काळीपुळी रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय अावश्‍यक

प्रतिबंधात्मक उपायांनीच काळीपुळी रोगाचे नियंत्रण शक्य होते.
प्रतिबंधात्मक उपायांनीच काळीपुळी रोगाचे नियंत्रण शक्य होते.

काळीपुळी रोग उष्ण प्रदेशात उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या सुरवातीस अाढळतो. या रोगात मृत्यूचे जास्तीत जास्त प्रमाण आढळून येते. प्रतिबंधात्मक उपायांसोबतच लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकाकडून त्वरित उपचार करून घेणे अावश्‍यक असते.   बॅसिलस अँथ्रॅसिस या जिवाणूमुळे होणाऱ्या रोगाला काळीपुळी / फाशी असे म्हणतात. काळीपुळी हा रोग गाई, बैल, म्हशी, शेळी, मेंढ्या, घोडे, डुक्कर इत्यादी प्राण्यामध्ये आढळतो. लसीकरण आणि व्यवस्थापनातील स्वच्छतेमुळे सध्या काळीपुळी रोगाचा प्रादुर्भाव पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. किंबहुना हा रोग प्राण्यात जगभर सर्वत्र आढळतो. हा आजार प्राण्यापासून मानवाला देखील होऊ शकतो. बॅसिलस अँथ्रॅसिस जिवाणू लांबट असून त्यांची संरचना साखळीमध्ये असते त्यामुळे बांबूच्या काठीसारखी दिसतात. हे जिवाणू जेव्हा हवेच्या किंवा ऑक्सिजनच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचे रूपांतर बीजाणू (स्पोर) मध्ये होते. बीजाणू स्वरूपात हे जंतू जमिनीत २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत सुप्तावस्थेत जगू शकतात. या बीजाणूंवर प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम होत नाही. या जिवाणूच्या पेशीबाहेरील आवरणाचे आणि जिवाणूद्वारे निर्मित विषाची रोगनिर्मिती मध्ये महत्त्वाची भूमिका आहे. रोगाचा प्रसार

  • रोगी जनावरांचे केस, लोकर, हाडे, मास अथवा दूषित माती यांच्या संपर्काने
  • संसर्गित चारा आणि पाण्याद्वारे
  • उंदीर, घुशी किंवा चावक्या माश्याद्वारे
  • बाधित जमिनीतून वाहत जाणाऱ्या पाण्याद्वारे
  • एकंदरीत ह्या जिवाणूंचा शिरकाव शरीरात मुख्यत्वे सेवनाद्वारे, श्वासातून किंवा त्वचेतून होतो आणि रोगनिर्मिती होते.
  • लक्षणे

  • उष्ण प्रदेशात उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या सुरवातीस उद्भवतो. रोगाची सुरवात एकदम होते आणि जनावरांना ४१-४२ अांश सेल्सिअस ताप चढतो. जनावरे थरथर कापतात, चारा खाणे, रवंथ करणे तसेच दूध देणे बंद होते.
  • गळ्यात सूज येते, श्वासोच्छवास जलद चालतो आणि जनावरे बेशुद्ध होतात.
  • रक्ताचे जुलाब होतात, जनावर मलूल होऊन पडून राहते आणि २-३ दिवसांत दगावते.
  • मेंढ्याना रोग झाल्यास थोड्याच वेळात गरगर फिरू लागतात आणि अचानक दगावतात.
  • घोड्यामध्ये पोटात कळा येतात, अस्वस्थ होऊन उठबस करतात आणि जमिनीवर पडून पाय झाडतात.
  • रोगाचे विशिष्ट लक्षण म्हणजे काळ्या रंगाचा न गोठणाऱ्या रक्ताचा स्त्राव नाकातून किंवा अन्य छिद्रातून येतो. या रोगात मृत्यूचे जास्तीत जास्त प्रमाण आढळून येते.
  • मानवात त्वचेसंबंधी, फुफ्फुसासंबंधी लक्षणे दिसून येतात.
  • रोगाचे निदान

  • प्रयोगशाळेत काळीपुळी रोगाचे निदान बाधित जनावरांचे रक्त आणि पेशीपासून करता येते.
  • या रोगाचे नमुने हे हवेच्या आणि मनुष्याच्या संपर्कात न येतील अशा प्रकारे घेणे महत्त्वाचे आहे.
  • नुकतेच मेलेल्या किंवा मृत्युपूर्व कानाच्या नीलेतून घेतलेले रक्त सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास विशिष्ट गुण असलेले बॅसिलस अँथ्रॅसिस जिवाणू दिसतात.
  • रोगाच्या निश्चित निदानासाठी रक्तातून जिवाणूंचे विलगीकरण करून ओळखतात तसेच अस्कॉलीस चाचणी आणि पी सी आर या चाचणीद्वारे या रोगाचे निदान करतात.
  • उपचार बहुतांशवेळा काळीपुळी रोग तीव्र किंवा अतितीव्र स्वरूपात आढळत असल्यामुळे त्यामुळे बऱ्याच वेळी उपचारापूर्वीच जनावरे दगावतात. सौम्य प्रकारच्या आजाराच्या उपचारासाठी प्रतिजैविके उदा. स्ट्रेप्टोमायसिन, टेरामायसिन, ओरिओमायसिन दिल्यास तीन चार दिवसांत रोगाला उतारा पडतो. कळपातील आजारी मेंढ्याचे निदान करून घ्यावे. आजारी मेंढ्यांमध्ये लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकाकडून त्वरित उपचार करून घ्यावा. या रोगात उपचारास प्रतिसाद कमी प्रमाणात मिळतो. प्रतिबंध आणि उपाय

  • काळीपुळी संशयित जनावरांचे शवविच्छेदन करू नये.
  • काळीपुळी हा अत्यंत घातक रोग आहे, त्यामुळे ज्या भागात या रोगाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणच्या जनावरांचे नियमित लसीकरण करणे आवश्यक आहे. या
  • रोगाची लस साधारणतः पावसाळ्यापूर्वी फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान देतात. ४ महिन्यांच्या वयोगटात आणि प्रतिवर्षी लस द्यावी.
  • आजारी जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवून त्यांची काळजी घ्यावी.
  • दूषित झालेली जागा आणि इतर सर्व बाधित वस्तू जंतुनाशके वापरून निर्जंतुकीकरण करावे.
  • हा रोग प्राण्यापासून किंवा त्यांच्या वस्तूपासून माणसामध्ये होतो म्हणून यांच्याशी संपर्कात येणारे पशुपालक, कामगार हे या रोगापासून सतर्क राहिले पाहिजे.
  • मानवासाठी या रोगाची लस बायोथ्रॅक्स या नावाने उपलब्ध आहे.
  • संपर्क : डॉ. वर्षा थोरात, ८७७९२२७२६२ डॉ. राजश्री गंदगे, ९८६९००८३५० (मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com