रब्बीसाठी ‘भोजापूर’मधून ६ डिसेंबरपासून आवर्तन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सिन्नर, जि. नाशिक : भोजापूर धरणातून रब्बीसाठी येत्या ६ डिसेंबरला आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आवर्तनापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या. लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोच करण्यासाठी नियोजन करावे. शेतकरी व पाटबंधारे विभागाने समन्वयातून आवर्तन यशस्वी करावे, असे आवाहन आमदार वाजे यांनी केले.

येथील कडवा शासकीय विश्रामगृहात सोमवारी (ता. २७) भोजापूर कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या वेळी भोजापूर धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता एस. एस. गोंदकर, शाखा अभियंता बी. के. अचाट, बी. डब्ल्यू बोडके, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, बाजार समितीचे संचालक अनिल सांगळे, दीपक बर्के, उपअभियंता सी. एम. आव्हाड, पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी गणपत केदार, कारभारी आव्हाड, भागवत घुगे आदी उपस्थित होते.

गळती, बाष्पीभवनाचा विचार करता रब्बीसाठी १५०, तर पिण्यासाठी प्रवाही ५० असे एकूण २०० दशलक्ष घनफूट पाण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. डाव्या कालव्यावरील शेवटच्या दोडीला शेवटच्या टोकापासून, तर उजव्या कालव्यावरील पिंपळे येथून पाणी देण्यास सुरवात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

धरणाच्या साठवण क्षेत्राची मोजणी करण्याचे ठरले असतानाही कोणतेही सर्वेक्षण झाले नाही. पाणी वापर संस्था पैसे देण्यास तयार असूनही पाटबंधारे विभागाने प्रतिसाद दिला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी या वेळी केली. त्यावर श्री. शिंदे यांनी ७ लाख रुपये भरून पाटबंधारे विभाग मोजणी करणार असल्याचे आश्वासन दिले. पाणी आरक्षण करताना पाणी वापर संस्थांना विश्वासात घेतले जात नाही. कालवा दुरुस्तीची कामे संथ गतीने सुरू आहेत.

कालव्याचे पाणी मोजण्यासाठी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नाही. कालव्याला बोगदे पाडून होणाऱ्या पाणीचोरीचे व्हिडिओ, छायाचित्र देऊनही संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. या वेळी गणपत केदार, भागवत घुगे, अनिल सांगळे, नीलेश केदार यांनी चर्चेत सहभाग घेतला. या ववेळी सिन्नर व संगमनेर तालुक्‍यातील लाभधारक शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com