वर्धा येथे आढावा बैठक
वर्धा येथे आढावा बैठक

...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः जिल्हाधिकारी नवाल

वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी शिफारसीत उपाय योजनांची अंमलबजावणी जिनिंग प्रेसिंग मालक, व्यवस्थापकांनी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. बोंड अळी नियंत्रणासाठीच्या या मोहिमेत सहभागी न होणाऱ्या मिल मालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

वर्धा येथे नुकतीच जिनिंग व्यावसायिकांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. नवाल बोलत होते. जिनिंग व्यावसायिकांनी मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ करून कुठेही बोंडबळीचे पतंग तयार होऊन त्यांचा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी, पतंगाचा अटकाव करण्यासाठी प्रत्येकी दहा मीटर अंतरावर एक याप्रमाणे सर्व ठिकाणी कामगंध सापळे लावावेत. त्यामध्ये सापडणाऱ्या पतंगाची गणना करून तालुका कृषी अधिकाऱ्यांना कळवावे. कोणत्याही ठिकाणी सरकीपासून झाडे उगवू देऊ नये, ठिकठिकाणी प्रकाश सापळे संध्याकाळी सहा ते ११ वाजेदरम्यानच्या कालावधीत लावून त्यात जास्तीत जास्त पतंग जमा होतील, असे पहावे.

शिफारसीत सूचनांप्रमाणे कार्यवाही न करणाऱ्या मिल मालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यासोबतच पर्यावरण कायद्याअंतर्गत परवाना रद्द करण्याबाबत मंत्रालयास प्रस्ताव पाठविण्यात येईल आणि गुन्हाही दाखल केला जाईल, असेही जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले. सर्व मिलधारकांनी सामाजिक जबाबदारी समजून त्यांच्या दोन किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना कामगंध सापळे वितरीत करावे. किमान एक हजारावर शेतकऱ्यांना कामगंध सापळ्याचे वितरण करावे, अशीही सूचना त्यांनी केली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com