अमेरिकन फॉल आर्मी वर्मचा उसावरही हल्ला !

पंकज पाटील यांच्या ऊस पिकात आढळलेली स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा अळी. (दुसऱ्या छायाचित्रात) नुकसानीची लक्षणे.
पंकज पाटील यांच्या ऊस पिकात आढळलेली स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा अळी. (दुसऱ्या छायाचित्रात) नुकसानीची लक्षणे.

पुणे ः अमेरिकन फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) या नव्या किडीने महाराष्ट्रात मका पिकाद्वारे शिरकाव करीत पुढील संकटाची चाहूल दिली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राचे सर्वांत महत्त्वाचे पीक असलेल्या ऊस पिकातही या अळीने आपला मोर्चा वळवला असून, उसाची पाने फस्त करण्यास सुरवात केली आहे. हुमणी किडीसह विविध समस्यांमुळे आधीच त्रस्त असलेल्या ऊस उत्पादकांसाठी ही धोक्याची मोठी घंटाच मानली जात आहे.  सांगली जिल्ह्यातील घोगाव व बलवडी (भाळवणी) भागातील काही ऊस उत्पादकांच्या शेतात या अळीचा सुमारे पाच ते १० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव झाल्याची नोंद कीटकशास्त्र विषयातील तज्ज्ञ डॉ. अंकुश चोरमुले यांनी केली आहे. या किडीची ऊस पिकातील ही देशातील पहिलीच नोंद असावी, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.  बलवडी येथेही प्रादुर्भाव  घोगावपासून जवळच असलेल्या बलवडी (भाळवणी, ता. खानापूर) येथील प्रसाद पवार यांच्याही उसाच्या शेतात या अळीच्या नुकसानीची लक्षणे काही प्रमाणात आढळली. ते म्हणाले, की माझ्या उसाच्या शेतात ही अळी आढळली.  मी व माझ्या सहकाऱ्यांनी वेळीच सावध होऊन फवारणी केली. आज पवार यांच्या शेतात केवळ नुकसानीची लक्षणे शिल्लक राहिलेली दिसून येत आहेत. पवार यांच्या शेताजवळील मका पिकात मात्र या अळीचा प्रादुर्भाव ठळकपणे दिसून  येत असून, लहान व मोठ्या अवस्थेतील अळ्याही मक्याच्या विविध रोपांवर दिसून येत आहेत.   पान ३ वरून स्पोडोप्टेरा लिट्युरा या बहुभक्षी किडीने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात विविध पिकांत मोठे संकट यापूर्वीच उभे केले आहे. हे कमी म्हणून की काय त्याच प्रजातीतील स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा (अमेरिकन फॉल आर्मी वर्म) या परदेशातील किडीची देशातील पहिली नोंद अलीकडेच कर्नाटकातील मका पिकांत झाली. त्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस भागातील मका पिकाद्वारे या अळीने महाराष्ट्रात शिरकाव केला. मात्र सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राचे सर्वांत महत्त्वाचे पीक असलेल्या व साखर उद्योगाची कमान असलेल्या ऊस पिकाकडेही आपला मोर्चा वळवत या अळीने पुढील संकटाची नांदीच दिली आहे.  सांगली जिल्ह्यात आढळली सांगली जिल्ह्यातील घोगाव (ता. पलूस) येथील पंकज पाटील यांच्या सुमारे साडेचार एकरांपैकी चार एकरांतील को ८६०३२ या उसात ही अळी पुणे येथील कीटकशास्त्र विषयातील तज्ज्ञ डॉ. अंकुश चोरमुले यांना आढळली. सुमारे ७० ते ८० दिवसांच्या उसात या किडीचा प्रादुर्भाव २१ सप्टेंबरच्या सुमारास सुमारे १० ते १५  टक्क्यांपर्यंत आढळला. रोपनिर्मिती करून लागवड केलेल्या या शेतात प्रत्येक रांगेत सुमारे १२० रोपे आहेत. प्रत्येक रांगेत सुमारे १० ते ११ रोपांवर लहान अवस्थेपासून ते मोठ्या अवस्थेपर्यंतची अळी आढळली. याच शेताच्या बाजूला मक्याचे शेत असल्याने तेथूनच ही अळी उसावर आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून ऊस उत्पादक पाटील यांनी त्वरित दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास कीटकनाशकाची फवारणी संपूर्ण शेतात व परिसरातीलही काही भागात केली.  वेळीच उपाय केल्याने अळी आटोक्यात  गेल्या आठवड्यापासून घोगाव भागात दररोज दुपारनंतर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. वेळीच घेतलेली फवारणी व पाऊस या कारणांमुळे या किडीला जवळपास आटोक्यात आणणे पाटील यांना शक्य झाले आहे. सध्या त्यांच्या शेतात उसाची खरवडलेली व कातरलेली पाने; पोंग्यातील विष्ठा अशी लक्षणे दिसून येत आहेत.  किडीची शास्त्रीय अोळख पटवणार  स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा किडीची मका पिकात देशातील पहिली नोंद शिमोगा (कर्नाटक) येथील कृषी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. शरणबसप्पा देशमुख व डॉ. सी. एम. कल्लेश्वर स्वामी यांनी केली. त्या अनुषंगाने उसात आढळलेल्या या अळीचे साधर्म्य पाहता त्याची छायाचित्रे डॉ. चोरमुले यांनी डॉ. देशमुख यांच्याकडे पाठवली. प्रादुर्भावाची लक्षणे व अळीचे वर्णन या बाबींच्या आधारे ती हीच अळी असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, अळीची ‘डीएनए शास्त्रीयदृष्ट्या अोळख सिद्ध होण्यासाठी त्याचे नमुने ‘आयसीएआर’अंतर्गत बंगळूर येथील ‘एनबीएआयआर’ संस्थेकडे पाठवण्यात आल्याचे डॉ. चोरमुले यांनी सांगितले. त्याचे निष्कर्ष येत्या आठवड्यात येणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. आपल्या शोधकार्यात ‘सिक्स्थ ग्रेन ग्लोबल’ या कंपनीचा मोठा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. याच कंपनीत ते कृषी सल्लागारपदी कार्यरत आहेत.  मित्रबुरशीद्वारे होतेय नियंत्रण  बलवडी भागातील मक्याच्या पिकात या अळीचे मित्रबुरशीद्वारे जैविक नियंत्रण झाल्याचाही पुरावा आढळला आहे. या बुरशीची शास्त्रीय अोळख प्रयोगशाळेद्वारे करण्यात येणार असल्याचे डॉ. चोरमुले यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. शरणबसप्पा देशमुख यांनी ही बुरशी नोमुनिया रिलाई असल्याचा अंदाज व्यक्त केला. या अळीचे नैसर्गिक शत्रू आढळणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानाची बाब असून, त्यांच्यात अळीचे नियंत्रण करण्याची क्षमता असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही डॉ. देशमुख यांनी केले आहे. फ्रुगीपर्डा अळीची ठळक अोळख  

  • रंग मातकट, तपकिरी, काळसर हिरवा
  • नजरेत भरणारी लांबी व जाडी
  • पाने खरडवते. पानांचे पापुद्रे दिसतात.
  • पानांमध्ये पोंग्यात शिरून आतील भाग खाते. त्या भागात अळीची विष्ठा दिसून येते. 
  • अळीच्या तोंडाकडील भागात उलट्या इंग्रजी वाय आकाराची खूण 
  • अळीच्या शरीराच्या शेवटून दुसऱ्या भागावर चार समोरासमोर काळे ठिपके व छोटे केस
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com