लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची रणनीती

लोकसभा निकाल
लोकसभा निकाल

नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून कोणाला ‘लीड’ मिळतेय यावरच विधानसभेची रणनीती ठरली जाणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नगर जिल्ह्यावरील विशेष लक्ष आणि जिल्ह्यामधील मातब्बर मंडळींनी लोकसभेच्या मतदानाआधी केलेली ‘गुप्त’ पेरणीमुळे आता विधानसभेची गणिते मांडण्यासाठी जाणकारांचे मतदारसंघनिहाय मताधिक्याकडे लक्ष लागले आहे.  दरम्यान दुष्काळाने होरपळ सुरू असलेल्या भागात एखाद्या नेत्याचा अपवाद वगळला तर, उमेदवारांसह त्यांचे ‘पाठीराखे’ मतदान पदरात पाडून घेतल्यापासून गायब झाल्याचे चित्र आहे. नगर जिल्ह्याचा राज्याच्या राजकारणात कायम प्रभाव राहिलेला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कॉँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील  यांनी भाजपत प्रवेश करून निवडणूक लढवली. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मुलासाठी भाजपचा प्रचार केला. त्यामुळे नगर लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुरती बदलली आहेत. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभेच्या निकालानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचाही भाजप प्रवेश होऊ घातला आहे. सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतील कॉँग्रेस विखेंनी जवळजवळ नामशेष केले आहे. साहजिकच विखेंचा राजकीय प्रभाव व उपद्रवमूल्य विचारात घेता लोकसभेच्या निकालानंतरच या मतदारसंघातील विधानसभेची गणिते अवलंबून आहेत.  नगर शहर विधानसभा मतदारसंघातील आमदार संग्राम जगताप स्वत:च लोकसभेचे कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत. जगताप लोकसभेत गेल्यास नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त होईल. ही अटकळ लक्षात घेऊन विविध पक्षांतील इच्छुकांनी जगताप यांच्या विजयासाठी नाइलाजाने `हातभार' लावल्याचे सांगण्यात येते. जगताप यांना लोकसभेत अपयश आल्यास साहजिकच त्यांना विधानसभेलाही सहानुभूती राहील. 

‘दुष्काळी’ पारावर आकडेमोड सुरूच लोकसभा निवडणूक प्रचाराचा काळात छावण्यात नेत्यांचा माहोल सुरू होता. कळवळा दाखवत नेते छावण्यांत दाखल होत. जनावरांना चाराही खाऊ घालत होते. मते पदरात पाडून घेतली आणि उमेदवार, नेत्यांसह त्यांचे पाठीराखे गायब झाले आहेत. असे असले तरी दुष्काळी गावांतील पारावर ‘कोण निवडून येणार’ यावर चर्चा करून आकडेमोड सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com