औरंगाबाद दूध संघाकडून उत्पादकांना ३० पैसे बोनस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला २०१६-१७ या आर्थिक वर्षांत ५०५ प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्थांनी दूध पुरवठा केला. यामध्ये शासन व इतर केंद्रांकडून दूध उत्पादक संघाकडे वर्षभरात तीन कोटी चार लाख सात हजार ७९४ लिटर दूध संकलन झाले असून यातून ९० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. यामुळे दूध संघाच्या सभासदांना प्रतिलिटर ३० पैसे बोनस मिळणार आहेत.

सोमवारी (ता. १८) झालेल्या दूध उत्पादक संघाच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय झाला. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून गत वर्षभरात अनुदानावर कडबा कटर वाटप, ५० टक्के अनुदानावर इको मिल्क वाटप, दूध तपासणी सयंत्र वाटप करण्यात आले आहे. यामुळे दूध उत्पादकांना फायदा झाला असून, गुणप्रतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती या वेळी संघाकडून देण्यात आली. जालना रोडवरील पाटीदार भवन येथे ही बैठक पार पडली.

या वेळी औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, कचरू मोहनराव डिके पाटील, पुंडलिकराव काजे, राजेंद्र जैस्वाल, गोकुळसिंग राजपूत, काकासाहेब कोळगे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. बागडे म्हणाले, वाढती स्पर्धा लक्षात घेता उत्पन्न वाढीसाठी उत्पादकांनी आता वितरणाकडे लक्ष द्यावे. संघाने काटकसर करीत ९० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवून दिला. पाच वेळा दर बदलले तरी दूध उत्पादकांचा फायदा व्हावा, यासाठी धोरणात्मक बदल केला नाही, असेही श्री. बागडे म्हणाले.

उत्पादकांनी आता दुधाची विक्री वाढविण्यावर भर द्यावा, दूध उत्पादकांनी विक्रेत्यांचीही भूमिका घ्यावी, पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा काढण्यासाठी संघाने आर्थिक तरतूद केलेली आहे, सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. बागडे यांनी केले.

दरम्यान सिल्लोड येथे शीतकरण केंद्रासह गांधेली दुग्ध शाळेचे आधुनिकीकरण, विस्तारीकरणाचे काम प्रगतिपथावर असून, वैजापूरसह कन्नड येथील जागेचा प्रश्‍न लवकरच निकाली लागेल, अशी माहिती उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com