पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट

भारत पुन्हा विजयी झाला. सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत. सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार. सर्वांना सोबत घेऊन देशात भरभराट आणणार. एकजुटीतून आम्ही सशक्त आणि सर्वसमावेशक भारत घडवणार. - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भाजप
भाजप

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लोकसभा निवडणुकीत ३४९ जागांवर आघाडी घेऊन नेत्रदीपक विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे भाजपने एकट्याने ३०२ जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही अधिक यश मिळाले आहे. भाजपला गेल्या निवडणुकीत २८२, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३३६ जागा मिळाल्या होत्या. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसला मोठ्या पराभवाची चव चाखावी लागली. कॉंग्रेसने केवळ ५२ जागांवर आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला एकूण ८६ जागांवर आघाडी मिळाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे ४४ खासदार निवडून आले होते. त्या तुलनेत यंदा जागांमध्ये किरकोळ वाढ झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठी या पारंपरिक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या स्मृती इराणींकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून मात्र तब्बल सुमारे ४ लाख २९ हजार मतांनी विजयी झाले आहेत.    यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांमधील असंतोष, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती या पार्श्वभूमीवर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फटका बसेल, निसटते बहुमत मिळेल, असा कयास व्यक्त केला जात होता. परंतु हे सगळे अंदाज साफ खोटे ठरवत सत्ताधारी पक्षाने देदीप्यमान विजय मिळवला. उत्तर प्रदेशसह हिंदी पट्ट्यातील प्रमुख राज्यांत भाजपच्या जागा कमी होतील आणि ईशान्येकडील राज्ये व प. बंगालमध्ये काही जागांचा फायदा होईल. असे मानले जात होते. प्रत्यक्षात हिंदी पट्ट्यातील राज्यांबरोबरच पूर्व, ईशान्य आणि पश्‍चिम भारतावरही भाजपने विजयाचा ध्वज फडकावला.   महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने ४८ पैकी ४२ जागांवर आघाडी घेत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजप २३, शिवसेना १९, राष्ट्रवादी कॉंग्रेस ५ तर कॉंग्रेस १ जागेवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने ८० जागांपैकी ५९ जागांवर विजयाची मोहोर उमटवली आहे. तर बहुजन समाज पक्ष १२, समाजवादी पक्ष ६, कॉंग्रेस १ जागेवर आघाडीवर आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांत गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपचा मतांचा वाटा वाढून ५० ते ५५ टक्क्यांवर गेला आहे. तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातील हिंसक संघर्षामुळे देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या प. बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस २१ तर भाजप २० जागांवर आघाडीवर आहे. बिहारमध्ये भाजप-जनता दल युनायटेड युतीने ४० पैकी ३१ जागांवर आघाडी घेत कॉंग्रेस-राष्ट्रीय जनता दलाच्या गठबंधनला धूळ चारली आहे. तिथे राष्ट्रीय जनता दलाला २, तर कॉंग्रेसला १ जागेवर समाधान मानावे लागणार आहे.  दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये मात्र भाजपचा विजयरथ रोखण्यात द्रमुकला यश आले. तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि कॉंग्रेस युतीने ३८ पैकी ३७ जागांवर आघाडी घेतली आहे. केरळमध्येही ‘युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट'' आणि ‘लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट''ने निर्णायक यश संपादन करून भाजपला रोखले. राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांचा आंध्र प्रदेशमध्ये सुपडा साफ झाला आहे. तिथे जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर कॉंग्रेसने २५ पैकी २४ जागांवर आघाडी घेतली आहे. कर्नाटकमध्ये कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची आघाडी भाजपला रोखू शकली नाही. देशातील जनतेने भाजपच्या पारड्यात निर्विवाद मत टाकून भाजपप्रणित सरकारच्या दुसऱ्या पर्वाचा मार्ग मोकळा केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची केवळ औपचारिकता बाकी उरली आहे.  प्रतिक्रिया निवडणूक विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भाजपचे अभिनंदन करतो. भारतीय जनतेने नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्याचे ठरविले आहे आणि मी जनतेच्या मताचा आदर करतो.  - राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष निवडणुकीतील यशाबद्दल राज्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएला देशात आणि राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. देशातील गरीब जनता मोदी यांच्या बाजूने आहे, हे निकालातून दिसून येते. या निकालाने आमची जबाबदारी वाढली आहे.  - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री लोकांनी दिलेला कौल मान्य आहे. यापुढे अधिक प्रभावीपणे लोकांशी संपर्क साधून, पक्षाचा जनाधार वाढवण्याची खबरदारी मी तसेच कार्यकर्ते घेणार आहोत. लोकसभा निकालाची चिंता न करता राज्यातील दुष्काळी भागातील लोकांशी संपर्क साधून त्यांना दिलासा देण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेणार आहोत. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com