अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्त

अटलजी: एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्त
अटलजी: एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्त

भारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे आज येथे वयाच्या 94 वर्षी निधन झाले. भारतीय राजकारणातील एक प्रगल्भ व सर्वमान्य नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या सक्रीय राजकीय जीवनाच्या अर्धशतकाकडे पाहिल्यास संसदीय कामकाजात त्यांनी आपल्या प्रभावी भाषणांनी केवळ भर टाकली नाही, तर सत्तेच्या शिखरावर असताना लोकशाहीची मूल्ये जपली. 1996 मध्ये ते केवळ 13 दिवस, 1998 ते 1999 दरम्यान अकरा महिने व 1999 ते 2004 दरम्यान पाच वर्षे (असे तीन वेळा) पंतप्रधान होते. त्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये छोटेमोठे मिळून तब्बल 20 राजकीय पक्ष होते. त्यांना बरोबर घेऊन अत्यंत सामंजस्याने त्यांनी पाच वर्ष शासन केले. 1998 मध्ये त्यांनी पोखरण येथे अण्वस्त्र चाचणीचा जो निर्णय घेतला व अखेरपर्यंत जो गोपनीय ठेवला, याचे जगाला आश्‍चर्य वाटले. अमेरिका, जपान व युरोपीय देशांनी चाचणीला विरोध करीत भारतावर जी बंधने लादली, त्यांना न जुमानता वाजपेयी यांनी देशाचे सुकाणू मोठ्या मुत्सद्देगिरीने चालविले. या चाचणीने देशाला अधिक शक्तीशाली केलेच, पण चीन वा पाकिस्तान यांना वाकडी नजर करून भारताकडे पाहाता येणार नाही, हे ही सिद्ध झाले. 

वाजपेयी यांच्या कारकीर्दीत घडलेल्या महत्वाच्या राजकीय घटनांमध्ये 1998 मधील पोखरणमधील अणुचाचण्यां व्यतिरिक्त पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी 1999 मध्ये लाहोरला भेट देऊन केलेली बस शिष्टाई, त्यापाठोपाठ मे ते जुलै दरम्यान झालेले कारगिल युद्ध, व परिस्थिती निवळल्यानंतर जुलै 2001 मध्ये पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल मुशर्रफ यांच्याबरोबर आग्रा येथे झालेली शिखर परिषद व त्याच वर्षी 13 डिसेंबर रोजी लष्कर-ए-तोयबा व जैश-ए- महंमदच्या दहशतवाद्यांनी संसदेवर केलेला हल्ला, यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे ते पहिले पंतप्रधान. या घटनांनी कारकीर्द वादळी ठरली. 

आग्रा येथे झालेल्या वाटाघाटीतील समझोता उप-पंतप्रधान व गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांना मंजूर नसल्याने पुढे प्रगती होऊ शकली नाही. या वाटाघाटींचे वार्तांकन मी आग्र्याहून केले होते. पाकिस्तान व चीनबरोबर संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी यांनी गांभीर्याने प्रयत्न केले, हे निश्‍चित. त्यातील बस शिष्टाईचा मी साक्षीदार आहे. वाजपेयी यांना व मान्यवर नेत्यांना घेऊन येणारी बस लाहोरमध्ये पोहोचण्याआधी आम्ही काही पत्रकार लाहोरला पोहोचलो होतो. त्यावेळी पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांचे बंधू शहाबाज शरीफ त्यांचे स्वागत करण्यास आले होते. तथापि, सेनाप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ मात्र अनुपस्थित राहिले. त्याचवेळी ते कारगिल युद्धाची तयारी करीत होते. त्यामुळे, "वाजपेयी गाफील राहिले," अशीही टीका झाली. तथापि, प्रत्यक्ष युद्धात मात्र भारताने पाकिस्तानला पाणी चारले. वाजपेयी यांच्या चांगुलपणाचा पाकिस्तानने गैरफायदा घेतला. 

