बीजी-२ बियाण्यांचे नमुने सदोष

कृषी विभागाने कापूस पट्ट्यातील गावांमध्ये ‘बीजी-२’ बियाण्यांच्या लागवडीची माहिती घेतली. सप्टेंबरअखेर ५७१ गावांत या वाणाचे नमुने सदोष आढळले. दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील कापसाचे पीक बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई बियाणे कंपन्यांकडून केली जाणार आहे. -विजय कुमार , प्रधान सचिव, कृषी
गुलाबी बोंडअळीने पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित
गुलाबी बोंडअळीने पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित

मुंबई : प्रतिकारशक्ती कमी झाल्याने कपाशीचे ‘बीजी-२’ वाण गुलाबी बोंडअळीला बळी पडू लागले आहे. कृषी विभागाने नुकत्याच केलेल्या एका पाहणीत कापूस पट्ट्यातील ५७१ गावांमध्ये या संदर्भातिल सदोष नमुने आढळले आहेत. अळीच्या प्रादुर्भावाने तब्बल १ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे पीक बाधित झाले. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांकडून वसूल करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध प्रसंगी गुन्हे दाखल करण्याचा निर्णयही घेतल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

कमी खर्च आणि उत्पादकतावाढीच्या आशेवर शेतकरी ‘बीजी-२’ची लागवड करतात. ‘बीजी-२’ बियाण्याच्या प्रतिपाकिटाची किंमत ९२५ ते १,०५० रुपये इतकी आहे. एका एकरासाठी किमान तीन पॅकेट बियाण्याची आवश्यकता भासते. मात्र, प्रत्येक वर्षीच्या हंगामात बीटी बियाण्यांची हमखास काळ्या बाजारात भरमसाठ दराने विक्री होते.

या काळात एका पाकिटाची किंमत १,७०० रुपयांपासून ते २,५०० रुपयांवर जाते. राज्यात ८५ कंपन्या बीटी बियाण्यांची निर्मिती करतात आणि या बियाण्याचा शेतकऱ्यांना पुरवठा करतात. हजारो रुपये खर्च करून शेतकरी ‘बीजी-२’ बियाण्याची लागवड करतात. बियाण्याच्या माध्यमातून कंपन्या रग्गड पैसा कमावतात. शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होते, अशी अवस्था आहे.

पंचनामावेळी कंपन्यांचे अधिकारी सोबत या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाने कापूस उत्पादक पट्ट्यातील गावांमध्ये पाहणी केली. या वेळी ‘बीजी-२’ बियाण्यांच्या उत्पादनाची शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. याआधीच्या पाहणीनुसार लागवडीच्या अखेरच्या काळात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. आता सुरवातीच्या दोन महिन्या़ंतच गुलाबी बोंडअळी बियाण्यावर आक्रमण करीत असल्याचे दिसून आले आहे.

पाहणीअंतर्गत सप्टेंबरअखेर ५७१ गावांमधील ‘बीजी-२’चे नमुने सदोष आढळले आहेत. तब्बल १ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे पीक बाधित झाले आहे. या बियाण्यांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कापसाच्या उत्पादकतेवर परिणाम होणार हे स्पष्ट आहे.

त्याउलट, शेतकऱ्यांचा कीटकनाशकांवरच्या फवारण्यांचा खर्च कैकपटीने वाढला आहे. त्यामुळे कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. अनेकदा कंपन्या भरपाई देण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे पंचनामे करताना सोबत बियाणे कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनाही घेतले जात आहे.

प्रसंगी गुन्हा दाखल करणार पंचनाम्यावेळी पिकांच्या फोटोसह या संदर्भातील सर्व प्रकारचे साक्षी, पुरावे गोळा करण्यात येत आहेत. कोणतीही चूक नसताना शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांना होत असलेल्या नुकसानीच्या भरपाईबाबत कृषी खाते गंभीर आहे. योग्य बियाणे पुरवणे ही कंपन्यांची जबाबदारी आहे.

त्यामुळे सदोष बियाण्यासाठी कंपन्यांनाच जबाबदार धरत बियाणे उत्पादक कंपन्यांकडून भरपाई करून घेण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. कंपन्यांनी भरपाई देण्यास नकार दर्शविल्यास त्यांच्याविरुद्ध सर्व पुराव्यांसह गुन्हे दाखल करण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. येत्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

केंद्र सरकारचे दुर्लक्ष? ‘बीजी-२’ वाण गुलाबी बोंडअळीला बळी पडू लागले आहे. गेल्या पाच ते सात वर्षांत या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. राज्यात चाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. त्यापैकी सुमारे ९५ टक्के क्षेत्रात हे बीटी बियाणे वापरले जाते. ज्या उद्देशाने देशात कापसाचे बीटी बियाणे आणले, आता तो हेतूच साध्य होत नसल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे हे बीटी बियाणे थांबवावे, डीनोटिफाय करावे, या राज्याच्या कृषी खात्याच्या मागणीकडे केंद्र सरकार मात्र दुर्लक्ष करीत आहे.

मंत्रालयात होणाऱ्या बैठकीकडे लक्ष बियाण्यांवरील खर्चासोबत लागवडीदरम्यान शेतकऱ्यांनी केलेला कीटकनाशकांवरचा खर्चही कंपन्यांकडून वसूल करण्यासाठी कृषी खाते प्रयत्नशील आहे; तसेच उत्पादकतेत होणारे नुकसानही कंपन्यांकडून घेण्याचा विचार आहे. याअनुषंगाने पुढील आठवड्यात मंत्रालयात बियाणे कंपन्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे. या वेळी शेतकऱ्यांना द्यावी लागणारी भरपाई निश्चित केली जाणार आहे. यामुळे या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com