शेतीमालाला हमीभाव, सरसकट कर्जमाफी मिळावी : अनिल जाधव

आषाढी सोहळ्यातील शासकीय महापूजा सोमवारी (ता.२३) हिंगोली जिल्ह्यातील मानाचे वारकरी अनिल जाधव यांच्या हस्ते सपत्निक झाली.
आषाढी सोहळ्यातील शासकीय महापूजा सोमवारी (ता.२३) हिंगोली जिल्ह्यातील मानाचे वारकरी अनिल जाधव यांच्या हस्ते सपत्निक झाली.

पंढरपूर ः ‘‘शेतीमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी आपली इच्छा आहे. पण विठ्ठलाला आपण साकडं नाही घालणार, तो योग्य वेळ आल्यानंतर आमच्या इच्छा पूर्ण करेल,'''' अशा मोजक्‍या शब्दांत सोमवारी (ता. २३) आषाढी यात्रेत शासकीय महापूजेचा मान मिळालेले हिंगोली जिल्ह्यातील भगवंती-कडोळी (ता. शेणगाव) येथील शेतकरी अनिल जाधव व सौ. वर्षा जाधव या दाम्पत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेसाठी रोखण्याचा इशारा दिल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी महापूजेला येणार नसल्याचे जाहीर करत वारकऱ्याच्या हस्ते महापूजा होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार हा मान जाधव दाम्पत्याला मिळाला.  गेल्या चार वर्षांपासून जाधव पती-पत्नी पंढरपूरची पायी वारी करतात, त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. दरवर्षी मुलांसह ते वारी करतात, पण यंदा मुलांना घरी ठेवून ते वारीसाठी आले होते. यंदाचे मानाचे वारकरी दरवर्षीपेक्षा अधिक भाग्यवान आहेत. कारण, दरवर्षी मानाच्या वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर शासकीय महापुजेत सहभागी होण्याचा मान मिळत असला, तरी प्रत्यक्ष पूजेचे सर्व विधी मुख्यमंत्री व त्यांच्या सौभाग्यांच्या हस्ते होत असते, मात्र, यंदा संपूर्ण महापूजा वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. या महापूजेवेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार अनिल देसाई, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्यासह मंदिर समिती सदस्य उपस्थित होते. शेतकरी असलेल्या जाधव दाम्पत्यांना दोन एकर शेती आहे, यंदा सोयाबीन आणि हरभरा केला आहे, असे सांगत ते म्हणाले, की महापूजेचा मान मिळाला, खूपच आनंद वाटला, विठ्ठला आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना तुझी अशीच सेवा करण्याचे भाग्य मिळो, आम्ही धन्य झालो,’’ या महापूजेनंतर जाधव पती-पत्नींचा सत्कार मंदिर समितचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या दोघांना एस.टी. बसचा वर्षभराचा मोफत प्रवासाचा पास देण्यात आला.  पोलिसांची अशीही खबरदारी मंत्र्यांची एकाच गाडीत वारी गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाच्या आंदोलनामुळे आषाढी सोहळ्यातील या महापूजेकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत, आपण पंढरपुरात येणार नसल्याचे जाहीर केल्याने तणाव काहीसा निवळला. पण महापूजेसाठी अन्य मंत्र्यांचाही प्रवेश रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. रविवारी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री सुभाष देशमुख यांच्या गाड्या अडवल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी त्याबाबतची खबरदारी घेतली. महापूजेसाठी आलेल्या सर्वच मंत्र्यांना विश्रामगृहापासून एकाच गाडीत बसवून मंदिरात आणले आणि हा सोहळा पार पाडला. त्याशिवाय पंढरपुरातही सर्व महत्त्वाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावत परिस्थिती नियंणत्रात आणली.  

निर्मलदिंडी पुरस्काराचे वितरण श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने यंदा पहिल्यांदा निर्मल दिंडी पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पहिला क्रमांक संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्यातील रथापुढील शेडगे महाराज दिंडीला एक लाखाचा पहिला क्रमांक, कोथळी येथील संत मुक्ताबाई दिंडी सोहळ्याला ७५ हजार रुपयाचा द्वितीय आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडी ५० हजारांचा तिसरा पुरस्कार मिळाला. परिवहन मंत्री रावते यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण या वेळी करण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com