आनंदशाळा अन् जैवविविधता संवर्धनाचे शिक्षण

परिसरातील वनस्पतींचा अभ्यास करताना विद्यार्थी.
परिसरातील वनस्पतींचा अभ्यास करताना विद्यार्थी.

आनंदशाळा शिबिरानंतर जवळपास सर्व शाळांत शिवार फेरी घेण्यात आली. त्याचा चांगला उपयोग संवर्धनाच्या कामांसाठी होतो आहे. शाळेतील मुले आपल्या पालकांसोबत, गावकऱ्यांसोबत संवाद साधू लागली. या सर्वांचा परिमाण म्हणून संस्थेच्या माध्यमातून गावागावात सुरू असलेल्या संवर्धन कामास लोकांचा अनुकूल प्रतिसाद मिळू लागला आहे.  

शिवार फेरी हा आनंदशाळा शिबिराचा गाभा असतो. शिवार फेरीत निरीक्षण व मोजमापाच्या पद्धती कोणत्या वापरायच्या, पक्षी, फुलपाखरे, साप, पाली-सरडे, बेडूक, अळंबी, रानभाज्या इत्यादी जैवविविधता घटकांची ओळखनिश्चिती कशी करायची याची माहिती देणारे ‘जैवविविधता कीट’ शिवार फेरीत दिले जाते. शिवारात जाण्यापूर्वी आपल्या परिसराबद्दल किती आणि काय काय माहिती आहे, याची चर्चा करून यादी बनविली जाते. त्यानंतर शिवार फेरी काढली जाते. मुलं परिसरात जाऊन जैवविविधता घटकांच्या नोंदी घेतात. जैवविविधता घटकांमधील परस्परसंबंध शोधतात.  शिवार फेरी करताना वर्गातली अबोल जिया चावरे ही आपल्याला माहिती नसणाऱ्या अनेक रानभाज्या सहज ओळखते हे शिक्षकांच्या पहिल्यांदाच लक्षात आले. यातून तिचाही आत्मविश्वास वाढला आणि शिक्षकांचे तिच्याबद्दलचे मतही बदलले. अशा प्रसंगातून मुलांमध्ये आनंद निर्माण होतो. आनंदाने जे शिकले जाते ते शाश्वत शिक्षण असते. झाडाची उंची मोजणे असेल किंवा आपल्या परिसरातील गवत, झाडे मोजणे ही बाब सर्वजण उत्साहात करतात. मोजमापे घेताना त्यांचे गणिताचे शिक्षण नकळत होत राहते. बिंदू रेषा पद्धत, चौरस पद्धत या शास्त्रीय मोजमापाच्या पद्धती वापरून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आपल्या भागातील जैवविविधतेचे मोजमाप करतात. शिवार फेरीमध्ये आपल्या शिवारातील वेगवेगळ्या जैवसांस्कृतिक घटकांचा इतिहासदेखील ते शोधतात. इतिहास हा केवळ राजे-महाराजे आणि त्यांच्या लढायांचा नसतो तर आपल्या शिवारातील शेती, पिके, झाडे, विहिरी, धान्य कोठारे, बाजार, शाळा, समाजमंदिर, प्रार्थनास्थळे, गावात राहणाऱ्या लोकांचादेखील इतिहास असतो. वेगवेगळी साधने वापरून हा इतिहास शोधताना विद्यार्थीदेखील इतिहासकार होऊन जातात. हा विश्वास आनंदशाळा शिबिराचे प्रमुख साध्य आहे. 

