‘बीजी-२’ तंत्रज्ञानाच्या वापरावर निर्बंध नाहीच

‘बीजी-२’  तंत्रज्ञानाच्या  वापरावर निर्बंध नाहीच
‘बीजी-२’ तंत्रज्ञानाच्या वापरावर निर्बंध नाहीच

राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का नागपूर : ‘बीजी-२’ तंत्रज्ञान असलेले कापूस वाणदेखील गुलाबी बोंडअळीला बळी पडल्याने त्याची मान्यता रद्द करावी, यासाठी पाठपुरावा करणाऱ्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्‍का बसला. भारतीय कृषी संशोधन परिषदेने दिल्लीत घेतलेल्या बैठकीत ‘बीजी-२’ तंत्रज्ञानावर आधारित कापूस वाणांचा वापर पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

महाराष्ट्रात या वर्षी सातशे गावांमध्ये ‘बीजी-२’ कापूस वाणावर तंत्रज्ञानावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. याची तीव्रता वाढल्याने ‘बीजी-२’  तंत्रज्ञान ‘डिनोटीफाय’ करण्याची मागणी राज्याचे कृषी सचिव बिजयकुमार यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर २५ ऑक्‍टोंबर रोजी कृषी भवन दिल्ली येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपसंचालक (पीक संरक्षण) यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रतापसिंह यांच्यासह कापूस तज्ज्ञ, कापूस उत्पादक राज्याचे संशोधन संचालक, तसेच नॅशनल सीड असोसिएशनचे प्रतिनिधी बैठकीला होते. कृषी आयुक्‍त सिंग यांनी बीटी पाकिटांसोबत देण्यात आलेले रिफ्युजी बियाणे दर्जाहीन असल्याचे सांगीतले. त्यासोबतच काही शेतकरी रेफ्युजी बियाण्याचा वापर करीत नसल्याची बाबदेखील त्यांनी मान्य केली. 

नॅशनल सीड असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर राव म्हणाले की, बीजी- २ कपाशी सर्व प्रकारच्या बोंडअळ्यांना प्रतिकारक असल्याचे सांगितले जात होते, परंतु आता बीजी-१ प्रमाणेच बीजी-२ कपाशी वाणाची अवस्था झाली आहे. त्यामुळे बीजी-२ तंत्रज्ञानाच्या वापराबाबत पुनर्विचाराची मागणी त्यांनी केली. नॅशनल सीड असोसिएशनचे कार्यकारी संचालक डॉ. कल्याण गोस्वामी यांनीही या वाणाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी केली. बैठकीत तज्ज्ञांनी मात्र कापसाकरिता दुसरे पर्यायी तंत्रज्ञान सध्यातरी उपलब्ध नसल्याचे सांगत बीजी-२ वाणाचा वापर पूर्ववत सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार पूर्वीच्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणेच बीजी-२ वाणांचा वापर करण्याचा निर्णय बैठकीत झाला.

तंत्रज्ञान डिनोटीफाय कसे करता येईल?  बीटी कापूस विषयातील एक तज्ज्ञ या विषयावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ‘बीजी-२’ हे मुळात जनुकीय तंत्रज्ञान आहे. एखादे तंत्रज्ञान ‘डिनोटीफाय’ करता येत नाही. मुळात सर्व चाचण्यांअंती त्याच्या वापरास संमती मिळाली आहे, तसेच महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांनी कपाशीच्या ‘बीजी-२’  वाणांच्या वापराला विरोध केलेला नाही. हे तंत्रज्ञान आपल्या जरुरीचे असल्याचे या राज्यांचे म्हणणे आहे.  पर्याय शोधणे गरजेचे  नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे म्हणाले, की एखादे तंत्रज्ञान प्रभावी ठरत नसेल, तर त्यावर पर्याय शोधणे हेच गरजेचे आहे, तसेच एखादी बाब ‘डिनोटीफाय’ करणे म्हणजे त्याच वापर थांबवणे असा होतो. मात्र त्याची सक्ती करता येत नाही. उदाहरण सांगायचे तर एखादे जुने वाण ‘डिनोटीफाय’ केले जाते. मात्र एखाद्याला त्याचा वापर करायचा असला तर तो करू शकतो.  बीजी-१ कपाशी वाणाचा वापर आता केला जात नाही. त्यामुळे त्याच्या पेटंटपोटी पाकिटामागे ४९ रुपये मोन्सॅटोला कंपनीला द्यावे लागत नाही. त्याच धर्तीवर बीजी-२ कपाशी तंत्रज्ञानाचा वापरही थांबवण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानात दोन जनुके असली तरी त्यांचा उपयोग होताना दिसत नाही. - प्रभाकर राव, अध्यक्ष, नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया, दिल्ली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com