साखर कारखान्यांना सौर वीजनिर्मितीपासून का रोखले?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांना सौर वीजनिर्मितीपासून का रोखण्यात आले आहे, असा सवाल करीत विस्मा अर्थात वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी, "शासनाने आपली मानसिकता बदलून सौर ऊर्जेसाठी कारखान्यांना परवानगी दिल्यास ग्रामीण भागात भरपूर गुंतवणूक व रोजगार निर्मिती होईल, असे स्पष्ट केले. 

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट (डीएसटीए) असोसिएशनच्या मुख्यालयात उभारण्यात आलेल्या भव्य सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते. साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी बटण दाबून प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. या वेळी डीएसडीए अध्यक्ष मानसिंगराव जाधव उपस्थित होते. 

श्री. ठोंबरे म्हणाले की,"साखर कारखान्यांना सौर ऊर्जा निर्मितीची परवानगी शासनाने दिल्यास कारखान्यांची पडीक जमीन वापराखाली येईल. त्यातून ग्रामीण भागात गुंतवणुकीचा ओघ सुरू होईल. त्यामुळे कारखान्यांबरोबरच ग्रामीण भागाचाही विकास होणार असून रोजगार निर्मितीची संधीही उपलब्ध होतील. मात्र, त्यासाठी शासनाला आपली मानसिकता बदलावी लागेल."नॅचरल शुगर कारखान्याने काही वर्षांपूर्वी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता.

तथापि, वीज मंडळाच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पातील दर आणि प्रत्यक्ष कारखान्यांमधील बगॅसपासून तयार होणारी वीज यात तफावत होती. त्यामुळे कारखान्यांना सौर ऊर्जा निर्मितीला परवानगी अजूनही दिली जात नसल्याचे या वेळी श्री. ठोंबरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील साखर कारखान्यांना सौर ऊर्जा निर्मितीमध्ये संधी मिळवून देण्यासाठी डीएसटीएने शासनाकडे चर्चेसाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी सर्व कारखाने पाठिंबा देतील, असेही श्री. ठोंबरे यांनी नमूद केले.

साखर आयुक्त श्री. कडूपाटील या वेळी म्हणाले की, "सौर ऊर्जा निर्मितीचे चांगले युनिट उभारून डीएसटीएने साखर कारखाना क्षेत्रात स्तुत्य प्रयोगाला सुरवात केली आहे. यामुळे पर्यावरणाची हानीदेखील टळणार असून अतिरिक्त वीज शासनाला देखील उपलब्ध होणार आहे."

२० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या डीएसटीएच्या या प्रकल्पाची किंमत अवघ्या साडेतीन वर्षांत वसूल होणार आहे. या वेळी डीएसटीएचे उपाध्यक्ष एस.एस. गंगावती, मानसिंगभाई पटेल, बी. डी. पवार, कार्यकारी संचालक डॉ. एस. एम. पवार, विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, ऊस तज्ज्ञ संजीव माने तसेच राज्यातील विविध कारखान्यांचे अधिकारी उपस्थित होते. 

सौरऊर्जेतील इनव्हर्टर तंत्रज्ञानात बदल डीएसटीएच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे समन्वयक श्रीकांत शिंदे यांनी या वेळी सादरीकरण केले. डीएसटीएने ३५० वॉटचे ५५ पॅनेल्स बसविले असून त्यात पारंपरिक स्ट्रींग इनव्हर्टरऐवजी आधुनिक मायक्रो इनव्हर्टर बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे पॅनेलवर सावली आल्यास, पक्षी बसल्यास एकूण क्षमता कमी न होता ऊर्जानिर्मिती होते. २००६ मध्ये अमेरिकेच्या इन्फेस कंपनीने इनर्व्हटर तंत्रज्ञानात बदल आणले असून त्याचा वापर भारतात अजूनही सुरू झालेला नाही. मात्र, पुढील वाटचालीत स्ट्रींग इनव्हर्टरचा वापर कमी होत जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com