आनंदशाळा शिबिरानंतर शाळांचा प्रत्यक्ष कामात सहभाग ः  

  • आनंदशाळा शिबिरानंतर जवळपास सर्व शाळांत ‘शिवार फेरी’ घेण्यात आली. त्याचा चांगला उपयोग संवर्धनाच्या कामांसाठी होतो आहे. 
  •     भंडारा जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत इतिहास व भूगोल शिकविणाऱ्या गीता तिडके यांनी विद्यार्थांची शिवार फेरी काढून गावशिवारातील दगडमातींचा अभ्यास घेतला. त्यांच्या मते प्रत्यक्ष दगड माती हाताळत माती बनण्याची प्रक्रिया, खडकांचे वेगवेगळे प्रकार शिकविणे हे शिकणं समृद्ध करण्यासाठी खूप उपयोगी ठरले. शिवार फेरीमधून अनेक प्रकल्पांच्या कल्पना मिळाल्याचे त्यांनी नोंदविले. 
  •     वाशीम जिल्ह्यातील कामरगाव विद्यालयाच्या नीता तोडकर यांनी विद्यार्थिनींच्या मदतीने ‘गाव इतिहास’ लिहिण्याचे काम केले आहे. त्यामध्ये गावशिवारातील वेगवेगळी झाडे आणि त्यांनी १९७२ च्या दुष्काळामध्ये बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यांचा शोध घेतला आहे.
  •     शहादा तालुक्यातील राजू वसावे सरांनी सांगितले की, गावचा इतिहास हा प्रकल्प करताना मुलांच्या इतिहास विषयाची संकल्पना, इतिहासाची साधने हे अधिक स्पष्ट झाले. 
  •     धुळे येथील अपर्णा चितळकर यांनी सांगितले की, शिवार फेरीच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढलीय, मुलांचे सातत्य वाढले. 
  •     संस्थांनीही जीविधा शिक्षणाचा चांगला उपयोग करून घेतला. लोकपर्याय संस्थेचे शांताराम पंदेरे आणि पर्यावरण शिक्षण मित्र रवी गरुड यांनी आनंदशाळा शिबिरानंतर मुलांना ‘आपल्या शेतीमधील जैवविविधा’ याविषय लिहायला सांगितले. त्यामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या व त्यांचे परंपरागत उपयोग यांच्या नोंदी घेतल्या. गावरान बियाण्यांचे महत्त्व मुलांनी समजून घेतले. 
  •     काही शाळांतील विद्यार्थी तर प्रत्यक्ष कृतीत सहभाग घेतात. धुळ्यातील लामकानी गावातील ‘न्यू इंग्लिश मीडियम’ शाळेचे विद्यार्थी गवताच्या प्रकारांचा अभ्यास करतात. गवत वाढल्याने त्या परिसरात वाढलेल्या जीविधा घटकांची नोंद ठेवतात व गावकऱ्यांना ते समजावून सांगतात. गावकऱ्यांनी जतन केलेल्या गवताळ कुरणात आग लागली तेव्हा या विद्यार्थी गटाने आग विझविण्यासाठीही धाव घेतली. 
  •     नवेगाव बांध येथील आनंदशाळा शिबिरात सहभागी भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळचे कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आनंदशाळा शिबिरात शिकलेल्या चौरस पद्धतीचा वापर करून परिसरातील तलावामध्ये आढळणाऱ्या पाणवनस्पतींचा आढावा घेतला 
  • आहे. हे काम संस्थेच्या संवर्धन प्रकल्पात खूपच मोलाचे योगदान असल्याचे मनीष राजनकर यांनी सांगितले. 
  •     शिबिरानंतर शाळांमधील शिकण्या-शिकविण्याच्या पद्धतीमध्ये अर्थपूर्ण बदल झाले. ‘मुलं निव्वळ ज्ञान ग्रहण करण्यासाठी नसून ज्ञान निर्मिती प्रक्रियेत त्यांचा मोलाचा वाट असतो’ हे समज विकसित झाले. शाळेतील मुले आपल्या पालकांसोबत, गावकऱ्यांसोबत संवाद साधू लागली. या सर्वांचा परिमाण म्हणून संस्थेच्या माध्यमातून गावागावात सुरू असलेल्या संवर्धन कामास लोकांचे अनुकूल प्रतिसाद मिळू लागले. आनंदशाळा शिबिराचे मोड्यूल पर्यावरण शिक्षण केंद्राकडे उपलब्ध आहे. जुलै २०१९ पर्यंत अद्ययावत जैवविविधता संच पर्यावरण शिक्षण केंद्राकडे उपलब्ध होणार आहे. 
  • जाणकारांशी गप्पा   जाणकार व्यक्तींशी गप्पा म्हणजे मुलांमधील जिज्ञासेची दारे खुली करणेच आहे. अशा गप्पांमधून समजलेल्या, ऐकलेल्या गोष्टी मुलं कधी विसरत नाहीत. तणमोर पक्ष्याबद्दल हिंमतराव पवार यांनी सांगितलेल्या गोष्टी असतील;  कुसन ठाकरे आणि रामभाऊ तुमसरे यांनी सांगितलेले माशांचे प्रकार, मासे पकडण्याचे वेगवेगळे साहित्य यांची सांगितलेली माहिती मुलं लक्षपूर्वक ऐकतात. मुलांच्या प्रश्नांतून ‘जाणकारांशी गप्पा’ हे सत्र समृद्ध  होते. जाणकारांसोबत शिवारात फेरफटका तर मुलांच्या खूपच आवडीचा. धुळ्याच्या लळींगच्या गवताळ माळरानात शंकरतात्यांना मुलांनी दुर्बीण वापरायला शिकवले, तर शंकरतात्यांनी मुलांना वेगेवेगळ्या गवत, वेलींची ओळख करून दिली. 

    शिवार फेरीतून शिक्षण  शिवार फेरीत घेतलेल्या नोंदीचे वर्गीकरण, विश्लेषण, मांडणी करणे, आलेखामध्ये दाखविणे या बाबीदेखील तितक्याच उत्साहाने केल्या जातात. अकोले येथील शिबिरात झाडाची उंची मोजण्यासाठी त्रिकोणाचा वापर कसा करावा हे प्रज्वल या विद्यार्थ्याकडून शिक्षकांनी समजून घेतले होते. विद्यार्थ्याकडून गणित समजून घेताना शिक्षकांना अजिबातच कमीपणा वाटत नव्हता. गणित सोडवायचे असो किंवा नकाशा काढायचे काम असो, ज्याच्या त्याच्या क्षमता वापरून ही कामे गटात केली जातात. एकमेकांकडून शिकण्याचे हे गटातील काम सर्वांना समृद्ध बनविणारे आहे. 

    (लेखक पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे येथे कार्यरत आहेत.)        

    इमेल : baswant.dhumane@ceeindia.org,     : ojas.sv@students.iiserpune.ac.in   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com