प्राण्यांद्वारे होणाऱ्या आजारांपासून सावधान

प्राणिजन्य अाजार टाळण्यासाठी सतत जनावरांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.
प्राणिजन्य अाजार टाळण्यासाठी सतत जनावरांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

जनावरांपासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य, विषाणूजन्य, आदिजीवजन्य आणि बुरशीजन्य या प्रकारात विभागले जातात. असे आजार प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या पशुपालकाला होण्याची शक्यता असते. काही जिवाणू , विषाणू , परजीवी आहेत की जे पाळीव प्राणी, पक्षी, कुक्कुट पक्षी, जंगली प्राणी, उंदीर, घूस, पाल यांच्यामध्ये आढळतात. हे आपल्यामध्ये संक्रमण करू शकतात. अशा आजारांना शास्त्रीय भाषेत झुनोटिक किंवा प्राणिजन्य मानवीय आजार म्हणतात. पशुपालन किंवा जंगलात, कत्तलखाना, प्राणिसंग्रहालय, पाळीव प्राण्यांच्या दुकानात काम करणारे लोक तसेच पशुवैद्यकीय डॉक्टर अशा प्रकारच्या लोकांना झुनोटिक आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. जनावरांपासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य, विषाणूजन्य, आदिजीवजन्य आणि बुरशीजन्य या प्रकारात विभागले जातात. असे आजार प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या पशुपालकाला होण्याची शक्यता असते.

  • प्रत्यक्ष संपर्कामध्ये आजारी जनावराची लाळ, रक्त, विष्टा, श्लेष्मा, मूत्र इ. यांच्याशी संपर्क आल्यामुळे हे आजार होतात. आजारी जनावरांना फक्त स्पर्श केल्याने किंवा त्यांच्या चाव्याने सुद्धा हे आजार मानवास होऊ शकतात. जिवाणू किंवा विषाणूने दूषित झालेले अन्न, पाणी, दूध किंवा मांस याद्वारे सुद्धा असे आजार माणसास होऊ शकतात.
  • अप्रत्यक्ष संपर्कामध्ये आजारी जनावराचा वावर जेथे आहे किंवा होता अशा ठिकाणी संपर्क आल्यामुळे असे आजार होऊ शकतात. सद्य परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणिजन्य मानवीय आजार आढळून येतात, यामध्ये प्रामुख्याने क्षयरोग, रेबीज, सांसर्गिक गर्भपात, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, फाशी, पांढरी हगवण, लाळ्या खुरकूत, साल्मोनेलोसिस , लेप्टोस्पायरोसीस या आजारांचा समावेश होतो.
  • क्षयरोग 

  • हा आजार माणसामध्ये मायकोबॅक्टीरियम ट्युबरक्युलॉसिस (टीबी) तर जनावरांमध्ये मायकोबॅक्‍टेरियम बोवीस या जिवाणूमुळे होतो.
  • माणसांना दुधावाटे हा आजार प्रामुख्याने क्षयरोगग्रस्त जनावरांचे कच्चे दूध किंवा कच्च्या दुधापासून बनविलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे होऊ शकतो.
  • आजारी जनावरांच्या संपर्कात राहिल्यामुळे श्‍वासोच्छ्वासाद्वारे हा आजार होऊ शकतो.
  • लक्षणे श्‍वासोच्छ्वासास त्रास होणे, जुनाट खोकला, वजन कमी होणे, अशक्तपणा. उपाययोजना 

  • जनावरांची प्रयोगशाळेमध्ये क्षयरोगाची चाचणी करून आजार नसल्याची खात्री करून घ्यावी.
  • आजारी जनावर वेगळे करून त्याची योग्य तो औषधोपचार करून काळजी घ्यावी. आजार बरा झाल्याची खात्री झाल्यानंतरच गोठ्यातील जनावरांमध्ये मिसळावे.
  • क्षयरोग असलेल्या जनावराचे दूध सेवन करू नये.
  • कच्चे दूध पिल्यामुळे माणसांना क्षयरोग होत असल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे. त्यामुळे दूध उकळूनच प्यावे.
  • सांसर्गिक गर्भपात  

  • हा आजार ब्रुसेला अबॉर्टस नावाच्या जिवाणूमुळे होतो.
  • प्रयोगशाळेमध्ये या जिवाणूवर संशोधन करणाऱ्या व्यक्तींना या आजाराचे संक्रमण होण्याचा जास्त धोका असतो.
  • कत्तलखान्यात काम करणारे कामगार, मांस-वेष्ठित (पॅकेजिंग) करणारे कर्मचारी आणि प्राण्यांचे डॉक्टर हे सहज या जिवाणूच्या संपर्कात येऊन संक्रमित होतात.
  • आजाराचे वितरण हे संक्रमित प्राण्यापासून मिळणारे दूध किंवा मांस खाल्ल्याने होते. काही वेळा श्वासाद्वारा हवेमध्ये असणारे जिवाणू शरीरामध्ये गेल्याने त्वचेला संक्रमण झाल्याने आणि संक्रमित दुधाच्या भांड्याद्वारा मादी प्राण्याच्या कासेला संक्रमण झाल्याने होते.
  • संक्रमित प्राण्यांचा संपर्क त्वचेला झालेल्या जखमेला झाल्यास या आजाराचा प्रसार होतो.
  • लक्षणे  ताप येतो, गर्भपात होतो, अशक्तपणा, घाम येतो, डोकेदुखी, नैराश्य येते, स्नायू व शारीरिक वेदना. उपाययोजना 

