औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊस

औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊस
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊस

पुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्हा, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने येथे नुकसानही झाले, येथे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. उशिराचा मॉन्सून आणि वायू चक्रीवादळाने गायब झालेल्या बाष्पानंतर पुन्हा एकदा वरुणराजाच्या काही भागांतील जोरदार एंट्रीने बळिराजाला धीर आला आहे. सलग चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अजूनही दोन दिवस मुसळधार अंदाज कायम कायम असल्याने उर्वरित महाराष्ट्राची आस मॉन्सून सरींकडे लागली आहे. मॉन्सूनने राज्याच्या दक्षिण भागात आगमन होत असताना या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, विदर्भातील बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत जोरदार पाऊस पडला.  राज्यातील अनेक भागांत मॉन्सूनची गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिली होती. शनिवारी (ता. २२) दिवसभर या भागात ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातही हवामान अंशतः ढगाळ होते. रायगडमधील किहीम, रत्नागिरीमधील चिपळून, रामपूर, कळकावणे, शिरगाव, फनसोप, काठवडे, मुरदव, फुगूस, देवरूख, माबळे, सौंदळ, लांजा, भांबेड, विलवडे अशा अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली.  मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतही हवामान ढगाळ होते. दुपारनंतर या भागातील अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तर कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी येथे सर्वाधिक ४९ मिलिमीटर पाऊस पडला. तर सोलापुरातील माढा, कुर्डूवाडी, भाळवणी, जवळा,  हातेड, कोळा, नाझरा, सांगलीतील संख, माडग्याल, शेगाव, तंदूळवाडी, कोरेगाव, ढालगाव, कोल्हापुरातील कडगाव, नेसरी अशा अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. खानदेशातही अधूनमधून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. त्यामुळे कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक भागांत सकाळपासून हवामान ढगाळ होते. दुपारनंतर अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. तर बीड जिल्ह्यातील ताकलसिंग येथे सर्वाधिक ५५ मिलिमीटर पाऊस पडला, तर अंमळनेर येथे ५३ मिलिमीटर पाऊस पडला. तर कडा, धामनगाव, उस्मानाबादमधील उस्मानाबाद, मानकेश्वर, भूम, लेट या भागांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत उन्हाचा चटका कमी होता.  विदर्भातील बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. बुलडाणा जिल्ह्यातील कोलारा येथे ६५ मिलिमीटरची सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तर जामोद, कौठल, चिखली, एकलारा, कोलारा, मेरा, हातनी, दाड, मसाळा, हिवारा, डोनगाव, किनगाव, सोनाशी, खामगाव, शेणगाव, जाळंभ, वाशीममधील नागठाणा, यवतमाळमधील सावळी, अंजनखेड, वाटफळी, राजूर, चंद्रपूरमधील पडोली, तेमुर्डा, खेडसांगी, गंगाळवाडी, मेडकी, पाटन, गडचिरोलीमधील अरमोरी, देऊळगाव, जरवंडी, चातगाव, पेंढरी येथेही पावसाने जोरदार हजेरी. 

मराठवाड्यात संमिश्र हजेरी मराठवाड्यामध्ये रविवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत आठ जिल्ह्यांतील ७६ पैकी ५८ तालुक्यांमध्ये हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मानपुरा, फुलंब्री, वडोदबाजार, नागमठाण या चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. परंतु नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत पावसाचा जोर कमी होता.  येवल्यात दाणादाण येवला तालुक्यातील निमगाव मढ या गावात अतिवृष्टी झाली. गावाच्या पूर्व भागातील मंडपी नाल्यावरील १९९२ साली झालेला वाणी बंधारा पाणी साचून फुटला. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्यात वाहून गेला. शेततळ्यांच्या भिस्तीवर मोठ्या प्रमाणावर लावलेला भाजीपाला व टोमॅटो याचे नुकसान झाले. 

वऱ्हाडात पावसाळी वातावरण शनिवारी (ता. २२) वाशीम जिल्ह्यात सर्वत्र, बुलडाणा जिल्ह्यातही घाटावरील तालुक्यांमध्ये पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात पातूर, बाळापूर, अकोट, तेल्हारा या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अकोट तालुक्यातील विविध गावांतील केळी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. 

कोपरगावात अतिवृष्टी नगर जिल्ह्यातील शनिवारी-रविवारी रात्री-मध्यरात्री कोपरगाव, नेवासा, कर्जत, राहुरी, शेवगाव, नगरसह सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. अकरा महसूल मंडळांत चांगला पाऊस झाला. कोपरगाव मंडळात सर्वाधिक ब्राह्मणगाव येथे १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी (ता. २२) गोदावरी कालवे लाभक्षेत्रात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये : कोळगाव ६३, सोमठाणा ५२, शिर्डी १५, राहाता २६, रांजणगाव ७९, कोपरगाव १४७, देवगाव ५५,   ब्राह्मणगाव १२५, पढेगाव ३९. रविवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) (स्रोत ः कृषी विभाग)  

  • रायगड ः किहीम ३६  
  • र त्नागिरी ः चिपळून ३८, रामपूर ३०, कळकावणे ७०, शिरगाव ४०, रत्नागिरी ३२, खेडसी ३०, फनसोप ४०, काठवडे ६४, मालगुड ३९, मुरदव ४७, फुगूस ३२, देवळे ३१, देवरूख ४३, माबळे ५८, तेर्हे ३३, सौंदळ ४९, पाचल ४३, लांजा ४५, भांबेड ६९, विलवडे ४५, पाडेल ३४ 
  • सोलापूर ः माढा २१.६, कुर्डूवाडी ४४.८, भाळवणी १४, जवळा २०, हातेड २०, कोळा ३२, नाझरा ३०, 
  • सांगली ः संख १५, माडग्याल २४, शेगाव ४३, तंदुळवाडी १८, कोरेगाव २१, ढालगाव ३२, 
  • कोल्हापूर ः कडगाव २१, नेसरी ४९, 
  • बीड ः अंमळनेर ५३, ताकलसिंग ५५, कडा २२, धामनगाव १६, 
  • उस्मानाबाद ः उस्मानाबाद २६, मानकेश्वर ५०, भूम ४५, लेट २०, 
  • बुलडाणा ः जामोद ३०, कौठल ४७, चिखली ४१, एकलारा ५९, कोलारा ६५, मेरा ४६, हातनी ४८, दाड ३५, मसाळा ४०, जानेफळ ३२, हिवारा ४१, डोनगाव ३४, देऊळगाव ३०, लोणी ३९, नायगाव ३०, किनगाव ५७, सोनाशी ३८, खामगाव ३३, सा ४१, शेणगाव ३०, जाळंभ ३७, वाशीम ः नागठाणा ४४, 
  • यवतमाळ ः सावळी ४३, अंजनखेड २६, वाटफळी १९, राजूर २५, 
  • चंद्रपूर ः चंद्रपूर १७.२, पडोली २७.५, तेमुर्डा १३.६, खेडसांगी ३२.२, गंगाळवाडी ३२.४, मेडकी २५.५, पाटन ३२.२, 
  • गडचिरोली ः अरमोरी ६६.३, देऊळगाव ३८.६, जरवंडी ११.२, चातगाव २२.४, पेंढरी १२.६,
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com