एप्रिल-मेमध्ये बाजार फायदेशीर राहण्याचे संकेत

पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन

उन्हाळ्यात नैसर्गिकरीत्या उत्पादन नियंत्रित होत असल्यामुळे एप्रिल-मे महिन्यांत ब्रॉयलर्सचा बाजार फायदेशीर राहण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. दरम्यान, गेल्या आठवडाभरात ब्रॉयलर्सचा बाजार २० टक्क्यांनी वधारला आहे. नाशिक विभागात शनिवारी (ता. ३१) रोजी ५९ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. आठवडाभरात २० टक्क्यांनी बाजारात सुधारणा झाली आहे. नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, नीचांकी पातळीवरून बाजारात जोरदार सुधारणा झाली आहे. खपाच्या दृष्टीने मंदीचा कालावधी आता संपला आहे. उन्हाळ्यामुळे यापुढे उत्पादन नियंत्रित राहील. मोठ्या पक्ष्यांचा आता तुटवडा आहे. एप्रिल-मे बाजारभावाच्या दृष्टीने किफायती राहतील. ज्युपिटर अॅग्रोचे संचालक डॉ. सीताराम शिंदे म्हणाले, वाढत्या उन्हामुळे पक्ष्याच्या वाढीचा वेग आता कमी झाला आहे. परीक्षांचा हंगाम संपला आहे. उत्तर व दक्षिण भारतातील उपवासाचे सणही संपले आहेत. गुजरातसारख्या शेजारी राज्यातही वातावरण आणि मंदीमुळे उत्पादन नियंत्रित झालेय. यापुढील काळात सुमारे १२ ते १५ टक्के उत्पादन घटणार आहे. अनुकूल हवामानाच्या तुलनेत आता प्रतिपक्षी ३०० ग्रॅमने पक्ष्यांची वजने कमी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, पुढील कालावधी बाजारभावाच्या दृष्टीने सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. पुणे विभागात २८५ प्रतिशेकडा या दराने लिफ्टिंग झाले. अलीकडच्या काळातील नीचांकी दराची नोंद झाली आहे. उत्पादन खर्चाच्या खाली बाजार पोचला आहे. उन्हाळ्यातील घटत्या मागणीचा फटका बाजाराला बसला आहे. दरम्यान, गेल्या तिमाहीतील सरासरी विक्री दर ३५१ रु. प्रतिशेकडा होता. २०१७ च्या पहिल्या तिमाहीत ३६१ रु. प्रतिशेकडा दर होता. सामान्यपणे मेअखेरपर्यंत अंड्यांची मागणी सरासरीपेक्षा १५ ते २० टक्के कमी असतो. १५ मे नंतर बहुतांश वेळा अंड्यांच्या बाजारातील मंदीचे आवर्तन संपून तेजी सुरू होते. दरम्यान, हॅचिंग एग्जचे दर २ रु.ने तर एका दिवसाच्या पिलांचे दर १ रु.ने नरमले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील मंदीचा प्रभाव दिसला आहे. 

उन्हाळा आणि तेजीचे सूत्र : गेल्या दोन वर्षांपासून ब्रॉयलर पोल्ट्रीसाठी एप्रिल ते जुलै हा कालावधी सर्वाधिक किफायरी राहत आहे. मागील दोन वर्षांपासून या कालावधी उच्चांकी तापमान राहतेय. परिणामी, ब्रॉयलर पक्ष्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. उच्च तापमानात पक्ष्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, तेव्हढ्या प्रमाणात वजने मिळत नाहीत. पर्यायाने पुरवठा कमी होऊन बाजारभाव उंचावतात.

उन्हाळा आणि गैरसमज : उन्हाळ्यात अंडी आणि चिकन ''गरम'' पडतात. त्यांचे सेवन कमी करावे, असा समज प्रचलित आहेत. तथापि, तापमानवाढीमुळे शरिरातील पोषक घटकांचे व प्रथिनांचे प्रमाण कमी होते. वेगवेगळ्या शास्त्रीय पाहण्यांनुसार उन्हाळ्यात योग्य प्रमाणात पोषक आणि प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे अधिक गरजेचे असते. पोल्ट्री उद्योगाने या दृष्टीने ग्राहकांत जागृती घडवण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com