अकोला जिल्ह्यातील केळीचा पट्टा होरपळला

दुष्काळामुळे केळी बागांचे नुकसान
दुष्काळामुळे केळी बागांचे नुकसान

अकोला  ः जिल्ह्यातून दोन वर्षांपासून केळीची निर्यात व्हायला सुरुवात झाली होती. केळी पिकाला चांगली मागणी व भाव मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे वळू लागले. जिल्ह्यातील सातपुड्याचा पायथा असलेल्या अकोट व तेल्हारा तालुक्यातील हा भाग एक नवी ओळख निर्माण करू लागला होता. मात्र आता निसर्गाच्या अवकृपेने हा भाग अक्षरशः होरपळला आहे. अचानक पाणी कमी झाल्याने, दुष्काळी स्थिती तसेच हवामान बदलाचा इतका फटका बसला की अनेक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. लागवड केलेली केळी काढायलाही आता येथील शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत. 

अकोट तालुक्यातील पणज, बोचरा, रूईखेड, महागाव, वाई आदी गावांचा दौरा केला असता केळी उत्पादकांच्या अडचणी स्पष्ट झाल्या. प्रत्येक शेतकऱ्याला लाखांवर नुकसान झेलावे लागत आहे. अशा परिस्थितीत कुठलीही यंत्रणा, लोकप्रतिनिधी आधार देण्यासाठीही या शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले नसल्याची बाब समोर आली. कुणाच्या शेतात केळीचे खांब कापण्याचे काम सुरू होते. कुठे म्हशींचा कळप केळीच्या शेतात चरत होता, तर काही शेतात केळी पिकाचे अवशेष गोळा करण्याचे, जाळण्याचे काम सुरू होते. 

अकोटला लागूनच असलेल्या वाई येथील श्रीकांत गणेशराव कराळे यांनी गेल्या वर्षी १४ जूनला चार एकरांत टिश्यू कल्चर केळीची लागवड केली होती. यासाठी चार लाखापर्यंत खर्च केला होता. फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही बाग सुस्थितीत होती. मात्र अचानक ही बाग उभी करपली. उष्णतामान वाढले, विहिरीतील पाणी कमी झाले. बोअरमधील पाणीसुद्धा टप्पे घेऊ लागले. दरम्यानच्या काळात माल काढणी सुरू होती. यातून दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले. नंतर मात्र केळी उभी वाळली.

हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेली ही बाग या आठवड्यात जड अंतःकरणाने तोडायला सुरवात केली. पणज येथील ओमप्रकाश विनायकराव शेंडे यांचीही अशीच व्यथा. त्यांनीही शेतातील बाग एकाच वर्षात तोडून टाकली. विहिरीचे पाणी आटल्याने पिकाला द्यायला पाणी नव्हते. बोअरच्या पाण्यावर केळी वाचविण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. आधी थंडीची लाट व नंतर उष्णतामान वाढल्याने अतोनात नुकसान झेलावे लागले. बोचरा शिवारात अनिकेत बोचे यांच्या शेतातही केळीची बाग तोडण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले. या कुटुंबाने केळी वाचविण्यासाठी तब्बल ११ ठिकाणी बोअर घेतले. त्यापैक नऊ बोअरला थेंबभरही पाणी मिळाले नाही. दोन बोअरमधून अल्पसे पाणी मिळते. एप्रिल महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे केळीची उभी बाग वाळून गेली. अशीच अवस्था या पट्ट्यात अनेक शेतकऱ्यांची झालेली आहे.  

केळीच्या एका झाडाला लागवडीपासून कापणीपर्यंत सुमारे ७० रुपयांपर्यत खर्च लागतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले. या भागातील प्रत्येक शेतकऱ्याकडे चार हजार, पाच हजार केळीची लागवड आहे. यासाठी प्रत्येकाचा साधारणतः तीन ते चार लाख रुपयांचा खर्च प्रत्येकाचा झालेला आहे. अशा स्थितीत बाग तोडावी लागत असल्याने मोठ्या नुकसानाला हे शेतकरी सामोरे जात आहेत. 

टिश्यू कल्चर बुकिंगचे धाडस नाही या भागातून केळीची निर्यात सुरू झाल्याने उत्साही वातावरण बनले होते. चांगले दर मिळतील या अपेक्षेने बहुतांश शेतकरी या पिकाकडे वळाले. यामुळे या भागात केळी रोपांचा पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यांचे प्रतिनिधी सक्रिय झाले होते. ठिबक संचाची विक्री वाढली. केळीचे रायपनिंग सेंटर सुरू झाले. मजुरांच्या हातांना काम वाढले, रासायनिक खतांची विक्रीही वाढली, असा सर्वांनाच फायदा व्हायला सुरुवात झाली होती. मात्र एकाच वर्षात हा उत्साह मावळला आहे. ज्या बागांमधून हमखास पीक यायला पाहिजे त्याच बागा तोडण्याचे काम सुरू आहे.

येत्या हंगामात नवीन लागवड किती शेतकरी करतील याबाबत कोणीही सांगत नाही. केळीचे पीक अशा पद्धतीने वर्षभरातच ‘रिव्हर्स’ झाल्याने कोट्यवधींच्या उलाढालीवरही परिणाम होणार आहे. टिश्यू कल्चर रोपांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपुढे यामुळे पेच तयार झाला आहे. सोबतच संलग्न बाबींचे उभे राहिलेले मार्केटही विस्कळित होण्याची चिन्हे आहेत. 

पाण्याचा शोध कायम  केळीची बाग वाचविण्यासाठी पाणी लागेल या आशेने शेतकरी शेताच्या कानाकोपऱ्यात बोअर घेत आहेत. कुणी दोनशे फूट, कुणी तीनशे तर कुणी साडेचारशे फुटांपर्यंत बोअर खोदून पाहिले. पण पाणी मात्र मिळाले नाही. बोअर खोदणाऱ्या दक्षिण भारतीय यंत्रांना मोठे काम या दुष्काळाने उपलब्ध करून दिले. बोअर खोदण्याची मागणी वाढल्याने या यंत्रचालकांकडून अव्वाच्या सव्वा दर घेतले जात आहेत. १५० ते १८० रुपये फुटांनी बोअर खोदले जात आहेत. सोबतच या बोअरमध्ये टाकण्यासाठी केसिंग पाइप, कृषिपंपांची विक्री वाढलेली आहे. एक बोअर खोदणे, पंप बसविणे यासाठी साधारणतः दोन लाखांपर्यंतचा खर्च होत असतो.   अशी आहे स्थिती

  • केळी उत्पादक गावे :  पणज, बोचरा, दिवठाणा, रुईखेड, अकोली जहाँगीर, महागाव, अंबोडा, बोर्डी, रामपूर, शिवपूर, पिंप्री, उमरा, गीतापूर, मकरापूर. 
  • लागवडीचे अंदाजे क्षेत्र ः एक हजार हेक्टरपेक्षा अधिक
  • नुकसानग्रस्त क्षेत्र ः किमान ५० टक्क्यांपेक्षा अधिक
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com