राष्ट्रवादीशी आघाडीचा निर्णय अद्याप नाही ः अशोक चव्हाण

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

लातूर ः राज्यात आगामी निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. राज्यातील नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्याचा अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात येणार आहे. श्री. गांधीच त्या बाबतीत निर्णय घेतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता. ४) येथे पत्रकार परिषदेत दिली.  काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिराच्या निमित्ताने श्री. चव्हाण येथे आले होते. या वेळी श्री. चव्हाण म्हणाले, की शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांशी आघाडी करण्याच्या संदर्भात मते जाणून घेतली जात आहेत. राज्य पातळीवरील नेत्यांना देखील आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर याचा अहवाल श्री. राहुल गांधी यांना सादर केला जाईल. तेच आघाडीसंदर्भात निर्णय घेतील. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. संविधानाने दिलेले आरक्षण हे कायम राहिलेच पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. आर्थिक निकष किंवा शेतकऱ्यांना आरक्षण या संदर्भात पक्षीय पातळीवर याची व्यापक चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. ‘‘विविध राज्यातील निवडणुकांत काँग्रेसचा पराभव होत आहे. ही खरी गोष्ट आहे. त्याला श्री. राहुल गांधी हे जबाबदार आहेत किंवा त्यांचे नेतृत्व लोकांना मान्य नाही, असे म्हणता येणार नाही. ती राज्य व स्थानिकच्या नेत्यांची जबाबदारी असते. पोटनिवडणुकांत पक्षाला मोठे यश आले आहे, हे विसरता येणार नाही. सध्याचे राज्य सरकार बोलण्यात आॅनलाइन व कृतीत आॅफलाइन आहे. तेराशे शाळा बंद केल्या जात आहेत तर दुसरीकडे दारूच्या दुकानांना परवानगी दिली जात आहे. राज्यात सामाजिक स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव, बेरोजगार तरुणाला काम दिले तर मंत्रालयात जाळ्या लावण्याची वेळ येणार नाही,’’ असे श्री. चव्हाण म्हणाले.  या वेळी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com