काँग्रेस आघाडीपुढे विधानसभेचे मोठे आव्हान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाल्याने गलितगात्र झालेल्या काँग्रेस आघाडीसमोर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. लोकसभेच्या निकालाने आघाडीच्या नेत्यांचे अवसान गेले आहे. राज्यातील राजकीय वातावरण शिवसेना-भाजपला अनुकूल राहिल्याने आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीला जेमतेम पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. विधानसभेची रंगीत तालीम म्हणून मानल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला. राज्यातील ४८ पैकी ४१ जागा युतीला मिळाल्या. आघाडीला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले. बहुतांश विधानसभा मतदारसंघात युतीनेच आघाडी घेतल्याचे लोकसभा निकालाची आकडेवारी सांगते. विधानसभा मतदारसंघनिहाय निकालाची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, एकंदर कल पाहता आघाडीच्या बालेकिल्ल्यात युतीने बाजी मारल्याचे दिसते.

या पार्श्वभूमीवर आघाडीसमोर ऐक्य टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. लोकसभेत काँग्रेसला जेमतेम एक जागा मिळाल्याने आघाडीच्या जागावाटपात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी विधानसभेला निम्म्या जागांची मागणी करू शकते. याशिवाय काँग्रेससमोर अन्य छोट्या पक्षांना एकत्र ठेवण्याचे आव्हान आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे आघाडीच्या सात जागांचे नुकसान झाले. अशावेळी विधानसभेला ‘वंचित’ने आपली स्वतंत्र चूल कायम ठेवल्यास त्याचा फटका आघाडीला बसू शकतो. त्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यांचा कालावधी आघाडीसाठी महत्त्वाचा आहे.

विधानसभा निवडणुकीत युती कायम राहील असे भाजपकडून वारंवार सांगितले जात आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्याने भाजपकडून शिवसेनेला फार महत्त्व दिले जाईल असे वाटत नाही. मित्र पक्षांना जागा सोडून ज्या जागा उरतील त्या जागा निम्म्या-निम्म्या वाटून घेण्याचे सूत्र शिवसेना-भाजपने मान्य केले आहे. याशिवाय युतीत मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा कळीचा आहे. अशावेळी येत्या काळात भाजपचे वर्तन कसे राहील यावर युतीचे सबंध अवलंबून राहतील. शिवसेनेला सोबत घेताना भाजपने अनेक आश्वासने दिली होती. भाजपकडून या आश्वासनांची पूर्तता नजीकच्या काळात कशी होते यावरही बरेच काही ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com