वृक्ष ः नदीचे खरे संरक्षक

नदीकाठच्या वृक्षलागवडीने पात्रामध्ये माती वाहून जाण्याचे, गाळाने धरणे भरण्याचे प्रमाण कमी होते. वृक्षांची मुळे पाणी धरून ठेवतात, भूगर्भात पाणीसंचय वाढतो आणि हिवाळ्यात, उन्हाळ्यात नदी वाहत राहते.
विशेष लेख
विशेष लेख

भगीरथाने घोर तपश्‍चर्या केली आणि गंगानदी धरतीवर अवतरली. तिच्या पाण्याचा पहिला थेंब धरणीमातेच्या अंगावर पडण्याआधी तिने भगीरथाकडे दोन मागण्या केल्या होत्या. एक होती माझ्या दोन्हीही तीरांवर माझे हजारो लाखो वृक्ष भाऊ माझ्या रक्षणासाठी असावेत. दुसरी मागणी होती, माझ्या पाण्याचा उपयोग मानव आणि जीवसृष्टीच्या कल्याणासाठीच व्हावा. आज आपण गंगेचा गंगोत्री ते गंगासागर हा २५२५ कि.मी.चा पाच राज्यांमधून होणारा प्रवास पाहतो आणि मन खिन्न होऊन जाते. पुराणात वाचलेली आणि एका जल जागृत अभियानामध्ये सांगितलेल्या या गंगेच्या कथेची आम्ही सर्वांनी एकत्र येऊन वाताहात केली, हे उघड सत्य आहे.

गंगानदी स्वच्छता अभियानासाठी केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र खाते आणि त्यास एक मंत्री असावा, हे जगात कुठेही नाही. हे केवळ आपल्या देशामध्येच पाहावयास मिळते. गंगेची ही अवस्था तर बाकीच्या लहान-मोठ्या नद्यांचे काय, हा मोठा प्रश्‍न उभा राहतो. पूर्वी प्रत्येक गावात एक तरी वाहती नदी होती. गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये नदीचा वाटा फार मोठा होता. आता आम्हास गावाच्या चारही दिशांनी विकास दिसतो, पण नदी कुठेही दिसत नाही. मुसळधार पाऊस पडला, की कुठेतरी प्रचंड मोठा पूर येतो आणि आम्हाला आमची नदी सापडते.

भगीरथाने वचन दिल्याप्रमाणे गंगेच्या दोन्हीही तीरांवर प्रचंड वृक्षराजी होती. या वृक्षांनीच तिला माया दिली. प्रवासाचा मार्ग आखून दिला आणि भारतामधील कोट्यवधी लोकांची, प्राणिमात्रांची ती जीवनवाहिनी झाली. गंगेचाच आदर्श भारतवर्षामधील सर्व नद्यांनी पाळला. आज परिस्थिती फार वेगळी आहे. विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये भूपृष्ठावरील आणि भूगर्भामधील पाण्याचे अस्तित्व थेंबापर्यंत सीमित करण्यात आले आहे. आणि आम्हा सर्वांची थेंबा थेंबासाठी भटकंती सुरू झाली आहे. विकासाला जागा हवी म्हणून वृक्षांचा बळी गेला. नदी किनारे उघडे झाले आणि बहिण पोरकी झाली.

वाहती नदी आणि तिच्या दोन्हीही किनाऱ्यांवर गर्दी करून वाढणारे देशी वृक्ष हे एकेकाळी निसर्गाचे एक आगळे-वेगळे सौंदर्य होते. या सौंदर्यामागे वाहत्या नदीस जिवंत ठेवण्याचे केवढे तरी विज्ञान होते. नदी किनाऱ्यावर होणारी शेती, पावसाने वाहणारे पाणी आणि त्याबरोबर येणारी माती या वृक्षाद्वारे किनाऱ्यास अडवली जात असे. वृक्षांच्या पृष्ठभागालगत असलेल्या जाळीदार मुळांमध्ये मातीचे कण चिकटून रहात आणि वाळूचे कण नदीपात्रात वाहून जात. ही हजारो वर्षांची वाळूनिर्मितीची प्रक्रिया आता पूर्ण थांबली आहे.

नदीपात्रामधून वाहत जाणारे दगड, गोटे घर्षणामुळे वाळूनिर्मिती करतात. त्याच पद्धतींनी शेतातसुद्धा खडक, दगड-धोंड्यांपासून माती तयार होत असते, हे विज्ञानच आम्ही विसरलो आहोत. नदीकाठावरचे वृक्ष तोडून त्या ठिकाणी आम्ही रासायनिक शेतीस सुरवात केली, उत्पन्न वाढले, पण रासायनिक खतांमुळे जमीन हलकी झाली आणि थोड्या पावसामध्ये खरवडून गेली, सगळी माती वाहून नदीमध्ये गेली आणि प्रवाह थांबू लागला. वाळूचा स्रोत संपल्यामुळेच नदीचे वाहणे थांबले हे कटू सत्य आहे. नदीकाठावर वृक्ष असते तर असे कधीही घडले नसते.

