कीटकनाशक धोरणांसाठी अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

कीटकनाशक धोरणांसाठी अभिप्राय पाठविण्याचे आवाहन
कीटकनाशक धोरणांसाठी अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

मुंबई : जिल्हा, विभागनिहाय पीकपद्धतीनुसारच केवळ नोंदणीकृत व शिफारस केलेल्याच कीटकनाशकांची विक्री करण्यासंदर्भात धोरण तयार करण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांकडून अभिप्राय मागविण्यात येत आहेत. पीकनिहाय शिफारस केलेली नोंदणीकृत कीटकनाशकेच शेतकरी बांधवांनी वापरावीत. बिगर नोंदणीकृत आणि पिकांसाठी शिफारस नसलेल्या कीटकनाशकांची विक्री होणार नाही, याची विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

यवतमाळ व राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कीटकनाशकांच्या फवारणीच्या वेळेस झालेल्या विषबाधेमुळे शेतमजूर, शेतकरी यांची जीवितहानी झाली आहे. शेतमजूर, शेतकरी यांना भविष्यात कीटकनाशकांची फवारणी करताना जीवितास हानी पोचणार नाही, यासाठी विशेष काळजी घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब बनली आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे.

कीटकनाशक कायदा, १९६८ व कीटकनाशके नियम, १९७१ मधील तरतुदीनुसार राज्यामध्ये कीटकनाशके उत्पादन, साठवणूक, विक्रीसाठी प्रदर्शन करणे व विक्री करणे यासाठी कीटकनाशकांचे परवाने दिले जातात. फरिदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती या देश पातळीवरील सर्वोच्च यंत्रणेद्वारे नोंदणी झालेल्याच कीटकनाशकांना परवान्याद्वारे राज्यात उत्पादन, साठवणूक, विक्रीसाठी प्रदर्शन करणे व विक्री करणे यासाठी परवानगी दिली जाते. या सर्वोच्च यंत्रणेमार्फत प्रत्येक कीटकनाशकांच्या नेमक्या किती तीव्रतेस एखाद्या विशिष्ट पिकावरील, विशिष्ट कीड अथवा रोगाच्या नियंत्रणास योग्य ठरेल याच्या शिफारशीदेखील निश्चित करते.

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतमजूर, शेतकरी मृत्यू पावलेल्या प्रकरणांचा राज्य शासन व कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात आला. पिकासाठी, किडीसाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकांव्यतिरिक्त शिफारस नसलेल्या कीटकनाशकांची विक्री व वापर, शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त तीव्रतेच्या कीटकनाशकांची विक्री व वापर आणि पीक संरक्षणाकरिता शिफारस नसलेल्या कीटकनाशकांची विक्री व वापर, तसेच शिफारस नसलेल्या वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या मिश्रणांची विक्री व वापर याबाबी अभ्यासात आढळून आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती फरिदाबाद यांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. सर्व कीटकनाशके उत्पादक, वितरक व विक्रेत्यांनी शिफारशी नसलेल्या कीटकनाशकांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर विक्रेत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पीकपद्धतीनुसार आवश्यक त्या पिकांची, कीड रोग नियंत्रणांचीच कीटकनाशके विक्री करावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कीटकनाशके फवारणीमुळे होणारी मनुष्य व प्राण्यांच्या जीवितहानीबरोबरच, शिफारस नसलेली कीटकनाशके व त्यांच्या अयोग्य प्रमाणात वापराचा पर्यावरणाबरोबरच मनुष्य व प्राण्यांच्या अन्नघटकांमध्ये कीटकनाशकांचे हानिकारक अंश आढळल्याने आरोग्य समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत.

यावर उपाय म्हणून आता जिल्हा-विभागनिहाय पीकपद्धतीनुसारच केवळ नोंदणीकृत व शिफारस केलेल्याच कीटकनाशकांची विक्री व्हावी, यासाठी धोरण निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी या क्षेत्रातील सर्व नागरिकांकडून यावर सूचना, अभिप्राय मागविण्यात येत आहेत. लेखी स्वरूपात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, सेंट्रल बिल्डिंग, पुणे - ४११००१ या पत्त्यावर किंवा cqcopest@gmail.com या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com