बोंड अळीच्या धास्तीमुळे कापसातील तेजी फस्त होणार?

बोंड अळीच्या धास्तीमुळे कापसातील तेजी फस्त होणार?
बोंड अळीच्या धास्तीमुळे कापसातील तेजी फस्त होणार?

पुणे : यंदाच्या हंगामात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे दर तेजीत राहण्याचे स्पष्ट संकेत मिळत असले, तरी या तेजीचा फायदा गुलाबी बोंड अळी फस्त करून टाकेल, असे सध्याचे चित्र आहे. बोंड अळीमुळे धास्तावलेले शेतकरी यंदा कापसाचा पेरा कमी करण्याची शक्यता आहे. देशातील सर्वाधिक कापूस लागवड करणाऱ्या महाराष्ट्रात यंदा कापसाचे क्षेत्र सुमारे दहा टक्के घटण्याचा अंदाज आहे.  महाराष्ट्रासह देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत लागवडीत संभाव्य घट, निर्यातीसाठी वाढती मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढे दर यामुळे यंदाच्या हंगामात कापूस तेजीत राहण्याची चिन्हे आहेत. चीनने नुकताच भारताकडून ५ लाख गाठी कापूस आयात करण्याचा करार केला आहे. वास्तविक नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ऑगस्ट अखेरीस कापूस निर्यातीचे करार केले जातात. परंतु यंदा चीनमधील मोठी मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढे दर यामुळे जूनमध्येच ही प्रक्रिया सुरू झाली, असे सूत्रांनी सांगितले. परंतु गेल्या हंगामात बोंड अळीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडल्यामुळे आणि या प्रश्नावर अद्यापही तोडगा निघालेला नसल्यामुळे शेतकऱ्यांना या तेजीचा कितपत फायदा घेता येईल, याबद्दल शंका निर्माण झाली आहे.  महाराष्ट्रात यंदा कापूस लागवडीत सुमारे दहा टक्के घट होण्याची शक्यता आहे, असे कृषी विभागातील सुत्रांनी सांगितले. राज्यात २०१२ ते २०१७ या दरम्यान कापसाचे सरासरी लागवड क्षेत्र ४२ लाख हेक्टर राहिले.  यंदा कृषी विभागाने पूर्वहंगामी कापूस लागवड पूर्णतः रोखल्यामुळे किमान पाच ते सहा लाख हेक्टरवरील पेरा यंदा झाला नाही. राज्यात विशेषतः खानदेशात १५ मे ते १५ जून या कालावधीत पावसाची वाट न बघता कापसाची पूर्वहंगामी लागवड केली जाते. तसेच, विदर्भ व मराठवाड्याच्या तुरळक भागातही बागायती कापसाची पूर्वहंगामी लागवड होत असते. मात्र, पावसाचा ताण पडल्यास पूर्वहंगामी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा लवकर प्रादुर्भाव होत असल्यामुळे ही लागवड रोखण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. त्यानुसार राज्यातील बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५ मे च्या आधी विक्रेत्यांना बीटी पाकिटांचा पुरवठा करू नये, असे आदेश देण्यात आले.  देशातील ४२ कंपन्या यंदा शेतकऱ्यांना बीटी कापसाचे ३७८ वाण उपलब्ध करून देणार आहेत. गुलाबी बोंड अळीचे प्रकरण घडले नसते तर राज्यात यंदा बीटी पाकिटांची विक्री पावणेदोन कोटींच्या आसपास राहिली असती. मात्र, यंदा क्षेत्र घटणार असल्याने दीड कोटी पाकिटांची विक्री होईल, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. राज्यात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ लाख पाकिटे जादा मिळणार असल्याने बियाण्यांची मुबलक उपलब्धता असेल, असे या सूत्राने स्पष्ट केले.  बीजी-२ बियाण्यातील जनुकाने गुलाबी बोंड अळीला प्रतिकार करण्याची क्षमता गमावली आहे, त्यामुळे या वाणाला मान्यता देण्याचा पुनर्विचार करावा, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली. पुढील हंगामात सर्व प्रयत्न करूनही गुलाबी बोंड अळीचा प्रकोप रोखणे शक्य झाले नाही, तर निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या रोष सहन करण्याची नामुष्की सरकारवर ओढवू शकते, असे मत कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.  गुलाबी विळखा       गेल्या हंगामात गुलाबी बोंड अळीमुळे राज्यात ४२ लाख हेक्टरपैकी १४ लाख ९९ हजार हेक्टरवरील कापसाला फटका बसला. बियाणे उद्योगाच्या म्हणण्यानुसार, कृषी खात्याने कापूस व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात वर्षानुवर्षे कुचराई केली. शिफारस नसतानाही बीजी- २ कापसाची कोरडवाहू क्षेत्रात मोठी लागवड, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड-रोग व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष, पूर्वहंगामी लागवडीत वाढ, पावसाचा खंड, फरदड, अळीचे जीवनचक्र खंडित न होणे अशा विविध कारणांमुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला; त्याला तंत्रज्ञान नव्हे तर मानवी चुका कारणीभूत आहेत, असा बियाणे उत्पादक कंपन्यांचा सूर आहे.   बीटी बियाण्यांची उपलब्धता 

  • नाशिक विभाग  :  ३३ लाख ६९ हजार पाकिटे 
  • पुणे विभाग   : ५ लाख पाकिटे 
  • कोल्हापूर विभाग  :  १९ लाख ३८ हजार पाकिटे 
  • औरंगाबाद विभाग  :  ४४ लाख ९१ हजार पाकिटे 
  • लातूर विभाग  :  २६ लाख १९ हजार पाकिटे 
  • अमरावती विभाग  :  ५३ लाख ३० हजार पाकिटे 
  • नागपूर विभाग  :  २१ लाख ८१ हजार पाकिटे   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com