दुध व्यवसायाच्या नफ्यात उत्पादक सोडून सर्वच सहभागी

दुध व्यवसायाच्या नफ्यात उत्पादक सोडून सर्वच सहभागी
दुध व्यवसायाच्या नफ्यात उत्पादक सोडून सर्वच सहभागी

कोल्हापूर : दिवस-रात्र राबायचे आणि दूध संघ म्हणा किंवा खासगी विक्रेता म्हणेल त्या दरात दूध देऊन निमूटपणे तोटा सहन करायचा हे अनिष्ट चक्र दिवसेंदिवस वाढत आहे. नफ्याच्या चर्चेत उत्पादक सोडून या व्यवसायातील इतर सर्व घटक सहभागी होत असल्याने ज्याच्या जिवावर हा व्यवसाय आहे, त्यालाच दुर्लक्षित करण्याचा प्रकार होत आहे.

राज्याच्या विविध भागांत वेगवेगळी परिस्थिती आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावरील दूध संघ प्रबळ आहेत. त्यांची या भागात मोनोपॉली आहे. तर अन्य भागांत जिथे संघ नाहीत तिथे खासगी विक्रेते आहेत. राज्याच्या दुर्गम भागातही हा व्यवसाय केला जातो. पण फायद्याचे गणित मात्र दुग्धोत्पादकांपर्यंत कधीच पोचत नाही. अनेक भागांत खासगी विक्रेते नीचांकी दर देऊन दुधाची खरेदी करत असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. गाय व म्हैस या दोन्ही बाबतीत अनेकांच्या साखळ्या निर्माण झाल्या आहेत. ज्या गायीच्या दुधाला फॅटनुसार २५ ते ३० रुपयांपर्यंत दर मिळायला हवा तोच दर १५ ते २० रुपये देऊन उत्पादकांची बोळवण केली जाते. तर म्हशीच्या दुधाला ३५ ते ४० रुपयांपर्यंत दर अपेक्षित असताना २५ ते ३० रुपयांपर्यंतच दर देऊन त्याला नुकसानीत ढकलले जाते.

कोणताही उत्पादक एखादे उत्पादन तयार करताना त्याचा दर तो ठराविक नफ्यासह ठरवितो. त्यानुसार त्या उत्पादनाची विक्री होते. पण दूध व्यवसायात मात्र हे चित्र कुठेच दिसत नाही. या उलट उत्पादन खर्चाइतकी रकमही मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. विशेष करून दूध संघांना जे शेतकरी दूध विक्री करतात त्यांचा दर दूध संघच ठरवितात. यामुळे दूध संघांना तोटा व्हायला लागला की दूध दर कमी करायचे अशी प्रथा अनेक दूध संघांची नित्याची झाली आहे. याचा थेट फटका उत्पादकांना बसत आहे.

खरेदी दर कमी केले तरी दुधाच्या विक्री दरात मात्र कपात होत नसल्याने दूध संघाकडून उत्पादकांसह ग्राहकाला लुबाडण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप उत्पादक व ग्राहकांचाही आहे. कोणताही दूध संघ नफ्यात घट करून व्यवसाय करीत नाही. नफा तितकाच ठेवून बाजारात तेजी-मंदी झाल्यास थेट उत्पादकांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या दरालाच कात्री लावण्यात येते. यामुळे गेल्या काही वर्षात गाय असो अथवा म्हैस दूध उत्पादकाला नफ्याचे सूत्रच सापडत नसल्याची स्थिती आहे. यामुळे कितीही दूध देणारी गाय असेल तरी एकूण हिशेब पाहिल्यास कधी तरी उत्पादन खर्चाइतपतच रक्कम अन्यथा तोटाच सहन करावा लागत असल्याचे शिवनाकवाडी येथील राजाराम पाटील या उत्पादकाने सांगितले.

ज्यावेळी मी संस्थेला दूध घालायचो त्यावेळी फॅटनुसार ३० ते ३५ रुपये लिटरपर्यंत दर मिळायचा. आमच्याकडून घेतलेलेच तेच दूध ग्राहकांना त्याच ठिकाणी विक्री करताना मात्र 50 रुपयांप्रमाणेच त्याची विक्री केली जायची, म्हणजे लिटरमागे १५ ते २० रुपयांपर्यंतचा नफा डोळ्यासमोरच दूध संस्था मिळवत असल्याचे मी पाहिले आहे, असे कोल्हापूरच्या योगेश माने या पशुपालकाने सांगितले. माने यांनी सतरा वर्षे गोठा व्यवसाय केला. परंतु गेल्या तीन वर्षांत गणितच जुळत नसल्याने त्यांना गोठा बंद करावा लागला. सतरा वर्षे प्रामाणिकपणे कष्टाने दुग्ध व्यवसाय करून प्रगती होण्याऐवजी हा व्यवसायच त्यांना बंद करावा लागला यांसारखे दुर्दैव नसल्याचे वास्तव आहे.

विम्याच्या जाचक अटी मनुष्य किंवा इतर वाहनांचा विमा पैसे भरलेल्या क्षणापासून ग्राह्य धरला जातो. पण जनावरांचा विमा मात्र पैसे भरल्यापासून पंधरा दिवसांनी ग्राह्य धरला जातो. या विचित्र नियमाचा मला थेट फटका बसला. गृहीत न धरलेल्या कालावधीत जनावरांचा मृत्यू झाल्याने भरपाई तर नाहीच, माझा लाखो रुपयांचा तोटा झाला. अशा अनेक अडचणी पशुपालकांपुढे उभ्या असल्याने उत्पादकांचे भरून न येणारे नुकसान होत असल्याची हतबलता श्री. माने यांनी व्यक्त केली

नोंदणी बुक कधीच निरंक नाही अनेक दुर्गम भागातही हा व्यवसाय केला जातो. शाहूवाडी तालुक्‍यातील बांबवडे येथील परशुराम कोळी यांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. त्यांच्या दोन म्हैशी आहेत. ते गेल्या पाच ते सात वर्षांपासून दुधाचा जोड धंदा करतात. एका म्हशीचा दूध देण्याचा काळ झाल्यानंतर कधीही त्या म्हशींच्या दुधापासून तुम्हाला किती फायदा झाला हे त्यांना सांगता येत नाही. पण पासबुकवर मात्र म्हैस आटली तरी काही हजार रुपयांची थकबाकी कायम दिसते. असे अनेक वर्षांपासून सुरू आहे. मग दुग्ध व्यवसायातून नफा कसा म्हणायचा असा त्यांचा सवाल विचार करावयास लावणारा ठरतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com