बीटी कापूस सरळ वाणांचा पर्याय उत्तम

बीटी कापूस सरळ वाणांचा पर्याय उत्तम
बीटी कापूस सरळ वाणांचा पर्याय उत्तम

बीटी तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी बिगर बीटी कापूस पिकांवर बोंड अळ्यांच्या (विशेषतः हिरवी अळी) प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला होता. कापूस पिकावर पाते लागण्यापासून प्रत्येक आठवड्यास कीटकनाशकाचा वापर करूनही फायदेशीर व पुरेशे उत्पादन मिळत नव्हते. या पार्श्‍वभूमीवर बीटी तंत्रज्ञानाचा परिपाक म्हणजे कीटकनाशकांच्या वापरावर २००२ पूर्वीच्या तुलनेत घट होऊन उत्पादन वाढले व शेतकऱ्यांच्या दृष्टीने ‘पांढरे सोने’ असणाऱ्या पिकास पुनःश्‍च झळाळी प्राप्त झाली. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा उत्स्फूर्ततेने स्वीकार केल्यामुळे बाजारामध्ये बोंड अळीकरिता जनुकीय बदल केलेल्या विविध स्त्रोतांचे घटक (इव्हेंट) विकसित करण्यात आले. - डॉ. खिजर बेग, अरविंद पांडागळे ----------------------------------------

तक्ता क्रमांक १ प्रमाणे सहा इव्हेंटपैकी MON ५३१ (Cry १ Ac BG १) या इव्हेंटचे क्षेत्र २००६ नंतर कमी होत गेले व त्याऐवजी MON १५९८५ (Cry १ Ac व Cry२Ab BG २) या (इव्हेंटचे) क्षेत्र इतरांपेक्षा सर्वाधिक आहे. सद्यस्थितीमध्ये चाळीसपेक्षा अधिक कंपन्यांचे तीनशेहून अधिक संकरित वाण राज्यातील बाजारात उपलब्ध आहेत. मागील काही वर्षांमध्ये अवर्षण परिस्थिती, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, मजुरीचे वाढते दर इत्यादी कारणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता कमी झाली. त्याचबरोबर वाढता उत्पादन खर्च आणि घटत जाणारी उत्पादकता यामुळे कापूस उत्पादन किफायतशीर होत नसल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव पुढे येत आहेत. लागवडीमध्ये असणारे अनेक संकरित वाण रस शोषण करणाऱ्या किडींना तुलनेने अधिक प्रमाणात बळी पडत आहेत.

बीटी कापसाच्या संकरित वाणांचे बियाणे दरवर्षी बाजारातून विकत घ्यावे लागते. तसेच संकरित बियाण्याचा उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे अधिक किमतीच्या बियाण्यामुळे देखील शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. जगामध्ये जवळपास ८० देशांमध्ये कापूस पिकाची लागवड करण्यात येते. भारत हा एकमेव असा देश आहे, की जेथे मोठ्या प्रमाणात संकरित वाणांचीच लागवड करण्यात येते. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्राझील, चीन इत्यादी विकसित व विकसनशील देशांमध्ये कपाशीच्या अमेरिकन सरळ वाणांचीच लागवड करण्यात येते. सरळ वाणांची सघन लागवड करून या देशांची उत्पादकता भारताच्या उत्पादकतेपेक्षा जास्त आहे.

सरळ वाणांचे फायदे कृषि विद्यापीठे तसेच केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांनी विकसित केलेले कापूस पिकांचे बहुतेक सरळ वाण रस शोषण करणाऱ्या किडींना कमी बळी पडतात.वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताणास सहनशील आहेत. धाग्याचे गुणधर्मदेखील संकरित वाणांच्या तुल्य आहेत. सरळ वाणांचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे यापासून उत्पादीत होणाऱ्या सरकीचा उपयोग पुढील हंगामात बियाणे म्हणून करता येतो.अशा पद्धतीने एकदा शुद्ध बियाणे विकत घेतले, की पुढील तीन वर्षे शेतकरी घरच्या घरी बियाणे म्हणून वापर करू शकतात. बियाण्यासाठी बीटी संकरित वाणांचा एकरी खर्च जवळपास १४०० रुपये होतो तर तोच सरळ वाणांसाठी जवळपास ५०० रुपये प्रति एकर एवढा येईल. कापूस सरळ वाणांचे हे सर्व फायदे असल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील सरळ वाणांमध्ये बीटी जनुक स्थानांतरित करण्याचे भारतीय कृषी संशोधन संस्थेचे प्रयत्न चालू होते.

बीटी जनुकयुक्त कापूस सरळ वाण २००८ मध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषी विज्ञान विद्यापीठ, धारवाड यांच्या संयुक्त भागीदाराने संशोधित Cry१Ac (BNLA ६०१ इव्हेंट) जनुक बी एन १ वाणामध्ये स्थानांतरित करण्यात आले. या सरळ वाणाच्या माध्यमातूनच सार्वजनिक क्षेत्रामार्फत सर्वप्रथम नांदेड ४४ या लोकप्रिय संकरित वाणाचे बीटी संस्करण २००९ मध्ये बाजारामध्ये उपलब्ध करण्यात आले. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे सार्वजनिक क्षेत्रातील या सरळ व संकरित वाणाचे बीटी स्वरुपातील बियाणे त्यानंतर उपलब्ध होऊ शकले नाही.MON ५३१ (Cry१Ac BG १) या इव्हेंटचा स्वामित्व हक्क कालावधी संपल्यामुळे खासगी क्षेत्रामध्ये विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी वापरण्यासाठी खुले झाले.

