शेतकरीप्रश्नी एक जूनला राज्यव्यापी महाघेराव : अजित नवले

शेतकरीप्रश्नी एक जूनला राज्यव्यापी महाघेराव : अजित नवले
शेतकरीप्रश्नी एक जूनला राज्यव्यापी महाघेराव : अजित नवले

पुणे : शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळण्यासह शेतकऱ्यांच्या अकरा मागण्यांसाठी एक जून रोजी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांसमोर महाघेराव आंदोलन करण्याची घोषणा अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली. ‘‘राज्यातील सरकार लबाड आणि विश्वासघातकी आहे; पण शेतकऱ्यांच्या संतापाची आग आता भाजप मंत्र्यांच्या घरांपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही,’’ असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.  मुंबईत किसान सभेच्या राज्य कार्यकारिणीची दोनदिवसीय बैठक झाली. यात झालेल्या निर्णयाची माहिती डॉ. नवले यांनी पुण्यात दिली. ‘‘नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा लॉँग मार्च काढल्यामुळे आमच्या शेतकरी बांधवांचे व आया-बहिणींचे पाय रक्ताळले होते. सरकारने आम्हाला दीड महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आमचा विश्वासघात झाला असून, काहीही होताना दिसत नाही,’’ असा आरोप डॉ. नवले यांनी केला.  ‘‘शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारने काहीही पावले टाकली नाहीत. राज्य कृषी मूल्य आयोग भक्कम करण्यासाठी उपाय केले नाहीत. शेतकरी कर्जमाफी तसेच वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापनाचे आश्वासनदेखील पाळण्यात आलेले नाही. आश्वासने देणे मात्र त्याचे पालन न करण्याची प्रतिमा भाजप सरकारची तयार झालेली आहे. मात्र, आम्ही आंदोलन थांबविलेले नाही. टप्प्याटप्याने दीर्घकालीन आंदोलन करून आम्ही सरकारला वठणीवर आणू,’’ असे डॉ. नवले म्हणाले.  किसानसभेने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नाशिकमध्ये महामुक्काम आंदोलन केले, तसेच औरंगाबादला आक्रोश आंदोलन, वाड्यात महामोर्चा, ठाण्यात तिरडी आंदोलन, बुलडाण्यात आसूड मोर्चा तसेच मुंबईत लॉँग मार्च केला. मात्र, सरकार फसवणूक करते आहे. त्यासाठी देशातील दहा कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन पंतप्रधानांना पाठविले जाणार असून, त्यात २० लाख स्वाक्षऱ्या महाराष्ट्रातून पाठविल्या जाणार असल्याचे या वेळी त्यांनी स्पष्ट केले.  कर्जमुक्ती आणि जमीन आरोग्यासाठी लढू राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि काळ्या आईच्या म्हणजेच शेतजमिनीचे आरोग्य राखण्यासाठी शेतकरी कुटुंबातील प्रत्येक मुलाचा आम्ही पाठिंबा मिळवू. गाव, शहर, सीमेवर लढणारा शेतकरी जवान अशा प्रत्येक ठिकाणी असलेल्या शेतकरीपुत्राचा पाठिंबा आम्ही या लढ्यासाठी घेणार आहोत. शेतकरी जगला तर देश जगेल, याची महती पटलेल्या मानवतावादी कार्यकर्त्यांनादेखील बरोबर घेऊन आम्ही सरकारशी लढा देणार आहोत, असेही डॉ. नवले म्हणाले. सरकारची नियत साफ नाही  प्रत्येक वेळी आंदोलन करूनही राज्य सरकार आश्वासनापलीकडे काहीही करीत नाही. कारण, सरकारची नियत साफ नाही. आमचा विश्वासघात करीत राहिला तरी आंदोलने थांबणार नाहीत. दरवेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना चर्चेसाठी पाठविले जाते. महाजन आता सरकारची फायरब्रिगेड बनले आहेत. त्यांनी आम्हाला अजून ओळखलेले नाही. एकदा आग लागल्यावर पुन्हा लागू नये म्हणून महाजन यांनी काळजी घेणे आवश्यक होते. आता भाजप मंत्र्यांच्या घरापर्यंत आमच्या संतापाची आग गेल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. नवले यांनी स्पष्ट केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com