बोंड अळी नुकसानीची मदत, दूध दराचा मुद्दा तापणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर   : फडणवीस सरकारने अट्टहासाने नागपुरात घेतलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील शेतकरीच केंद्रबिंदू राहणार हे स्पष्ट झाले आहे. विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने बोंड अळी नुकसानीपोटीच्या मदत वाटपातील विलंबाचा मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे. तसेच आगामी आठवड्यात राज्यात दुधाचे आंदोलन तापणार आहे, त्याचेही पडसाद अधिवेशनात उमटणार आहेत.

यापूर्वी तीनदा तर यंदाचे हे चौथे पावसाळी अधिवेशन मोठ्या कालखंडानंतर नागपुरात होत आहे. साहजिकच खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात होत असलेल्या या अधिवेशनात विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्नच ऐरणीवर राहणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष आणि राज्य सरकारनेसुद्धा शेतकरीविषयक मुद्यांना हात घालत याची प्रचिती आणून दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या पावसाळी अधिवेशनात केंद्रबिंदू अर्थातच खरीप हंगाम आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे स्पष्ट केले आहे. तसेच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी या अधिवेशनात निर्णय घेतले जातील, असेही जाहीर केले आहे.

गेल्या वर्षीच्या बोंड अळीच्या नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात तापणार हे गृहीत धरून श्री. फडणवीस यांनी या बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईपोटी २ हजार ३३७ कोटी रुपये द्यावयाचे होते. त्यापैकी आतापर्यंत २ हजार १०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. बोंड अळी नुकसानीची १८ लाख १६ हजार ५५७ शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात आली आहे. याशिवाय नुकतीच ३०० कोटी रुपयांची मागणी आली आहे. तीही देण्यात येईल, असे सुरुवातीलाच जाहीर केले.

तसेच हंगामातील पीक कर्ज वाटपाचा मुद्दा तापणार असल्याचे विचारात घेत याकडे राज्य शासन गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट केले. यंदाच्या हंगामात आतापर्यंत २५ टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले आहे. पुढील महिन्यापर्यंत पीककर्ज वाटप सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

तूर आणि हरभरा खरेदीवरून विरोधक रान पेटविण्याचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांनी या आघाडीवर शासनाने केलेल्या कारवाईची माहिती जाहीर केली. राज्यात शेतकऱ्यांकडून तूर व हरभरा विक्रमी खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. २०१७-१८ मध्ये २ लाख ६५ हजार ८५४ शेतकऱ्यांकडून १८३५ कोटींची ३ लाख ३६ हजार ७१८ टन तूर खरेदी करण्यात आली आहे. तसेच १ लाख ४० हजार शेतकऱ्यांकडून १ लाख ९४ हजार ६२६ टन हरभऱ्याची खरेदी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

सध्याच्या दूध दराच्या तिढ्यावर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने यंदाच्या अधिवेशनात दुधाच्या संदर्भातील समग्र धोरण जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दूधदराच्या प्रश्नावर येत्या आठवड्यात राज्यात तीव्र आंदोलन होणार आहे, त्याचेही तीव्र पडसाद अधिवेशनात उमटणार आहेत.

शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की आतापर्यंत ४६ लाख खाती पूर्ण झाली असून ३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीचे पैसै जमा झाले आहेत. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. विरोधकांकडून शेती आणि शेतकरी प्रश्नावर मुद्यांवर सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न होणार आहे. बोंड अळीग्रस्तांना मदत, शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज वाटप, तूर-हरभरा खरेदी, प्रोत्साहन अनुदान, नाणार प्रकल्प यावरून सरकारवर विरोधकांकडून जोरदार आक्रमण केले जाणार असल्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com