मरणासन्न जमीन - भाग 2
मरणासन्न जमीन - भाग 2

जळगाव जिल्ह्यात केळी, कपाशीची उत्पादकता घसरतेय

जळगाव ः जिल्ह्यातील जमिनीत सेंद्रीय कर्ब व स्फुरदची स्थिती चिंताजनक बनल्याने जमिनीचे आरोग्य ढासळल्याचे समोर आले आहे. यामुळे केळी, कपाशीची उत्पादकता घसरत चालली अाहे.
 
यातच कृषी विभाग विविध पिकांच्या उत्पादकतेसंबंधी जे उद्दिष्ट ठरवितो ते उद्दिष्ट गाठणे शक्‍य होत नाही. सलग पिके घेत राहणे, सेंद्रिय खतांचा अल्प वापर, रासायनिक खतांचा बेसुमार किंवा असंतुलित यामुळे सुपीकतेवर परिणाम होत अाहे. यामुळे पुढील काळात नव्या पिढीला नापिक जमिनींच्या संकटाला तर तोंड द्यावे लागणार नाही ना, अशी भीतीही निर्माण झाली आहे.
 
जिल्ह्याचे खरिपाखालील (ऊस पिकासह) एकूण क्षेत्र आठ लाख ४४ हजार ८२६ हेक्‍टर आहे. यात सर्वाधिक पावणेपाच लाख हेक्‍टरवर कपाशी असते. उसाचे क्षेत्र १० हजार ५६३ हेक्‍टर आहे. तर तेलबियांखालील क्षेत्र २९ हजार २५८ हेक्‍टर असून, कडधान्याची पेरणी दोन लाख ३९ हजार १९६ हेक्‍टर असते. तृणधान्य एक लाख ७३ हजार ६४२ हेक्‍टरवर आहे.
 
या खरिपाखालील क्षेत्राव्यतिरिक्त केळीचे क्षेत्र दरवर्षी किमान ४५ हजार हेक्‍टरपर्यंत असते. पेरणीची ही आकडेवारी लक्षात घेता कपाशी अधिक असते. त्यात बीटी कपाशीचे क्षेत्र ९७ टक्के आहे. केळी व कपाशी लागवडीत जळगाव राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. मागील पाच वर्षांची लागवड किंवा पेरणीची माहिती लक्षात घेता केळीचे क्षेत्र सरासरी ४८ हजार हेक्‍टर, तर कपाशीचे क्षेत्र सरासरी चार लाख ५५ हजार हेक्‍टर राहिले आहे. 
 
पूर्वहंगामी कपाशी लाखभर हेक्‍टर असते. अर्थातच जे परंपरागत केळी उत्पादक आहेत; ते केळीची सातत्याने लागवड करीत आहेत. तर पूर्वहंगामी व कोरडवाहू कापूस उत्पादकही सातत्याने अधिक पैसा देणारे पीक म्हणून कपाशीचीच लागवड करीत आहेत. चोपडा, यावल, रावेर, पाचोरा, जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव या तालुक्‍यांमध्ये पिकांची फेरपालट करणे, एखादा हंगाम जमीन नापेर ठेवणे याबाबत सकारात्मक निष्कर्ष नाहीत.
 
दुसऱ्या बाजूला अधिक उत्पादनासाठी विद्राव्य खते, रासायनिक खते यांचा वापर अधिक होत आहे. प्रतिदिन खत व्यवस्थापन ही संकल्पना चोपडा, रावेर, यावलमध्ये रुजली आहे. तीच इतरही आत्मसात करीत असून, जेवढी नत्र, स्फुरद, सेंद्रिय कर्बाची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर सुरू आहे.
मी ५२ वर्षे शेती करीत आहे. पूर्वी पशुधन असायचे. शेतीत भरपूर शेणखत टाकले जायचे. पण पशुधन पाळण्यासाठी मजूर, सालगडी महागडे बनले. पशुधन कमी झाले. आता अधिक उत्पादनासाठी बेसुमार रासायनिक खते वापरतात. जमिनीवर जुलूम सुरू आहे. हे लक्षात घेऊन जे अन्नघटक जेवढे आपल्या शरीराला लागतात तेवढेच आपण खातो, तसेच जमिनीबाबतही आहे.
- कृषिभूषण वसंतराव महाजन, केळी उत्पादक, चिनावल (ता. रावेर, जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com