शेतकऱ्यांसाठी केळीही ठरतेय आतबट्ट्याची

केळीचे तीन दर असतात. पारंपरिक केळी उत्पादकांना जेवढा खर्च तेवढेच किंवा त्यापेक्षा एकरी २० ते २५ हजार अधिकचे उत्पादन मिळते. वर्षभर २० ते २५ हजारांसाठी शेतकरी केळीची शेती करतो, असा याचा अर्थ आहे. दरांबाबत ठोस धोरण शासनाने ठरवावे. - डॉ. सत्तवशील पाटील, केळी उत्पादक,कठोरा (जि. जळगाव)
केळी
केळी

जळगाव ः केळी उत्पादकांसाठी मागील दोन वर्षे बरी गेली, परंतु मजुरी, वाहतूक, विद्राव्य खते या संदर्भातील उत्पादन खर्च दरवर्षी सात टक्‍क्‍यांनी वाढत आहे. रावेर तालुक्‍यातील ऊतिसंवर्धित केळी रोपांद्वारे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा १०० रुपये प्रतिझाडपेक्षा अधिक खर्च व उत्पादन २१५ रुपये प्रतिझाड, असा या वर्षाचा ताळेबंद आहे. उत्पादनखर्च वाढतच राहिला व दरांबाबत खासगी व्यापाऱ्यांनी निर्माण केलेला गोंधळ, मक्तेदारी हे कायम राहिले तर केळीही आतबट्ट्याचे पीक बनेल, असे चित्र तूर्ततरी आहे.  जळगाव जिल्ह्यात देशात सर्वाधिक केळी लागवड केली जाते. अलीकडे केळीचे आगार असलेल्या यावल, रावेरातील अनेक शेतकरी फ्रूट केअर तंत्रज्ञानाकडे वळले आहेत. हे तंत्रज्ञान आत्मसात करीत असतानाच नव्या खर्चालाही सामोरे जावे लागत आहे. जळगाव जिल्ह्याची उत्पादकता ६० मेट्रिक टन हेक्‍टरी एवढी आहे. रावेरातील कमाल ऊतिसंवर्धित केळी रोपांचे उत्पादन घेणारे शेतकरी २६ ते २७ टन एकरी केळीचे उत्पादन घेत आहेत.  परंतु दरांबाबत नेहमीच गोंधळ राहिला. तो आजही कायम आहे. तीन दर असून, नवती किंवा कांदेबाग, जुनारी व वापसी, असे दर रावेर बाजार समिती जाहीर करते. दरांबाबत बाजार समितीचे नियंत्रण नाही. एक गट व्यापारात हावी झाला असून, पूर्ण बाजार खासगी मंडळीने ताब्यात घेतला आहे. सहकारी संस्थांनी जवळपास केळी खरेदीच्या व्यापारातून माघार घेतली आहे. जे दर जाहीर होतात त्यापेक्षा २०० रुपये कमी एक क्विंटलमागे देण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत. त्यामुळे उत्पन्नावर आणखी परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. २०१४ व २०१५ या वर्षांच्या तुलनेत केळी उत्पादकांना मागील दोन वर्षात सरासरी ७०० व सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. काही केळी उत्पादकांना यापेक्षा अधिकचा दरही मिळाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  उत्पादनखर्चासंबंधी केळी कंदाचे दर दोन वर्षात दीड रुपये प्रतिकंद, असे वाढले. इंधन दरांच्या गोंधळामुळे वाहतूक खर्चही वाढला असून, केळी वाहतूक दर दोन वर्षांत एका घडामागे एक रुपये वाढला. केळी पट्ट्याच वीजबिलांची वसुली मोहीम सुरूच असते. हादेखील वर्षाला किमान २० हजार रुपये खर्च १० अश्‍वशक्तीच्या पंपामागे आहेच. १८ महिने कालावधीचे केळीचे पीक असून, यात गारपीट, उष्णतेमुळे अनेकदा रावेर, यावल, चोपडा व भडगावमधील शेतकऱ्यांना नुकसानही सहन करावे लागते.  फ्रूट केअर तंत्रज्ञानांतर्गत केळी उत्पादनाचा एकरी खर्च  

नांगरणी व मशागत १ हजार ५००
शेणखत  ४ हजार ५०० (चार ट्रॉली) 
सूक्ष्मसिंचन लॅट्रल (आयएसआय)   १४ हजार
सूक्ष्मसिंचनसंबंधी पाइप्स (प्रमाणित)  १० हजार
केळीची उतिसंवर्धि रोपे   १८ हजार २००
रोपे लागवड   १३००
विद्राव्य व रासायनिक खते  ४ हजार (किमान) 
मल्चिंग  दोन हजार
तणनियंत्रण (तीन वेळा)  तीन हजार
सूक्ष्मसिंचन यंत्रणा कार्यान्वित करणे    दोन हजार
स्कर्टिंग बॅग    चार हजार ५००
घड झाकणे १ हजार ३००
घड वाहतूक ७ हजार ८०० (किमान) 
क्षेत्र रिकामे करणे     तीन हजार  
वीजबिल (१० अश्‍वशक्ती)    २० हजार (किमान)
इतर   पाच हजार

(टीप- या खर्चात शेतकऱ्याचा मेहनताना व इतर किरकोळ खर्च गृहीत धरलेला नाही.) केळीचे सरासरी दर (प्रतिक्विंटल/रुपये)

वर्ष     दर
२०१४   ४००
२०१५     ५००
२०१६   ६५०
२०१७  ८००

प्रतिक्रिया ऊतिसंवर्धित केळी उत्पादनासाठी बारीक सारीक खर्च धरून प्रतिझाड १०० ते ११० रुपयांवर खर्च येतो. कंद व पारंपरिक पद्धतीने केळी उत्पादनासाठीही किमान ६० ते ७० रुपये प्रतिझाड, असा खर्च येतो. मागील दोन वर्षे १०० रुपये खर्च आणि २१५ ते २२५ रुपये प्रतिझाड उत्पादन आले. म्हणजेच ११५ रुपये नफा एका झाडामागे मिळाला. दर टिकून राहावेत व खर्च कमी व्हावा.  - विशाल गंभीर पाटील, केळी उत्पादक, केऱ्हाळे (जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com