याचा फायदा घेऊन भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या माध्यमातून केंद्रिय कापूस संशोधन संस्थेने देशातील कृषि विद्यापीठे व सार्वजनिक संस्था यांनी विकसित केलेल्या आशादायक अमेरिकन सरळ वाणांमध्ये BG १ जनुक प्रत्यारोपीत करून त्यापैकी २१ वाणांचे परीक्षण २०१७-१८ मध्ये राष्ट्रीय पातळीवर विविध संशोधन केंद्रावर करण्यात आले. त्यापैकी BG १ स्वरुपातील जनुक प्रत्यारोपीत सहा बीटी कापूस सरळ वाण लागवडीसाठी शिफारस करण्यात आले. यापैकी भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे केंद्रीय कापूस संस्था, नागपूर यांचेकडून जनुक प्रत्यारोपीत करण्यात आलेले जीजेएचव्ही ३७४ बीटी, पीकेव्ही ०८१ बीटी, रजत बीटी, सूरज बीटी, सीआयसीआर ९ बीटी व सीपीटी २ बीटी या सहा सरळ वाणांची महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.

या वाणांच्या बियाण्याचे गुणन करण्यात येत असून, आगामी काळात त्याचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करता येईल. या बीटी वाणांची सघन पद्धतीने लागवड करून किफायतशीर उत्पादन मिळविता येईल. हे सरळ बीटी वाण कमी कालावधीचे असून, आटोपशीर वाढ असणारे आहेत. त्यामुळे सघन पद्धतीने लागवड करून पर्जन्याधारित कोरडवाहू क्षेत्रामध्ये फायदेशीर कापूस उत्पादन घेता येईल. या इव्हेंटमुळे सद्यस्थितीमध्ये हिरवी व ठिपक्‍याची बोंड अळीचा प्रादुर्भाव कापूस पिकावर होणार नाही. हे वाण रस शोषण करणाऱ्या किडींना कमी बळी पडणारे असल्यामुळे पीक संरक्षणावरील खर्च आटोक्‍यात राहील. परंतु, गुलाबी बोंड अळीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे आवश्‍यक राहील. बीटी स्वरुपात उपलब्ध करण्यात येत असलेले हे सर्व सरळ वाण अमेरिकन प्रकारातील आहेत. देशी (बगडा) कापूस हा मूलतः भारतीय उगम असल्यामुळे या प्रजातीच्या वाणांमध्ये बीटी जनुक प्रत्यारोपण न करण्याचे धोरण आहे.

या पार्श्‍वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये Cry १ Ac हा जनुक स्वामित्व हक्क कालावधी संपल्यामुळे विद्यापीठाच्या आशादायक वाणांमध्ये प्रत्यारोपीत करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील हवामानाशी संलग्न बीटी सरळ वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करता येईल. एनएच ६१५, एनएच ६३५, एनएच ५४५, एनएच ४५२ या सरळ वाणांमध्ये आणि एनएचएच २५० व एनएचएच ७१५ या संकरीत वाणांच्या नर व मादी वाणांमध्ये बोलगार्ड १ हे बीटी जनूक प्रत्यारोपणाचे काम प्रगतीपथावर आहे.

सार्वजनिक बीटी संकरित वाण सध्या बाजारामध्ये खासगी क्षेत्रावरील बीटी संकरीत वाण उपलब्ध आहे. बीटी तंत्रज्ञान पुरवठादार कंपन्या स्वामित्व हक्क देऊनही बोलगार्ड तंत्रज्ञान कृषी विद्यापीठांना द्यावयास तयार नाहीत. बीटी तंत्रज्ञान उपलब्ध होण्यापूर्वी लागवडीमध्ये असणारे एनएचएच ४४ सारख्या लोकप्रिय संकरित वाणांमध्ये बीटी संस्करण व्हावे व सदरील बियाणे शेतकऱ्यांना तुलनेने अल्पदरात उपलब्ध करावे, अशी शेतकरीवर्गाची अनेक दिवसांची इच्छा होती. त्यामुळे राज्य बियाणे महामंडळाच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचे स्वामित्व मूल्य देऊन सार्वजनिक क्षेत्रातील संकरित वाणांमध्ये प्रत्यारोपीत करण्याचे कार्य मागील चार-पाच वर्षांपासून चालू आहे.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला (महाबीज) मार्फत एनएचएच ४४ व पीकेव्ही संकर २ हे संकरीत बीटी स्वरुपात उपलब्ध करण्याचे काम झाले असून, चालू हंगामात कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्र, कृषी विज्ञान केंद्र व निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर एनएचएच ४४ बीटी तसेच पीकेव्ही संकर २ या संकरित वाणाच्या प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या कापूस पिकामध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध गुलाबी बोंड अळीमध्ये तयार झालेली प्रतिकारक्षमता आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट होत आहे.

अशा परिस्थितीत बीटी सरळ वाणांचा पर्याय सहज व सुकर राहील. गुलाबी बोंड अळीसाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतींचा अवलंब करून अळींचे व्यवस्थापन करणे अगत्याचे राहील. त्याचबरोबरीने उर्वरीत अळ्यांमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

भारतामध्ये लागवडीसाठी उपलब्ध झालेली विविध बीटी जनुके (इव्हेंट)

 : डॉ. बेग, ७३०४१२७८१० (डॉ. बेग हे कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे कापूस विशेषज्ञ तर पांडागळे सहाय्यक कृषी विद्यावेत्ता आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com