नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेना

नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेना
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेना

नाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीकडून उमेदवार निश्चित झाले. या पार्श्वभूमीवर युतीकडून अद्याप कोणत्याही उमेदवारांची घोषणा झालेली नाही. यामुळे इच्छुकांसह कार्यकर्ते संभ्रमात असून विद्यमान खासदार अस्वस्थ असल्याची चर्चा आहे.  गेल्या साडेचार वर्षांत झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे युतीची साडेचार वर्षे एकदम गाजली. नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र चाली परस्परांनी खेळल्या. युती झाल्यानंतर युतीचा पहिला उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा रविवारी (दि. १७) रोजी संपन्न झाला. कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी हा मेळावा घेण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीचे प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात युतीचे उमेदवार निश्चित होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, उमेदवारीबाबत लागलेल्या अपेक्षा फोल ठरल्या. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी नाशिक सांभाळा तर मुख्यमंत्र्यांनी दिंडोरीकडे लक्ष असू द्या, असे उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले. नाशिक लोकसभेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी २ महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार या खात्रीने कार्यकर्ते प्रचारामध्ये व्यस्त असून मतदारांच्या भेटी घेत आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार विजय करंजकर उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे एक गट करंजकर यांच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्नशील आहे. दिंडोरी लोकसभेसाठी विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे सध्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. दिंडोरीचे माजी आमदार युतीची पुढची चाल ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि उमेदवारी मिळविली. या मतदारसंघात तयारी करत असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीचा पत्ता कापला गेला. त्यामुळे त्याही भाजपाच्या संपर्कात असून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. या घडामोडींवर प्रदेश पातळीवरून काय निर्णय होतो?, पालकमंत्री गिरीश महाजन कोणाच्या पारड्यात वजन टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही खासदार आपली ताकद पणाला लावून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com