कोकणवर अन्याय करणाऱ्यांची राखरांगोळी करू : उद्धव ठाकरे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाणार  : नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार; पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करू शकता; पण आमच्यातील देशभक्ती तुम्ही खरेदी करू शकणार नाही. कोकणवर अन्याय करणाऱ्यांची राखरांगोळी करू, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. २३) जाहीर सभेत दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कोकणला उद्ध्वस्त केलं, तर तुम्हाला उद्ध्वस्त करू. महाराष्ट्राच्या आणि कोकणच्या पवित्र भूमीत शिवसेना नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. त्यासाठी नाणारवासीयांची एकजूट कायम ठेवा. कोकणवासीयांच्या मुळावर उठणारा प्रकल्प कशाला? कोकणचं गुजरात होऊ देणार नाही. भूसंपादन होणार नाही म्हणजे प्रकल्पच होणार नाही. प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच गुजराती, मारवाड्यांनी इथे जमिनी कशा खरेदी केल्या? नाणारच्या जमिनी इतरांनी बळकावल्या, हा भ्रष्टाचारच असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, नाणार प्रकल्प कोकणात झाला नाही, तर नागपूरला द्या, असे भाजप आमदार आशिष देशमुख म्हणतात. मग तिकडे घेऊन जा. कोकण नाही तर विदर्भात हा प्रकल्प होऊ द्या. हा प्रकल्प आम्ही जनतेवर लादणार नाही, हे मुख्यमंत्र्यांचे शब्द होते. पण केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सौदी अरेबियासोबत सौदा केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला केराची टोपली दाखवली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीची किंमत दिली जात नसल्याची घणाघाती टीका या वेळी ठाकरे यांनी केली. 

 नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही ''अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही,'' असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. २३) दिले आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पासंबंधी भूसंपादनाची अधिसूचना रद्दच झाली नसल्याचे आता समोर आले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा हे उद्योगमंत्र्यांचे वैयक्तिक मत आहे. प्रत्यक्षात ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही. अशी अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार हा मुख्य सचिव समितीला असतो. मात्र, सध्या तरी अधिसूचना रद्द करण्याचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com