प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या दुःखाचा वापर दुर्दैवी ः डॉ. साळुंखे

डॉ. आ.ह. साळुंखे
डॉ. आ.ह. साळुंखे

नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात आले, हे गैर आहे. साहित्यिकांनी समाजाचे दुःख साहित्यात प्रखरपणे मांडत पीडितांच्या व्यथा, यातना सर्वांसमोर आणल्या पाहिजेत; परंतु यंदाच्या साहित्य संमेलनात निमंत्रण रद्दच्या घटनेनंतर बेअब्रू झाल्यानंतर साहित्यिकच प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या दुःखाचा वापर करतात, हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी रविवारी (ता. २०) येथे साहित्यविश्‍वावर आसूड ओढले.

अमृतमहोत्सवानिमित्त मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या होरायझन अकादमी सभागृहात डॉ. साळुंखे यांचा बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ‘मविप्र’च्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार अध्यक्षस्थानी होत्या. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, गोपाळ पाटील, प्रा. अर्जुन कोकाटे, प्रा. उल्हास पाटील, अर्जुन जाधव, नगरसेविका स्वाती भामरे, ‘मविप्र’चे संचालक सचिन पिंगळे आदी उपस्थित होते.

माणूस म्हणून माणसाला प्रतिष्ठा देण्याऐवजी वापरून फेकून दिले जाते. हे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी अगोदर निमंत्रण दिले असते तर शेतकऱ्यांप्रति संवेदना आहे, असे स्पष्ट झाले असते, अशा परखड शब्दांत डॉ. साळुंखे यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. 

व्यवसाय-उद्योग चालावेत म्हणून पगारवाढीतून वीस टक्के लोकांच्या हातात प्रचंड पैसा दिला जातोय. अशा वेळी शेतीवर अवलंबून असलेल्या ८० टक्के लोकांकडे पाहण्याची गरज नाही, असे मानले जाते. त्यातून देशात दरी तयार होत असून, विषमता वाढत आहे. देशाच्या ऐक्‍यावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी शेतकरी कुटुंबातून आलेल्यांनी आणि शिक्षण, ज्ञान, प्रतिष्ठा, सत्ता, आर्थिक क्षेत्रात संधी मिळालेल्यांनी मागे वळून पाहावे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घ्यावी. अडचणीतील माणसांना मदत करावी. तरच मार्ग निघेल, प्रकाश येईल, अंधार नाहीसा होईल हे ध्यानात ठेवून आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असेही आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे मी स्वागत करतो. कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही, हेही मान्य. पण कर्जमाफी या शब्दाला माझा आक्षेप आहे. शेतकरी भांडवल गुंतवून त्यास श्रमाची जोड देत पाचपट समाजाला देतात. म्हणूनच कर्जमाफी नव्हे, तर शेतकऱ्यांनी समाजासाठी घेतलेल्या कर्जाची फेड, असे संबोधायला हवे. 

शेतीला वाहिलेला सोहळा डॉ. साळुंखे यांचा गौरव सोहळा शेतीला वाहिलेला होता. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. शिक्षिका सारिका पारखी यांनी ‘बळीराजा तू आम्हाला हवा आहेस’ ही कविता सादर केली. ॲड. दौलतराव घुमरे, ॲड. आप्पासाहेब उगावकर, ॲड. अंजली उगावकर पाटील, ॲड. संतोष गटकळ, डॉ. भाऊसाहेब मोरे, ॲड. भास्करराव पवार, राजेंद्र भोसले आदी श्रोत्यांमध्ये उपस्थित होते. राजेश भुसारी यांनी सूत्रसंचालन केले.

शेतकरी संवादाची चळवळ पुन्हा सुरू ‘सकाळ’ आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या माध्यमातून तत्कालीन विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या सहकार्यातून शेतकऱ्यांशी संवादाचा कार्यक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला होता. ही चळवळ पुन्हा जिल्ह्यात सुरू करण्याचा शब्द श्रीमती पवार यांनी उपस्थितांना दिला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com