भारतीय कापसाची सर्वाधिक आयात बांगलादेशकडून

भारतीय कापसाची सर्वाधिक आयात बांगलादेशकडून
भारतीय कापसाची सर्वाधिक आयात बांगलादेशकडून

जळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार म्हणून छोटासा बांगलादेश पुढे आला आहे. तेथे भारतातून आतापर्यंत सुमारे २१ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्यात झाली असून, भारतीय कापसाचा मोठा आयातदार म्हणून बांगलादेशने जागा घेतली आहे. याच वेळी चीनच्या तुलनेत भारतातून अधिक कापूस आयात करणारा देश म्हणूनही बांगलादेश समोर आल्याची माहिती जाणकार व सूत निर्यातदारांनी दिली आहे.

पूर्वी चीन भारतातून कापसाची दरवर्षी सुमारे १७ ते १८ लाख गाठींची आयात करायचा. परंतु, मागील दोन वर्षे चीनने सूत आयातीवर भर देत रुई किंवा कापसाची आयात कमी केली आहे. चीनमध्ये दोन हंगामांत सुमारे १९ लाख गाठींची निर्यात भारतातून झाली. तर बांगलादेशने दोन हंगामात सुमारे ३६ लाख गाठींची आयात केली. बांगलादेशला निर्यातीवर निर्बंध नाहीत. जहाजाने कलकत्ता व इतर बंदरावरून बांगलादेशातील चिटगाव येथे कापूस पाठविला जातो. तर कलकत्ताजवळील बेनपोल येथून रस्त्याच्या मार्गाने कापसाची वाहतूक बांगलादेशात होत आहे. बांगलादेशला भारत जवळ असल्याने वाहतुकीवर खर्चही कमी होत असल्याचे सांगण्यात आले.

कापूस उत्पादन नाममात्र बांगलादेशात कापसाचे सुमारे आठ लाख गाठींचेही उत्पादन दरवर्षी होत नाही. जगातील कापूस उत्पादनासंबंधीच्या मुद्यावर बांगलादेशला गृहीतही धरले जात नाही. असे असले तरी बांगलादेशची कापूस उत्पादकता भारतापेक्षा अधिक म्हणजेच हेक्‍टरी ६५० किलो रुईपर्यंत आहे. आपल्या सूतगिरण्यांना लागणाऱ्या ९० टक्के रुईची आयात बांगलादेशला करावी लागते. त्यासाठी बांदलादेश अलीकडे भारताला पसंती देऊ लागला आहे, अशी माहिती खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद जैन यांनी दिली.

३५ टक्के परकीय गुंतवणूक बांगलादेशात सुमारे ८५ सूतगिरण्या आहेत. पॉवरलूममधील गारमेंट व प्रोसेसिंग उद्योग तेथे अधिक आहे. भारतातील भिवंडी व मालेगावसारखे पॉवरलूमचे क्षेत्र बांगलादेशातील ढाका, नारायणगंज आदी भागात आहेत. तेथील कापड व सूतगिरण्या या वस्त्रोद्योगात सुमारे ३५ टक्के परकीय गुंतवणूक आहे. कारण आयात व निर्यातीसंबंधी शुल्क लागत नाही. तसेच गरीब देश म्हणून बांगलादेशचा कापड युरोपीयन युनियन व अमेरिकेतून खरेदी केले जाते. चीनने बांगलादेशातील वस्त्रोद्योगात मोठी गुंतवणूक केली आहे. यासोबत भारतीय कापड उद्योजकही बांगलादेशात आपला व्यवसाय चालवू लागले आहेत. प्रदूषणाच्या मुद्यापासूनही तेथील पॉवरलूमचे क्षेत्र दूर आहे. यामुळे बांगलादेशात वस्त्रोद्योग सर्वाधिक रोजगार उपलब्ध करणारे क्षेत्र म्हणूनही समोर आल्याची माहिती मिळाली. सध्या अमेरिका व चीनचे व्यापार युद्ध सुरू असले तरी अमेरिकेतून बांगलादेशातील चीनची मोठी गुंतवणूक असलेल्या वस्त्रोद्योगाला रुईचा पुरवठा सुरू आहे. अमेरिकेतूनही दरवर्षी बांगलादेश सुमारे २५ ते २८ लाख गाठींची आयात करतो. बांगलादेश व भारतीय वस्त्रोद्योगातील आयात निर्यात, व्यापारविषयक संबंध व इतर बाबी लक्षात घेता भारताने बांगलादेशात पश्‍चिम बंगालमधून रेल्वेचे जाळेही तयार करायला सुरवात केल्याचा दावा जाणकारांनी केला आहे.

पाकिस्तानच्या तुलनेत मजबूत टाका वस्त्रोद्योगामुळे बांगलादेशाला रोजगार जसा मिळाला, तसा तेथील अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार असून, पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशी अर्थव्यवस्था मजबूत आहे. पाकिस्तानमध्येही रुपया हे चलन आहे. सध्या पाकिस्तानला एक यूएस डॉलर १०५ रुपयांना पडतो. तर बांगलादेशचे चलन टाका असून, त्यांना एक डॉलर सुमारे ८५ पैशांना पडतो. भारताला एक डॉलर सध्या ६५.३१ पैशांना मिळत आहे. अर्थातच पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशची अर्थव्यवस्था मजबूत असल्याची माहिती लोणखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक राजाराम दुल्लभ पाटील यांनी दिली.

भारतीय कापसाची सर्वाधिक आयात बांगलादेशकडून
भारतीय कापसाची सर्वाधिक आयात बांगलादेशकडूनagrowon

बांगलादेश आपल्याकडून कापूस किंवा रुईची आयात करतो. तेथे रुईपासून सूत व नंतर कापडनिर्मिती चीन, भारताच्या तुलनेत स्वस्त पडते. वीजही तेथे भारताच्या तुलनेत स्वस्त दरात वस्त्रोद्योगाला मिळते. ड्युटी फ्री असे धोरण भारताने बांगलादेशबाबात स्वीकारल्याने बांगलादेशचे तयार कपडे (गारमेंट) अधिक प्रमाणात भारतीय बाजारात येतात. कापूस उत्पादनात बांगलादेश गृहीतही धरला जात नाही, परंतु वस्त्रोद्योगासंबंधी बांगलादेश एका दशकात पुढे गेला आहे. भारतीय उद्योजकांनी तेथे मोठी गुंतवणूक मागील पाच- सहा वर्षांत केली आहे. तेथील वस्त्रोद्योगाची आम्ही उत्सुकतेपोटी पाहणी मागील वर्षी केली आहे. - दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, लोणखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com