बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने भाजप कार्यकर्ते नाराज

बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने भाजप कार्यकर्ते नाराज
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने भाजप कार्यकर्ते नाराज

पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर अद्याप नियुक्ती न झाल्याने हवेली तालुक्यातील भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. मतदारसंघातील पक्षाच्या काही आमदारांनी स्वतःच्या राजकीय साेयीसाठी प्रशासकीय मंडळाची नियुक्ती रद्द करीत प्रशासकीय राजवट आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनीच कार्यकर्त्यांचा विश्‍वासघात केला असून, त्या अामदारांना निवडणुकीत अद्दल घडविण्याचा इशारा पदाधिकारी देत आहेत. पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांनी नुकत्याच घेतलेल्या शिरूर लाेकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेली १४ वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. या राजवटीमध्ये राजकीय नेत्यांच्या व्यवस्थापनामध्ये माहीर असलेल्या एका ‘विशिष्ट़’ अधिकाऱ्याची ‘देशमुखी’ बाजार समितीवर राजवट राहिली आहे. यामुळे या बाजार समितीची निवडणूक विविध कारणांनी टाळली गेली आहे. निवडणूक टाळण्यासाठी बाजार समितीचे विभाजन जिल्हा, प्रादेशिक आणि तालुका अशा पद्धतीने करण्यात येऊन, प्रत्येक वेळी बाजार समिती नव्याने स्थापन झाल्याचे तांत्रिक कारणे देत निवडणुका टाळण्यात आल्या व प्रशासकीय राजवट कायम ठेवण्यात आली.

दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ टिळे आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली हाेती. मात्र, या प्रशासकीय मंडळामध्ये सहकार आणि विशेषतः बाजार समितीच्या कामकाजाच्या अनुभवाची वाणवा असलेल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या हाेत्या.

दरम्यान, प्रशासकीय मंडळाची मुदत संपल्याचे कारण देत आणि निवडणूक टाळण्यासाठी सरकारने बाजार समितीचे विभाजन करून हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापना केली. हे विभाजन करताना हवेली तालुक्यातील लाेकप्रतिनिधींनी बाजार समितीच्या कामकाजामध्ये माहीर असलेल्या सहकारातील अधिकाऱ्याला हाताशी धरून कार्यभाग साधला. हे करत असताना हवेली तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रशासकीय मंडळावर नियुक्त्या देऊ, असे आश्‍वासन दिले हाेते. यामुळे हवेलीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडीसाठी देव पाण्यात ठेवले हाेते. मात्र, अद्यापही नियुक्त्या न मिळाल्याने पदाधिकारी नाराज असून, आमदारांनी स्वतःच्या राजकीय साेयीसाठी आम्हाला आशेला लावले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com