  • जनावरे आणि गोठ्याची नियमित स्वच्छता, लसीकरण, प्राण्यांची चाचणी व संक्रमित प्राण्यांची कत्तल इ गोष्टीकडे लक्ष द्यावे .
  • गोठ्यात जनावरे बदलताना किंवा नवीन मागवताना विशेष काळजी घ्यावी.
  • संक्रमण झालेले प्लासेंटा (नाळ) व गर्भाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
  • कत्तलखान्यात काम करणारे कामगार, मांस-वेष्ठित (पॅकेजिंग) करणारे कर्मचारी व प्राण्यांचे डॉक्टर, तसेच सतत प्राण्यांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.
  • लेप्टोस्पायरोसिस 

  • हा आजार माणसाप्रमाणे जनावरांमध्येदेखील आढळून येतो. याचे जिवाणू हे पाणी, गोठ्यातील ओलावा, मूत्राचे डबके, ओली माती, दलदल इ. ठिकाणी बरेच महिने जिवंत राहू शकतात.
  • पीडित जनावराच्या लघवीद्वारे हे जिवाणू अनेक दिवस परिसर बाधित करतात.
  • उंदीर, घुशी आणि डुकरे या रोगाचे वाहक असून त्यांच्या मूत्राद्वारे या रोगाचे जिवाणू पाणी, पशुखाद्य व परिसरात प्रादुर्भाव करतात.
  • ज्या ज्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पाणी साठणे, पूर परिस्थिती निर्माण होणे, अथवा पाण्याचा निचरा होण्यास नैसर्गिक अडचणी निर्माण होतात, तेव्हा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तेव्हा पशुपालकांनी जागरूक राहून रोगप्रसार होणार नाही याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना करावी.
  • लक्षणे सडकून ताप येतो. (१०५ ते १०७ अंश फॅरानाईट), श्‍वासनास त्रास, कावीळ, रक्तक्षय, वासरात रक्तासारखी लाल लघवी, गाभण जनावरांत गर्भपात. उपाययोजना 

  • प्रक्षेत्रावरील उंदराचा तत्काळ नायनाट करावा.
  • खुराक, पशुखाद्याच्या पोत्यामध्ये उंदरांच्या संपर्कातून हे जिवाणू प्रवेश करतात. त्यामुळे पशुखाद्याच्या साठवणीच्या ठिकाणी उंदरांचे नियंत्रण करावे.
  • मल-मूत्राची योग्य विल्हेवाट करावी.
  • उंदीर, घुशी हे या रोगाचे प्रमुख वाहक असून त्यांच्या मूत्रातील जिवाणूद्वारे नाल्याचे पाणी, साचलेले पाणी, परिसर दूषित होतो. ते दूषित पाणी वाहत जाऊन दुसरीकडे रोग फोफावतो. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी.
  • त्वचेवरील उघड्या जखमांचा व विशेषतः पायावरील जखमांवर वेळेवर उपचार करावा. कारण दूषित पाण्यातील जिवाणू उघड्या जखमेद्वारे शरीरात प्रवेश करतात.
  • रेबीज ः

  • ऱ्हायाबडो व्हायरस या कुटुंबातील विषाणूमुळे हा आजार होतो. पिसाळलेला कुत्रा माणसाला चावला तर लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर मज्जातंतूद्वारे मध्यवर्ती मज्जासंस्थेत प्रवेश करतात. विषाणू वेगाने मेंदूत पसरतात.
  • रेबीजचे विषाणू रक्ताद्वारे मेंदूतून शरीरातील इतर महत्त्वाचे अवयव, उदा. यकृत, मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, फुफ्फुसे यात पोचतात.
  • लक्षणे ः

  • मज्जासंस्थेच्या पेशींचा नाश झाल्यामुळे बधिरपणा येतो.
  • तीव्र डोकेदुखी, ओकारी आल्यासारखी वाटते.
  • नाक, डोळ्यातून पाणी गळते, घशाला कोरड येते, जेवण जात नाही, पाणी पिणे बंद होणे आणि पाण्याची भीती वाटायला लागते.
  • जसाजसा हा विषाणू मेंदूचा ताबा घेतो तसेतसे क्लेशदायक झटके येतात. घेतलेले द्रव्यपदार्थ तोंडावाटे बाहेर पडतात. अखेरीस रोगी बेशुद्ध होतो.७ ते १० दिवसात मृत्यू पावतो.
  • उपाययोजना ः

  • कुत्रा किंवा इतर जनावर चावल्यानंतर जखम वाहत्या पाण्याखाली साबणाने स्वच्छ धुवावी.
  • साबणाने जखम स्वच्छ धुतल्यानंतर त्यावर जंतुनाशक लावावे. त्यानंतर ‘पोस्ट बाईट' लसीकरण करावे.
  • आपल्या पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करून घ्यावे.
  • कुत्रा, मांजराने बारीकसा चावा जरी घेतला किंवा त्यांचा दात लागला आणि रक्त आले तर त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करावी.
  • डॉ. वर्षा थोरात ः ८७७९२२७२६२ (सहायक प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com