चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच

चीन दर आवड्याला २०० कंटेनर केळीची आयात करतो. परंतु चीनमध्ये भारतातून केळी निर्यातीसाठी अडथळे आहेत. ते दूर होण्यासाठी दोन्ही देशांमधील विदेश व्यापार विभाग व इतर संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. मी या अडथळ्यासंबंधी चीनमधील हेयनान कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांशी चर्चा केली असून, त्यांनी आपल्या स्तरावरून शक्‍य ते प्रयत्न करण्याचे मला सांगितले. - के. बी. पाटील, जागतिक केळीतज्ज्ञ
केळी
केळी

जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे चीनमधील केळीखालील क्षेत्र मागील आठ वर्षांत पावणेचार लाख हेक्‍टरने घटले असून, चीनला केळीसाठी आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. चीनला भारतीय केळी इतर देशांमधील केळीच्या तुलनेत किलोमागे किमान २० रुपयांनी स्वस्त पडते. परंतु चीनमध्ये केळी निर्यात अनेक वर्षांपासून बंद असल्याने केळीच्या व्यापाराला अडथळे आहेत. हे अडथळे दूर करण्यासंबंधी चीनमधील हेयनान कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांसमोर जळगाव येथील जागतिक केळीतज्ज्ञ के. बी. पाटील तसेच केळी क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी पाठपुरावा करण्यासह मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.  चीनमध्ये भारतीय कापसाची निर्यात बऱ्यापैकी होते. चीन भारतीय कापसाचा क्रमांक दोन-तीनचा खरेदीदार म्हणून दरवर्षी समोर येतो. परंतु चीनमधील केळीची निर्यात भारतातून होतच नाही. ती अनेक वर्षे बंद आहे. 

चीनला फटका, आयात वाढविली चीनमध्ये २०१० मध्ये केळीखालील क्षेत्र सहा लाख ७५ हजार हेक्‍टर एवढे होते. परंतु अतिथंडी व फिजारियम विल्ट या समस्येमुळे केळीखालील क्षेत्र कमी झाले. तेथील हेयनान व ग्वांजडॉंग भागात केळी अधिक असून, आजघडीला फक्त तीन लाख हेक्‍टरवर केळीखालील क्षेत्र चीनमध्ये आहे. चीन सध्या दर आठवड्याला २०० कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) केळीची आयात करीत आहे. चीन केळीची आयात फिलिपिन्स, कोलंबिया, इक्वेडोर या देशांमधून करतो. तेथून चीनमध्ये केळी समुद्रमार्गे येण्यास सुमारे २५ ते ३० दिवस लागतात. तेथील केळी चीनला प्रतिकिलो ६० ते ६४ रुपये या दरात मिळते. 

भारतातून आयात केली तर स्वस्त व लवकर केळी मिळणार चीनने भारतातून केळीची आयात केली तर समुद्रमार्गे तेथे १२ ते १३ दिवसात केळी पोचविता येईल. तेथील आयातदारांना भारतीय केळी ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो, या दरात मिळेल. म्हणजेच इतर देशांच्या तुलनेत ती २० रुपयांनी स्वस्त असेल. शिवाय भारतीय केळी जगात उत्तम दर्जाची व अवशेषमुक्त आहे.  बुरशीनाशकांच्या फवारण्या केळीवर भारतात अपवादाने केल्या जातात. यामुळे भारतीय केळी उत्तम व आरोग्यास कुठलीही बाधा पोचविणारी नसल्याचे चीनमधील हेयनान कृषी विद्यापीठातील कृषी, अर्थतज्ज्ञांनी जागतिक केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांनी पटवून दिले. तसेच चीनकडून भारतीय केळीच्या आयातीवर असलेले निर्बंध दूर करण्यासाठी पाठपुरावा केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील, असा मुद्दाही चीनमधील तज्ज्ञांसमोर उपस्थित केला. या तज्ज्ञांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसादही दिल्याचे सांगण्यात आले. भारतातून सध्या फक्त आखाती देशांसह मलेशियामध्ये केळीची दाक्षिणात्य व मध्य भारतातील राज्यांमधून केळीची निर्यात केली जाते. चीनमध्ये केळीची निर्यात सुरू झाली तर देशांतर्गत बाजारातील केळी दरांवरील दबाव दूर होईल. दर टिकून राहतील. केळी उत्पादकांना त्याचा मोठा लाभ दिसेल, अशी माहिती मिळाली.  चीनमधील तज्ज्ञांकडून खानदेशात पाहणी खानदेशात केळी पीक व्यवस्थापन व त्याचे अर्थशास्त्र, पॅकेजिंग आदी मुद्यांबाबत चीनमधील हेयनान कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ इशीजे, यूएज, झुओमीन झांग, फेईयंग यांनी तांदलवाडी (ता. रावेर) व इतर भागातील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन केळीची शेती, पॅकेजिंग व अर्थशास्त्र समजून घेतले. केळीचा दर्जा चांगला असल्याचेही या तज्ज्ञांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com