वाळूउपशावर बंदी आणण्याचे महसूलमंत्र्यांचे संकेत

विधीमंडळ अधिवेशन
विधीमंडळ अधिवेशन

नागपूर   : नद्यांचे आटत चाललेले स्रोत आणि पर्यावरणाची हानी लक्षात घेऊन प्लॅस्टिक बंदीप्रमाणे वाळूउपशावर बंदी आणण्याचा विचार सरकारला करावा लागेल, असे सांगत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत नजीकच्या काळात वाळूउपशावर बंदी आणण्याचे संकेत दिले.

वाळूला पर्याय निर्माण होईपर्यंत अशी बंदी घालता येणार नाही. सरकारने वाळूला पर्याय म्हणून स्टोन क्रशिंगला परवानगी दिली आहे. मलेशिया या देशाने महाराष्ट्रासाठी वाळू निर्यात करण्याची तयारी दाखवली आहे. सध्या आंध्र प्रदेश सरकारकडून वाळू आयातीचा प्रयोग सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात वसई तालुक्यातील उसगाव, चांदीप येथील तानसा नदीपात्रात वाळूउपशामुळे दोन मजुरांचा मृत्यू झाल्याबद्दलचा प्रश्न बोईसरचे आमदार विलास तरे यांनी उपस्थित केला होता. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्लॅस्टिक बंदीप्रमाणे वाळूउपशावर बंदी आणण्याची मागणी केली. त्याला उतार देताना श्री. पाटील यांनी वाळूउपशावर लगेच बंदी घालणे शक्य नसल्याचे सांगितले.

परवानगीपेक्षा जास्त वाळूचा उपसा करायचा, लिलावात एक साठा घ्यायचा आणि बाजूच्या साठ्यातील वाळू काढायची या प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून पाचपट दंड आकारला जात आहे. अवैध वाळूप्रकरणी गेल्या वर्षभरात २२ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली. रस्ते, धरण यांसारख्या सरकारी कामाला वाळूची अडचण येऊ नये म्हणून त्यांना वाळू लिलावात जाण्याची गरज नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. वैयक्तिक घर बांधणीसाठी परवाना शुल्क भरून दोन ब्रास वाळू घेऊन जाण्याची सध्या तरतूद आहे. ही तरतूद लवकरच पाच ब्रास इतकी केली जाईल. तर दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाकडून वाळूसाठी परवाना शुल्क आकारले जात नसल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने २१०० पुलांचे ऑडिट पूर्ण केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन जवळच्या ब्रिटिशकालीन दगडी पुलाच्या पुनर्बांधणीबाबत  राजाभाऊ वाजे यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर पोटे-पाटील यांनी अतिधोकादायक पुलांच्या बांधणीचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com