ब्रॉयलर्सचा बाजार सलग दोन महिने मंदीत

पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन

फेब्रुवारी आणि मार्च हे दोन्ही महिने ब्रॉयलर्स पोल्ट्री उद्योगासाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरले आहेत. तापमानातील बदलांसह विविध कारणांमुळे बाजारभाव सातत्याने उत्पादन खर्चाच्या खाली राहत आहेत.  शनिवारी ता. (२४) रोजी बेंचमार्क नाशिक विभागात ५० रु. प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. गेल्या दीड वर्षांतील नीचांकी बाजारभावाची नोंद झाली आहे. गेल्या संक्रांतपासून बाजारात नरमाई आहे. सुरवातीला बर्ड फ्लू आणि अॅंटिबायोटिक्ससंदर्भातील तथ्यहीन बातम्यांमुळे बाजारात नकारात्मक वातावरण होते. त्यानंतर तापमानातील मोठ्या चढ-उतारांमुळे पॅनिक विक्री होत गेली. लवकर आलेला तीव्र उन्हाळा, परीक्षांचा हंगाम, उत्तर भारतातील चैत्र-नवरात्रीचे उपवास आणि महाराष्ट्रात मागील सलग दोन्ही रविवारी आलेले उपवासाचे सण यामुळे बाजार पार कोलमडला आहे. ब्रॉयलर्सच्या बाजारभावासंदर्भात नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, की नाशिक विभागात बाजार ४४ रु. प्रतिकिलोपर्यंत ढासळला होता. पण, तत्काळ तो ४९ पर्यंत वधारला. ५० रु. प्रतिकिलोच्या आसपास बाजारात चांगली मागणी येते. रविवारी (ता. २५) रोजी रामनवमी आल्यामुळे खप कमी होता. चालू आठवड्यात बाजार ५० रु. च्या आसपास फिरेल. आता बाजारात १० एप्रिलनंतरच सुधारणा होईल, असे दिसते. सध्या संपूर्ण देशात महाराष्ट्रातच सर्वाधिक मंदी असून, अतिरिक्त माल अन्य राज्यांत वळता झाल्यानंतरच महाराष्ट्रातील पुरवठ्याचा दबाव कमी होईल. सध्याच्या मंदीमुळे ओपन फार्मर्स थांबले आहेत. फार थोड्या ओपन फार्मर्सकडे माल उपलब्ध आहे. कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की मागणीच्या अभावामुळे बाजारभाव मंदीत आहेत. गुजरातसह उत्तर भारतातील नवरात्रीचे उपवास सोमवारनंतर (ता. २६) संपतील व त्यानंतर मागणीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. चालू आर्थिक वर्षातील शेवटचे दोन्ही महिने ब्रॉयलर पोल्ट्रीसाठी नुकसानदायक ठरले आहेत. हवामानातील बदलामुळे होणाऱ्या नुकसानीबरोबर बाजारभाव देखील उत्पादन खर्चाखाली होता, असा दुहेरी फटका बसला आहे. एप्रिल महिना तुलनेने बरा असेल, मात्र अतिरिक्त उत्पादनामुळे सरासरी विक्री दर हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असेल, असे दिसते. गेल्या पंधरवड्यांत अंड्याचे भाव २० टक्क्यांनी नरमले आहेत. उन्हाळ्यामुळे घरगुती मागणी घटली आहे. साधारपणे मार्च ते मे या कालावधीत उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे अंड्याचे बाजारभाव उत्पादन खाली असतात. सामान्य मागणीच्या तुलनेत या कालावधीत १५ ते २० टक्क्यांपर्यंत मागणी कमी होत असते. सध्या हॅचिंग एग्ज आणि पिलांचे दर समान पातळीवर आले आहेत. सध्याच्या बाजारभावानुसार किमान आठ रु. अधिकचा दर पिलांना मिळायला हवा. मात्र, ब्रॉयलर्सचा बाजार मंदीत असल्यामुळे पिलांना उठाव नाही. हॅचिंग एग्जचे दर हे देशपातळीवरील मागणीनुसार, तर चिक्सचे दर हे राज्यांतर्गत मागणीनुसार ठरतात. सध्याची मंदी, उन्हाळ्यामुळे पाण्याअभावी घटणारे उत्पादन आदी कारणांमुळे चालू आठवड्यातील प्लेसमेंट ओपन फार्मर्ससाठी सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत उजवी ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

प्रकार     भाव     परिमाण     बाजारपेठ
ब्रॉयलर     ५०     प्रतिकिलो     नाशिक
चिक्स     ३३     प्रतिनग     पुणे
हॅचिंग एग्ज ३२     प्रतिनग     मुंबई
अंडी     ३००     प्रतिशेकडा     पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com