लहानपणी आम्ही गुडघ्याच्या वर पाण्यामधून नदी ओलांडून तिच्या काठाच्या जंगलामधून शेतात जात असू. आता कोरड्या नदीमधून प्लॅस्टिक, घाण पाण्यांची डबकी चुकवत नदीस चिटकून असलेल्या शेतात जात आहोत. मोठ्या नदीकाठचे आमचे लहान शेत आता लहान नदीकाठचे मोठे शेत झाले आहे. नद्यांना जिवंत करण्याचे, त्यांना वाहते ठेवण्याचे विविध प्रयत्न शासकीय व सामाजिक पातळीवर सुरू आहेत. या प्रयत्नामध्ये नदीच्या दोन्हीही काठांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याची अतिशय गरज आहे. ही वृक्ष लागवड उगमापासून ते संगमापर्यंत हवी. यामध्ये नदीकाठच्या प्रत्येक गावांचा, युवकांचा, शिक्षणसंस्थांचा सहभाग असावा. अशी वृक्षलागवड वैज्ञानिक पद्धतीने व्हायला हवी. दोन वर्ष वयाची वृक्षबाळेच या लागवडीसाठी वापरली जावी. वृक्षलागवडीची कोटीची उड्डाणे तिही जिथे मोकळी जागा तेथे वृक्षारोपण करण्यापेक्षा नदीकाठांचे वृक्षारोपण निश्‍चित फलदायी आणि पुण्याचे कार्य आहे.

महाराष्ट्रात पहिले वृक्षलागवड संमेलन १७ सप्टेंबरला मुंबईमध्ये पार पडले. यामध्ये मुख्यमंत्री, वनमंत्री याचबरोबर ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव यांचा सहभाग होता. ‘रॅली फॉर रिव्हर’ या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील नद्यांच्या दोन्ही काठांवर ईशा फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या सहभागामधून वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेणार आहे. हा उपक्रम तर स्तुत्य आहे, पण त्यापेक्षाही मुख्यमंत्र्यांचे शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांना वृक्षलागवडीचे केलेले आवाहनही अतिशय मोलाचे वाटते. जेथे वाहती नदी असते, तेथे शाश्‍वत विकास असतो, हे आपणास नाइल, थेम्स, मिसिसिपी एवढेच काय पण आमच्या नर्मदा नदीनेसुद्धा दाखवून दिले आहे. नदीकाठी वृक्ष नसल्यास काय हाहाकार होतो हे ब्रह्मपुत्रेच्या रौद्र रूपाने आपणास पाहावयास मिळते.

नदी स्वच्छता मोहीम ही नेहमी उगमापासून करावयाची असते आणि याच टप्प्यावर वृक्षलागवडीस प्राधान्य हवे. नदीकाठच्या वृक्षलागवडीने पात्रामध्ये माती वाहून जाण्याचे, गाळाने धरणे भरण्याचे प्रमाण कमी होते. वृक्षांची मुळे पाणी धरून ठेवतात, भूगर्भात पाणीसंचय वाढतो आणि हिवाळ्यात, उन्हाळ्यात नदी वाहत राहते. वृक्षमुळांशी जिवाणूंची परिसंस्था तयार करण्यामध्ये मातीच्या कणांचा फार मोठा सहभाग असतो. मातीचे सूक्ष्म कण येथे अडकतात. वाळूचे लहान, मोठे कण नदीच्या वाहत्या पात्रात प्रवेश करतात.

वृक्षलागवडीमुळे नदीपात्रावर सावली रूपाने छाया तयार होते. पाण्याचे बाष्पीभवन कमी होते आणि नदीमध्ये जैविक साखळी तयार होण्यास मदत होते. नदी स्वच्छतेला खऱ्या अर्थाने सुरवात होते. जिथे पाणी आणि वृक्ष असतात, तेथेच पक्ष्यांची श्रीमंती पाहावयास मिळते. वृक्ष श्रीमंतीमधूनच हे शक्‍य आहे. नदी आणि वृक्षांचे एक आगळे-वेगळे नाते असते. वृक्षांना शाश्‍वत पाणीपुरवठा नदीकडून होतो आणि नदीच्या प्रवाहाचे रक्षण वृक्ष करतात. या दोघांचे एकत्र असणे हे मानवासह संपूर्ण सजीव सृष्टीच्या हिताचे आहे.

डॉ. नागेश टेकाळे  ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com