बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव

गिरीश सोहनी
गिरीश सोहनी

पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात देशपातळीवर काम करणाऱ्या ''बायफ'' संस्थेची दखल घेत फ्रान्स सरकारने बायफचे अध्यक्ष गिरीश सोहनी यांची ''कमांडर इन द ऑर्डर ऑफ अॅग्रिकल्चर मेरिट'' या पदावर नियुक्ती केली आहे.

कृषी क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मिळाल्याबद्दल बायफमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून श्री. सोहनी यांचे कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशभरातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्या गेलेल्या बायफच्या कार्याचा वसा पाहून फ्रान्स प्रजासत्ताकच्या कृषी, अन्न व वन मंत्रालयाच्या वतीने श्री. सोहनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झाएग्लर यांनी अलीकडेच दिल्लीत श्री. सोहनी यांना नियुक्तीपत्र देत सन्मानित केले.

"वंचित घटकांच्या उन्नतीसाठी विविधांगी उपक्रमांमधून गेली ५० वर्षे काम करणाऱ्या बायफच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी फ्रान्स सरकारचा ऋणी आहे. मानवी विकासासाठी विशेषतः छोट्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बायफच्या उपक्रमांना फ्रान्सकडून सतत प्रोत्साहन मिळते आहे, अशा शब्दांत श्री. सोहनी यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

"बायफच्या कामकाजाचा फ्रान्स सरकारला आदर वाटतो. त्यामुळेच बायफचे अध्यक्ष श्री. सोहनी यांची ''कमांडर इन द ऑर्डर ऑफ अॅग्रिकल्चर मेरीट'' या पदावर नियुक्ती केली गेली आहे. बायफ आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त उपक्रमांची वाटचाल आणखी बळकट करणारी घटना आहे, असे गौरवोद्गगार फ्रान्सच्या राजदूतांनी काढले आहेत.

बायफ विकास संशोधन संस्थेकडून गेल्या पाच दशकांपासून ग्रामविकासात सामाजिक उपक्रम राबविले जात असून यात फ्रान्सचादेखील सहभाग आहे. पशुसंवर्धन, शेती, हवामान बदल अशा विविध विषयांत बायफकडून सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये फ्रान्सनेदेखील सहभाग घेतलेला आहे.

ग्रामविकाससाठी फ्रान्सच्या राष्ट्रीय कृषी विकास संशोधन संस्था व इतर आघाडीच्या संशोधन यंत्रणांसमवेत बायफने यापुढेदेखील काम करण्याचे ठरविले आहे. यामुळे ग्रामीण भागाच्या प्रगतीत वापरल्या जात असलेल्या तांत्रिक बाजूंचा विकास होतो, असे बायफच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com