, असे गट शेतात वाढले पाहिजे. तण जमिनीला मोठ्या प्रमाणात सेंद्रिय घटक पुरविते. तणनाशके शेतात वापरून कुठलीही कोळपणी, आंतरमशागत न करता पिके चांगल्या पद्धतीने घेणे शक्‍य आहे. अपरिहार्यता म्हणून तणनाशके वापरता येतील, परंतु तणनाशकांमधील विषाचे जैविक विघटन करणारे सूक्ष्मजीव आपल्या शेतात तयार व्हायला हवेत, असे मार्गदर्शन प्रताप चिपळूणकर यांनी केले. 

पालापाचोळा, माती, पाणी  शेतातच हवे ः डॉ. हरिहर कौसडीकर जमिनीतून आपण जे घेतो त्यातील ३० टक्‍के भाग जमिनीला अवशेष किंवा पालापाचोळ्याच्या रूपाने परत केला पाहीजे. जे पाणी जमिनीत पडते ते जमिनीतच थांबले पाहिजे. मातीचे संवर्धन केले पाहिजे. गुणवत्तापूर्ण, चांगले जीवन जगण्यासाठी जमिनीचे बिघडलेले आरोग्य सुधारायला हवे. आपल्याला जेवढे वर्ष जमिनीचे आरोग्य खराब करायला लागले तेवढेच दिवस जमिनीची सुपीकता निर्माण करायला लागतील. जमिनीच्या आरोग्यावरच पशुधनासह माणसांचे आरोग्य अवलंबून आहे, असे मत डॉ. हरिहर कौसडिकर यांनी व्यक्त केले. 

रसायनमुक्त शेती करणे  सोपे ः प्रभाकर चौधरी मी २००२ पासून रसायनमुक्त शेती करीत आहे. कीडनियंत्रणासाठी दशपर्णी अर्क व शेतात पिकांना जीवामृत देतो. गांडूळखताची निर्मिती निंबाच्या झाडाखालच्या दाट सावलीत करतो. बांधावर वृक्षांचे संगोपन केले आहे. त्यासाठी खर्च लागत नाही. याचा अनुभव आला आहे. शेती ही आई आहे, तिला विष देऊ नका, असे कळकळीचे आवाहन धुळे येथील प्रभाकर चौधरी यांनी केले. ॲग्रोवनने जमीन सुपीकतेच्या महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. विषमुक्त अन्न तयार करण्याचा संकल्प करायला हवा. शेती रसायनांशिवाय करता येते, असेही चौधरी म्हणाले. यूपीएलचे प्रतिनिधी अमोल आंधळे यांनी कंपनीच्या झेबा तंत्रज्ञानाची माहिती दिली. झेबा हे बुरशीनाशक किंवा खत नसून, ते जमिनीला भुसभुशीत ठेवणारे नैसर्गिक उत्पादन आहे. मक्‍याच्या शुद्ध टार्चपासून ते तयार होते. ते अन्नद्रव्यांचे ग्रहण करून पिकाला किंवा झाडाला त्याचा पुरवठा करण्याचे काम प्रभावीपणे करते. जी अन्नद्रव्ये शेतात टाकली जातात, त्यांचा कार्यक्षम वापर झेबा तंत्रज्ञानामुळे होतो. ते ड्रीपद्वारे देता येत नाही, असे मुद्दे अमोल आंधळे यांनी सांगितले. 

राईज एन शाईन बायोटेकचे मार्केटिंग मॅनेजर नीलेश अडसूळ यांनी आपल्या कंपनीच्या ऊतिसंवर्धित केळी रोपांच्या वापरातून निर्यातक्षम उत्पादन येत असल्याची माहिती दिली. पुण्यासह हैदराबाद, रावेरपर्यंत हार्डनिंग युनिट आहेत. गुजरातमध्ये राईज एन शाईन बायोटेकच्या केळी रोपांचा वापर करणारे शेतकरी स्वतः निर्यात करू लागल्याचेही अडसूळ म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com