`कृषिक`मध्ये शेवंतीच्या जाती, भाजीपाल्याची कलम केलेली रोपे ठरले आकर्षण

कृषिक प्रदर्शनाला शेतकऱ्यांची गर्दी
कृषिक प्रदर्शनाला शेतकऱ्यांची गर्दी

बारामती, जि. पुणे  ः येथे आयोजित कृषिक प्रदर्शनाला तिसऱ्या दिवशी (शनिवारी) राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्य तसेच परदेशांतील शेतकरी, शेतीतज्ज्ञांनी भेटी दिल्या. येथील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. शेवंतीच्या विविध जाती, पिवळ्या गराचे कलिंगड, कलम केलेल्या भाजीपाल्याची रोपे, सीताफळाच्या नवीन जाती, पेरू, नारळापासून ते आंब्यापर्यंतच्या फळरोपांविषयी शेतकऱ्यांना असलेले आकर्षण या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसून आले. पिकांच्या प्रात्यक्षिकांपासून ते कंपन्यांच्या तंत्रज्ञानापर्यंत आणि जनावरांच्या प्रदर्शनापासून ते भीमथडी जत्रेपर्यंत सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. 

शेतीतील नव्याने येऊ पाहत असलेली अवजारे पाहण्यासाठीदेखील शेतकऱ्यांनी गर्दी केली. गवळाऊ गायींपासून ते १०० किलोच्या बोअर, बिटल जातीच्या बोकडांपर्यंत आणि घोड्यापासून ते मेंढ्या, कडकनाथ कोंबड्यांपर्यंत आपल्याला जे शाश्वत शेतीसाठी उपयोगी पडेल, त्याची माहिती घेताना शेतकरी दिसत होते. भीमथडी जत्रेच्या आवारातही खवय्यांनी मोठी गर्दी केली होती. शेतीसाठीचे विळे, खुरप्यांपासून ते कुऱ्हाड, कुदळीसारख्या छोटछोट्या परंतु दैनंदिन आवश्यक असणाऱ्या अवजारांच्या स्टॉलवर केलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीने अनेकांचे लक्ष वेधले.  शुगरबीटच्या नव्या जाती, रंगीत रेशमाचा प्रयोग, गाजर, शेवगा, पुदीना, कढीपत्ता, हुलगा, कोथिंबीर, कांदा अशा पिकांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या पावडर किंवा सुकवून केलेल्या पदार्थांना शेतकऱ्यांनी पसंती दिली.  

रेशीमचा प्रयोग ठरला लक्षवेधी आतापर्यंत तुम्ही रेशीमच्या पांढऱ्या रंगाच्या अळ्या पाहिल्या असतील, मात्र बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केलेला पथदर्शी प्रयोग यशस्वी झाला तर येत्या काळात नैसर्गिक रंगीत रेशीम आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. कृषिक प्रदर्शनात सध्या कृषी महाविद्यालयाच्या एका स्टॉलमधील तीन विद्यार्थिनींनी येणाऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कर्नाटकातील शेतकऱ्यांचेही या स्टॉलने लक्ष वेधले.

या महाविद्यालयातील अमृता निंबाळकर, मानसी दास, समीक्षा पिसाळ या विद्यार्थिनींनी त्यांच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली रेशीम शेतीवर प्रयोग साकारला आहे. यामध्ये विशिष्ट सेंद्रिय द्रव्यात तुतीची पाने बुडवली. ती पाने रेशमाच्या अळ्यांनी खाल्ल्यानंतर त्यांचा रंग बदलला. आता या अळ्या जेव्हा ही पाने खात कोशावस्थेत जातील व त्यातून रेशमाचा कोष पांढऱ्या रंगाऐवजी रंगीत येईल, तेव्हा रेशीमच्या दुनियेत एक मैलाचा दगड रोवला जाईल. सध्यातरी हा विषय प्रयोगावस्थेत आहे, मात्र या प्रयोगाने राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना आताच आकर्षित करून विचार करायला भाग पाडले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com