लातूरमध्ये पालकमंत्र्यांच्या खुर्चीचा होणार लिलाव

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

लातूर : केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी निलंगा येथे २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रतीकात्मक खुर्चीचा लिलाव करण्यात येणार आहे. हा एक प्रकारे शासनाच्या इज्जतीचाच लिलाव असणार आहे.

यात आतापर्यंत शंभर रुपये नोंदणी शुल्क भरून दोन हजार शंभर शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांनी मंगळवारी (ता. १९) येथे पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमची लढाई सुरू आहे.

सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू, अशा घोषणा देत भाजपवाले सत्तेवर आले आहेत. तीन वर्षांपूर्वी असलेले शेतमालाचे भाव स्थिर ठेवण्यातही या सरकारला यश आलेले नाही.

शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करून पालकमंत्र्यांच्या प्रतीकात्मक खुर्चीचा लिलाव करण्यात येणार आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विरोधात असताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीचा लिलाव केला होता. पण आज ते मंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न विसरल्याचे श्री. साळुंके म्हणाले.

या लिलावासाठी शंभर रुपये नोंदणी शुल्क ठेवले आहे. आम्ही ठिकठिकाणी जनजागृती केल्याने यात आतापर्यंत दोन हजार शंभर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांनीदेखील यात नोंदणी केली आहे. या आंदोलनाला काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, छावा संघटनेने पाठिंबा दिला आहे.

लिलावाच्या वेळी शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील उपस्थित राहणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com