भीमाशंकर विकत घेणार शेतकऱ्यांकडून भुंगेरे

भीमाशंकर विकत घेणार शेतकऱ्यांकडून भुंगेरे
भीमाशंकर विकत घेणार शेतकऱ्यांकडून भुंगेरे

पारगाव : ''उसातील हुमणी नियंत्रणासाठी सामुदायिक उपायांची गरज आहे. त्यासाठी पाऊस पडल्यानंतर सायंकाळी जमिनीतून बाहेर पडणारे विटकरी अथवा काळपट रंगाचे भुंगेरे गोळा करून ते रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून मारावेत. हे मृत भुंगेरे भीमाशंकर साखर कारखान्याकडून ३०० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे गट कार्यालयांत खरेदी केले जातील,'' अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. हुमणी नियंत्रणाबाबत माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी सांगितले, की उसाला उपद्रव करणाऱ्या प्रमुख किडीमधील हुमणीचा क्रमांक वरचा आहे. हुमणी नियंत्रणाचे उपाय योग्यवेळी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हुमणी नष्ट करण्यासाठी कोणताही एक उपाय किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून फायदा होत नाही, त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. हुमणी किडीच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात, त्याला एकच अपवाद म्हणजे पाऊस पडल्यानंतर सूर्यास्तानंतर हुमणीचे भुंगेरे कडुनिंबाच्या किंवा बाभळीच्या झाडावर जमा होतात. प्रथम हे भुंगेरे गोळा करून व नंतर अळी नियंत्रण हेच लक्ष बनवून कीड व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केला, तर हुमणी आटोक्‍यात येते. हुमणी नियंत्रण उपाययोजना वेळीच राबविणे गरजेचे आहे. ही वेळ टळल्यास नियंत्रण उपायांचा हवा तसा परिणाम होत नसल्याने भुंगेरे गोळा करणे गरजेचे आहे. तसेच लागवडीवेळी फेप्रोनील (रिजेंट) किंवा दाणेदार फोरेट 10 किलो एकरी टाकावे. मोठ्या उसात जून ते ऑगस्ट महिन्यात क्‍लोरोपायरीफॉस 20 टक्के दोन लिटर प्रतीएकरी 400 लिटर पाण्यात मिसळून जमिनीत द्यावे. ऊस व इतर पिकांमध्ये वाढत असलेला हुमणीचा उपद्रव व उपाययोजना या बाबत शेतकऱ्यांनी जागरूक राहून भुंगेरे गोळा करून नुकसान टाळता येणे शक्‍य होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com