शेतीला पूरक उद्योगांची जोड आवश्‍यक : पालकमंत्री डॉ. पाटील

अकोला कृषी महोत्सव
अकोला कृषी महोत्सव
अकोला : पूर्वी शेती समृद्ध होती. काळानुरूप त्यात बदल झाला. आगामी काळात शेतीत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला पूरक उद्योगांची जोड द्यावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. 
 
आत्मा, कृषी विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे शुक्रवारी (ता.३०) डॉ. पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले होते. विभागीय सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा परिषद सभापती पुंडलिक अरबट, हरीश अलिमचंदानी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एस. रामामूर्ती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, आत्मा प्रकल्प संचालक एस. एल. बाविस्कर, पशू विज्ञान संस्थेचे डॉ. हेमंत बिराडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक उमेश ठाकरे या वेळी उपस्थित होते.
 
डॉ. पाटील म्हणाले, की सध्या शेतीत एका पिकाच्या भरवशावर राहणे शेतकऱ्यांना शक्‍य नाही. पूरक उद्योगाची शेतीला जोड असल्यास पीक आले नाही तरी कुटुंबाला आधार राहतो. शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने विविध योजना आखत आहे. या वर्षी वनशेतीला प्रोत्साहन देण्यात आले. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी गोपीनाथ मुुंडे अपघात विमा योजना राबवली जाते. हवामानविषयक सल्ला परिपूर्ण मिळावा, यासाठी मंडळनिहाय केंद्र निर्मिती केली जात आहे. खारपाण पट्ट्यातील गावांच्या विकासासाठी साडेचार हजार कोटींच्या नानाजी देशमुख प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
शासन विविध प्रकारे कामे करीत आहे. अशा स्थितीत कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठाने जबाबदारी घेत शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्यासाठी प्रवृत्त करावे. प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीची आरोग्य पत्रिका असली तर तो त्यादृष्टीने नियोजन करू शकेल. हे काम प्राधान्याने झाले पाहिजे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले,
 
कुलगुरू डॉ. भाले म्हणाले, की सध्या शेतकरी पुढे जात आहे. तो उद्योगशील बनला असून शेतीमालावर प्रक्रिया करू लागला आहे. सर्व यंत्रणा मिळून शेतीला आपण पूर्वीसारखे उत्तम बनवूयात. विद्यापीठाने खारपाणपट्ट्यात पीकबदलासाठी पुढाकार घेतला.
 
रब्बीत ज्वारी, बाजरी, करडई घेण्याकडे शेतकऱ्यांना वळविले जात आहे. येत्या हंगामात किमान ५०० शेतकरी रब्बी ज्वारीची लागवड करतील. विद्यापीठाकडे वाण, बियाणे, तंत्रज्ञान उपलब्ध असून ते शेतकऱ्यांपर्यंत पोचविले जाईल. करडई काढण्याचे यंत्र विद्यापीठ तयार करीत आहे. ओल्या हळदीपासून थेट पावडर तयार करण्याचे यंत्र विद्यापीठाने विकसित केले असून, त्याचा फायदा निश्‍चितच शेतकऱ्यांना होणार आहे.
 
एस. एल. बाविस्कर यांनी प्रास्ताविकात कृषी महोत्सवाची संकल्पना मांडली. सुभाष नागरे यांनीही मनोगत व्यक्त करीत कृषी विभागाच्या योजना, उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली.
 
जिल्हा कृषी महोत्सव सोहळ्याच्या उद्‌घाटन कार्यक्रमात खासदार संजय धोत्रे अध्यक्ष होते. मात्र ते आलेच नाहीत. याशिवाय आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, गोपिकिसन बाजोरीया, बळीराम सिरस्कार, प्रकाश भारसाकळे यांच्यापैकीही कुणीच उद्‌घाटनाला उपस्थित राहले नाही. सोहळ्यात खासदार, आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा होती. 
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com