भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

इंदूर (मध्य प्रदेश) (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज (वय ५०) यांनी मंगळवारी (ता.१२) येथील ‘सिल्व्हर स्प्रिंग्ज’ या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यांच्या पार्थिवावर आज (ता.१३) दुपारी २.३० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.  आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठीत त्यांनी आपल्या मृत्यूबाबत कोणालाही जबाबदार धरू नये, असे सांगत आपण आता खूप थकलो असल्याने सोडून जात आहोत, असे म्हटले आहे. घरामध्ये संपत्तीवरून निर्माण झालेला वाद आणि कर्जाचा बोजा यामुळे त्यांना नैराश्‍य आले होते, यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्‍यता त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. शेवटचे ट्विट दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी भय्यूजी महाराज यांनी शेवटचे ट्‌विट केले होते. एका संस्कृत वचनासह त्यांनी महादेवाचा फोटो अपलोड करत मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. ‘हे मृत्युंजय महादेवा, मला वाचव, मी तुला शरण आलो आहे’ अशी याचनाच त्यांनी अपलोड केलेल्या संस्कृत वचनातून केली होती. अध्यात्माबरोबर समाजहितही भय्यूजी महाराज यांना काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश सरकारने काही आध्यात्मिक गुरूंना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला होता, त्यात भय्यूजी महाराज यांचा समावेश होता. तथापि, तो त्यांनी नम्रतेने नाकारला होता. उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यूजी महाराज यांचा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठा अनुयायी वर्ग आहे. या दोन्हीही राज्यांतील बडी राजकीय मंडळींही या अनुयायांत मोडतात. त्यांनी आश्रमांद्वारे आध्यात्मिक आणि समाजहिताची कामे मोठ्या प्रमाणात केली. त्यांनी स्वच्छतेच्या क्षेत्रातही मोठे कार्य केले. उत्तर प्रदेशातही त्यांच्या कार्याने झेप घेतली होती.  तत्कालीन मंत्री अनिल देशमुख, तसेच मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आणि भय्यूजी महाराज यांची ओळख झाली, त्यानंतर त्यांचा महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांमधील वावरही वाढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांची ओळख होती. २०१६ मध्ये भय्यूजी महाराज यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा इंदूर येथे आश्रम असून, त्याच्या महाराष्ट्रातील अन्य शहरांतही शाखा आहेत. गेली सुमारे १७ वर्षे त्यांचे आणि महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील नेत्यांशी जवळीक होती. चित्रपटापासून अनेकविध क्षेत्रांतील मंडळ त्यांच्याकडे आपल्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सल्लामसलत, मार्गदर्शनासाठी यायची.  यशस्वी मध्यस्थी लोकपालाच्या मुद्द्यावर ऑगस्ट २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत बेमुदत उपोषण आरंभले होते. तेव्हा हजारे केंद्र सरकारशी चर्चेला तयार नव्हते. त्या वेळी विलासराव देशमुख यांनी भय्यूजी महाराज यांना मध्यस्थाची भूमिका निभावण्याची विनंती केली. त्यांनी ती यशस्वीरीत्या पार पाडली. तत्कालीन कायदामंत्री सलमान खुर्शिद, दिल्लीचे खासदार संदीप दीक्षित यांच्या मदतीने त्या वेळी लोकपाल विधेयकाचा मसुदा बनवण्यात आला. 

