शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना देणार ः अनुपकुमार

आजवरच्या वाटचालीत ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून शेती धोरणांची सर्वांगीण माहिती मिळाली. त्याचादेखील अनेक ठिकाणी उपयोग झाला. त्यामुळे मी सकाळ समूह आणि ‘अग्रोवन’चे आभार मानतो. - अनुपकुमार, नवनियुक्त कृषी सचिव
अनुपकुमार
अनुपकुमार

नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण आखले आहे. शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट गाठणे शक्‍य होणार असून त्याकरिता पहिल्या टप्प्यात विदर्भ, मराठवाड्यात शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याकरिता प्रयत्न करणार आहे, अशी माहिती नवनियुक्‍त कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध विकास खात्याचे सचिव अनुपकुमार यांनी दिली.  १९९० च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी असलेल्या अनुपकुमार यांच्या सेवेला २८ वर्ष झाली असून यातील १२ वर्षाचा सेवाकाळ विदर्भात गेला आहे. त्यामध्ये १९९३-९४ मध्ये बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, २००१ मध्ये अकोला जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे संचालक, नागपूर विभागीय आयुक्‍त, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे प्रभारी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अशा विविध जबाबदाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. 

विदर्भ वैधानिक विकास मंडळाचा प्रभारी अध्यक्ष असल्याने विदर्भातील ११ जिल्ह्यांची सर्वंकष माहिती झाली होती. विदर्भ, मराठवाड्यासाठी धोरण ठरविताना अशा प्रकारच्या माहितीचा उपयोग करता येणार आहे. विदर्भात उस्मानाबादी शेळी संगोपनाला चालना देण्याचे प्रस्तावित असून त्यासंदर्भाने मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धनमंत्री यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी पशुपालकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. विशेष म्हणजे हे काम आव्हानात्मक असल्याने मी ही जबाबदारी स्वतःहून माझ्याकडे घेतली आहे.  जागतिक पातळीवर दुधाच्या दराचे मोठे संकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातदेखील दूध दराबाबत चिंता व्यक्‍त केली जाते. हा प्रश्‍न सोडविण्याला माझे प्राधान्य राहणार आहे.  सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव राजेश नार्वेकर यांची ठाणे जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची मंत्रालयात कामगार विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती झाली आहे. ठाणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. आभा शुक्ला यांना सहकार विभागात प्रधान सचिव म्हणून नेमणूक मिळाली आहे. कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची नागपूर विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे.  रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची मुंबईत माहिती-तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आर. एच. ठाकरे यांची नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून, तर सहायक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली  आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com