सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून ९३३ शेतकऱ्यांचे अर्ज

सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून ९३३ शेतकऱ्यांचे अर्ज
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून ९३३ शेतकऱ्यांचे अर्ज

पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी तीन व पाच एचपीच्या कृषिपंपांसाठी लाभार्थी हिस्सा तब्बल ४ हजार ४४५ ते १३ हजार ७४० रुपयांनी कमी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात सौर कृषिपंपासाठी आत्तापर्यंत ९३३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

राज्य शासनाने सौर कृषिपंप योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास मंजुरी दिल्यानंतर प्राप्त झालेल्या निविदांद्वारे सौर कृषिपंपाच्या ३ एचपी डीसी पंपासाठी १ लाख ६५ हजार ५९४ रुपये आणि ५ एचपी डीसी पंपासाठी २ लाख ४७ हजार रुपये निश्चित झाली आहे. पूर्वीच्या आधारभूत किमतीत मोठी घट झाल्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती-जमाती गटातील लाभार्थ्यांचा अनुक्रमे १० टक्के व ५ टक्के लाभार्थी हिस्सा कमी झाला आहे. 

सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना १० टक्के प्रमाणे ३ एचपी सौर कृषिपंपासाठी २५ हजार ५०० रुपये भरावे लागत होते. यात ८ हजार ९४० रुपयांची घट होत आता १६ हजार ५६० रुपये भरावे लागणार आहे. ५ एचपीसाठी ३८ हजार ५०० रुपयांऐवजी २४ हजार ७१० रुपये भरावे लागणार असून, यात १३ हजार ७४० रुपये कमी भरावे लागतील. अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना ५ टक्के प्रमाणे ३ एचपीसाठी म्हणजे १२ हजार ७२५ रुपये भरावे लागत होते. यात ४ हजार ४४५ रुपये कमी करण्यात असून, आता ८ हजार २८० रुपये भरावे लागतील. ५ एचपीसाठी १९ हजार २५० रुपये भरावे लागत होते. यात ६ हजार ८९५ रुपये कमी करण्यात असून, आता १२ हजार ३५५ रुपये भरावे लागणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर www.mahadiscom.in/solar हे स्वतंत्र पोर्टल मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

१८२ जणांना कोटेशन पुणे जिल्ह्यातील ९३३ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी ऑनलाइन अर्ज केले असून, १८२ जणांना कोटेशन देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहेत व यापूर्वी कृषिपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून अद्याप वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com