...अन् वाजवडचा पाणीप्रश्न सुटला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : सोशल नेटवर्किंग फोरम जलाभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पेठ तालुक्यातील वाजवड गावाला टँकरमुक्त करणारी पाणीपुरवठा योजना गावकऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाड्याचा पाणी प्रश्न सोडविल्यानंतर पेठ तालुक्यातील वाजवड गावाचे ग्रामस्थ फोरमच्या पदाधिकाऱ्यांना भेटले आणि गावाची समस्या मांडली. त्यानंतर गावाची प्रत्यक्ष पाहणी करून फोरमच्या सदस्यांनी फेब्रुवारीत वाजवडचे काम हाती घेतले.

अतिशय दुर्गम भागात असलेल्या दरीतील विहिरीपर्यंत वीज पोहोचवण्याचे तसेच डोंगर चढणीतून पाइपलाइन आणण्याचे काम करून अखेर वाजवडकरांच्या दारात पाणी पोहोचविण्यात सोशल फोरमला यश मिळाले. या प्रकल्पाचे गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.     

अतिशय डोंगराळ प्रदेशात वसलेले वाजवड हे गाव उंचावर वसलेले आहे. पाण्यासाठी गावात प्रचंड हाल आहेत. कधीतरी टँकर येतो. दरीत असलेल्या विहिरीतून डोंगर पायवाटेवरून पाणी आणावे लागते. ही परिस्थिती पाहून इंजिनिअर प्रशांत बच्छाव आणि भूगर्भ शास्रज्ञ डॉ. जयदीप निकम यांनी त्या विहिरींची पाणी क्षमता तपासली. तेथून पाइपलाइनने गावात पाणी आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गावात पाण्याची टाकी बांधण्याची जबाबदारी ग्रामपंचायतने घेतली.

सोशल मीडियावर गावाची परिस्थिती पोस्ट करताच प्रतिसाद मिळाला. डॉ. अप्पासाहेब पवार, डॉ. पंकज भदाणे, डॉ. विकास गोर्हे, डॉ. आनंद तांबट, डॉ. रवींद्र शिवदे यांनी ५० हजार रुपयांची मदत दिली. त्यानंतर डॉ. माधवी गोरे मुठाळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नवी मुंबई येथील एम.जी.एम. मेडीकल कॉलेजच्या १९९८ बॅचने एक लाख रुपये दिले. उर्वरित निधी सोशल नेटवर्किंगच्या देणगीतून उभा राहिला. अशाप्रकारे केवळ अडीच लाख रुपयांत वाजवडचा पाणीप्रश्न सुटला.

सोशल नेटवर्किंग फोरम सातत्याने आदिवासी ग्रामीण भागातील गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवत आहे. लोकसहभाग वाढल्यास अजून काही गावांचा पाणीप्रश्न सोडवण्याचा आमचा मनोदय आहे. - प्रशांत बच्छाव, सदस्य, सोशल नेटवर्किंग फोरम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com