वाजपेयी यांच्याबरोबर 22 ते 25 सप्टेंबर, 2002 दरम्यान मालदीवच्या दौऱ्यावर जाण्याची संधि मला मिळाली होती. त्यावेळी मालदीवमध्ये ममून अब्दुल गयूम हे अध्यक्ष होते. भेट सौहार्दपूर्ण झाली. दौऱ्यादरम्यान, मालदीवने भारताला मालेमधील दोन मशिदींचे नूतनीकरण करण्याची विनंती केली. ती वाजपेयी यांनी मान्य करून तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. आम्ही मालेहून थेट दिल्लीला परतणार होतो. तेवढ्यात खळबळजनक वृत्त आले, की अहमदाबाद येथील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे वाजपेयी यांनी त्वरित कार्यक्रम बदलला व आम्ही दिल्लीऐवजी मालेहून थेट अहमदाबादला पोहचलो. वाजपेयी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अक्षरधामला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहाणी केली व घटनाग्रस्त लोकांशी, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत झाल्यावर विमान दिल्लीला आले. 

चीनच्या संदर्भात वाजपेयी यांच्या राजकीय जीवनात दोन घटना घडल्या. आणीबाणीनंतर केंद्रात मोरारजीभाई देसाई यांचे सरकार आले. त्यात वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते. त्या पदावर असताना त्यांनी चीनला भेट दिली. या भेटीदरम्यान चीनने व्हिएतनामवर आक्रमण केले. त्यामुळे, वाजपेयी व भारताचा एकप्रकारे अपमान झाला. वाजपेयी यांना अर्ध्यातच दौरा आटोपून परतावे लागले होते. विशेष म्हणजे, दौऱ्या पूर्वी भेटीचा विषय संसदेत उपस्थित झाला, तेव्हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना सल्लाही दिला होता, की तुम्ही चीनला जाताय, पण जरा जपून राहा. 

ती भेट व पंतप्रधान झाल्यावर 2003 मध्ये वाजपेयी यांनी चीनला दिलेली भेट, यात बराच फरक होता. 2003 मध्ये झालेल्या भेटीतील समझोत्यांनुसार सिक्कीमधील नाथू ला या भारत-चीन सीमेवरील खिंडीतून दुतर्फा व्यापार सुरू करण्यावर सहमती झाली, ती आजही टिकून आहे. दोन्ही बाजूला चौक्‍या प्रस्थापित करण्याचे त्यावेळी ठरले. "तिबेट हा चीनच्या अंतर्गत स्वायत्त प्रांत आहे," भारताने मान्य केले. तर "सिक्कीम हे भारताचे राज्य आहे," हे चीनने मान्य केले. शिक्षण, कृषी, गैरपरंपरागत वीज निर्मिती, सागरी संशोधन क्षेत्रातील देवाणघेवाण व सहकार्य वाढविणे, व्हीसा प्रणाली सोपी करणे आदी विषयांवर सहमती झाली. तथापि, "तिबेटला चीनचा स्वायत्त प्रदेश म्हणून मान्यता दिली," याबाबत टीका झाली. या भेटीमुळे दुतर्फा संबंध सुधारले. 

वाजपेयी यांच्या कारकीर्दीत अयोध्येतील राम मंदिराची उभारणी झाली नाही, याबाबत त्यावेळचे सरसंघचालक सुदर्शन तसेच रास्वसंघाचे ज्येष्ठ नेते दत्तोपंत ठेंगडी यांनी त्यांच्यावर व अडवाणी यांच्यावर जोरदार टीका केली होती. परंतु, देशात धार्मिक समन्वय ठेवण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला नाही. "मेरी 51 कविताए" या त्यांच्या काव्य संग्रहातील कविता प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी -जोगळेकर यांनी गानबद्ध केल्या. त्या ऐकताना वाजपेयी भावुक झाले होते. गेल्या वर्षी पद्मजा फेणाणी दिल्लीस आल्या होत्या. वाजपेयी यांना भेटण्यास गेल्या, तेव्हा अत्यावस्थ अवस्थेतही त्यांनी प्रेमाने त्यांचा हात हातात घेतला. त्यांच्याकडे पाहिले. ते बोलू शकत नव्हते. पण डोळ्यातूनच त्यांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या. एक उत्तुंग नेतृत्व, उत्तम संसदपटू, भावनोक्‍ट कवि, ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा वक्ता, नेहरूंचा आदर करणारा भाजपचा ज्येष्ठ नेता, हळुवार विनोदांच्या झालरीची पखरण करीत विरोधकांना सुखावणारे अटलजी, ही त्यांची प्रतिमा कायमची आठवणीत राहील. असा नेता आता होणे नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com