नैराश्‍याने ग्रासले भय्यूजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी माधवी यांचे नोव्हेंबर २०१५ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांनी शिवपुरी येथील डॉ. आयुषी शर्मा यांच्याशी ३० एप्रिल २०१७ रोजी विवाह केला. त्यानंतर पहिल्या पत्नीच्या कन्येशी भय्यूजी महाराज यांचा वाद निर्माण झाला होता, अशी चर्चा आहे. याच दरम्यान त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणे बंद केले होते. स्वतःला सामाजिक कार्य आणि शेतकरी विकासाला हातभार लावणाऱ्या उपक्रमांत गुंतवून घेतले होते. तरीही त्यांना नैराश्‍याने ग्रासले होते. मध्य प्रदेश सरकारने नर्मदा नदी संवर्धनासाठी उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याच्या समितीत त्यांचा समावेश होता. कन्येला भेटून भय्यूजी महाराज इंदूरला परत जात असताना पुण्याजवळील रांजणगाव येथे त्यांच्या मोटारीवर आठ मे २०१६ रोजी हल्ला झाला होता. दगडफेकही झाली होती. त्यातून ते बचावले होते. त्यानंतरही त्यांच्यावर अशाच प्रकारे हल्ला झाला होता.  राजकीय नेत्यांचे महागुरू भय्यूजी महाराज अर्थात उदयसिंह देशमुख हे राजकीय नेत्यांचे गुरू म्हणून ओळखले जात असत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेश सरकारने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊ केला होता पण त्यांनी तो नाकारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विलासराव देशमुख, प्रतिभा पाटील, उद्धव आणि राज ठाकरे, लता मंगेशकर आणि आशा भोसले हे नेहमी भय्यूजी महाराज यांच्या इंदूरमधील आश्रमाला भेटी देत असत.  तुळजापुरात संभाजी महाराजांचा पुतळा तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या दरबारात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असावा, यासाठी नागरिकांनी आग्रह धरला होता. भय्यूजी महाराजांनी स्वतःची शेती विकून तुळजापूरमध्ये २२ लाख रुपयांचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला. ३० मार्च २०१३ रोजी या पुतळ्याचे अनावरण झाले.  शाळेचे स्वप्न अपूर्णच राहिले कोपर्डीतील (जि. नगर) घटनेनंतर अनेकांची पावले इकडे वळली. त्यात भय्यूजी महाराज अग्रस्थानी होते. कोपर्डीतील मुलींसाठी भय्यूजी महाराजांनी दोन स्कूल बस दिल्या; मात्र ते पुरेसे नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कोपर्डीतच विद्यालय सुरू करण्याचे जाहीर करीत त्यासाठी पाठपुरावाही सुरू केला; मात्र आकस्मिक निधनाने त्यांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. अनाथांच्या आयुष्यात सूर्यास्त अकोला ः अध्यात्माला समाजसेवेची जोड देत भय्यूजी महाराजांनी सूर्योदय आश्रम आणि सूर्योदय ग्रामच्या माध्यमातून वऱ्हाडात अनाथांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले होते. महाराजांच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात ‘सूर्यास्त’ झाला आहे.  अकोला जिल्ह्यातील कपिलेश्‍वर आणि बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्‍यातील महिमळ या गावात १ जून २००८ रोजी सूर्योदय ग्राम योजना भय्यूजी महाराजांनी सुरू केली होती. याशिवाय अकोला शहरात मलकापूर परिसरात त्यांच्या संस्थेमार्फत ३० जानेवारी २००९ पासून सूर्योदय बालसुधार गृह चालविला जात होते. एड्‌सग्रस्त पालकांच्या मुलांचे पालकत्व या संस्थेने स्वीकारले. याशिवाय निमकर्दा येथेही आश्रमाची स्थापना करून ग्रामविकासाचा विडा उचलला होता. खामगाव तालुक्‍यात त्यांनी ७०० मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची सोय केली होती. पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सूर्योदयच्या माध्यमातून प्रयत्न केले.  मराठवाड्यात भक्कम कामे उस्मानाबाद ः राष्ट्रसंतजी भय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नी माधवी निंबाळकर या उस्मानाबादेतील राजाराम पंडितराव निंबाळकर यांची कन्या होत्या. त्यांच्या निधनानंतर भय्यू महाराजांनी दुसरा विवाह केला होता. सासूरवाडी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात भय्यूजी महाराजांच्या सूर्योदय परिवाराने विविध विकासकामांची मालिकाच उभी केली आहे.  जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामाला या परिवाराने प्राधान्य दिले. २०१२ पासून जिल्ह्यात सुमारे १०० किलोमीटर नदी खोलीकरणाचे काम पूर्ण केले. पशुधनासाठीही त्यांनी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध करून दिला होता. पशुपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी मातीची भांडी, हौदांची व्यवस्था, गावागावांत पाण्यासाठी केलेले प्लॅस्टिक टाक्‍यांचे वाटप लोक विसरू शकत नाहीत. उस्मानाबाद, लोहारा, उमरगा, तुळजापूर, तसेच कळंब तालुक्‍यात परिवाराकडून मोठे काम झाले आहे. याशिवाय मुर्टा (ता. तुळजापूर) येथे सूर्योदय शैक्षणिक संकुल नावाने पाचवी ते १२ वीपर्यंत शिक्षण संस्था उभी केली आहे. 

बीडमध्ये  दुष्काळमुक्तीचे काम सूर्योदय परिवाराने बीड जिल्ह्यात दुष्काळमुक्तीसह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम उभे केले आहे. सूर्योदय परिवाराच्या वतीने गेल्या दुष्काळात जिल्ह्यात मोठे काम झाले आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी जिल्ह्यातील १५३ गावांमध्ये ग्राम कृषी सुधार अभियानाची सुरवात केली. सोलापूरशी स्नेह सोलापूर : भय्यूजी महाराज यांचा सोलापूरशी चांगला स्नेह होता. शहर आणि जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी आहेत. ते सर्वांना साधे जीवन जगण्याचा संदेश द्यायचे. त्यांची आध्यात्मिक ताकद मोठी होती. त्यांच्या अचानक जाण्यामुळे अनुयायांना धक्का बसल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा महाराजांचे अनुयायी लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी सांगितले. भय्यूजी महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम २०१४ मध्ये हेरिटेज लॉनवर झाला होता. हजारो अनुयायांसह राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सर्वोदय परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिला होता. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात महाराजांचे हजारो अनुयायी आहेत.  शोक संदेश... भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. भय्यूजी महाराज यांच्या आध्यात्मिक विचारधारेचे अधिष्ठान लोकसेवा हेच होते. त्यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून समाजहितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा वंचित आणि उपेक्षित समाजघटकांना मोठा लाभ झाला आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अध्यात्माची बैठक असणारे, जनसेवा ही ईश्‍वरसेवा मानणारे व दुःखी, पीडितांसाठी झगडणारे, पर्यावरणाबाबत अतिजागरूक असणारे भय्यूजी महाराज संत होते. त्यांनी माझ्या आंदोलनात मध्यस्थी केली होती; मात्र त्यांनी मला ते सांगितले नाही. मध्यस्थीसाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे ते गेले होते, असे मला नंतर समजले. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक भय्यूजी महाराज यांचे निधन ही दुःखद घटना आहे. त्यांच्या जाण्याने देशाचे, समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. सर्व समाजाला स्वतःचे कुटुंब मानून येणाऱ्या व्यक्तीला ते मार्गदर्शन करीत. ज्या तळमळीने ते स्वतःला झोकून देऊन समाजसेवा करीत, तसे काम करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.  - अनिल शिरोळे, खासदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com