कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा ऐतिहासिक क्षण ः कुलगुरु डॉ. अशोक ढवण

सार्वजनिक क्षेत्रातील बीटी कपाशीचा पहिला वाण असेलल्या नांदेड ४४ बीटी (बीजी २) वाण खसगी कंपन्याच्या वाणांच्या तुलनेत अनेक बाबतींत सरस असल्यामुळे आगामी दशक या वाणाचे असणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे एनएचएच ७१५ आणि एनएचएच २५० हे दोन वाण बीटीमध्ये परावर्तित करण्यासाठी लवकरच महाबीज सोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. - डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वनामकृवि, परभणी.
संकरित कपाशीच्या नांदेड ४४ बीटी (बीजी २) वाणाच्या बियाण्याचे लोकार्पण करण्यात आले
संकरित कपाशीच्या नांदेड ४४ बीटी (बीजी २) वाणाच्या बियाण्याचे लोकार्पण करण्यात आले

परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा संकरित कपाशीचा नांदेड ४४ हा वाण जनकीयदृष्ट्या परावर्तित (बीटीमध्ये) कुरून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देऊन शकलो याबद्दल समाधान आहे. विद्यापीठाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ‘महाबीज’ने या वाणाचे यंदा व्यापक प्रमाणाती बीजोत्पादन कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. बीजोत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठ तयार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठ आणि महाबीज यांच्यातर्फे विकसित करण्यात आलेल्या संकरित कपाशीच्या नांदेड ४४ बीटी (बीजी २) वाणाच्या बियाण्याचे लोकार्पण शनिवारी (ता.१५) करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी डॉ. ढवण होते. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, महाबीजचे महाव्यवस्थापक (उत्पादन) सुरेश पुंडकर, महाव्यवस्थापक (विपणन) प्रकाश टाटर, कापुस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, विभागीय व्यवस्थापक सुरेश गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे आदी उपस्थित होते. 

डॉ. ढवण पुढे म्हणाले, ‘‘अनेक वर्षे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेला कपाशीचा नांदेड ४४ हा वाण बीटी कपाशीच्या लाटेमध्ये लुप्त झाला होता. परंतु बीटीमध्ये परावर्तित करण्यासाठी महाबीजसोबत सामंजस्य करार झाला तेव्हापासून शेतकरी या वाणाच्या बीटी बियाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. शेतकऱ्यांना या वाणाच्या चांगल्या उत्पादनाचा अनुभव असल्यामुळे बीटी बियाण्याची जाहिरात करण्याची गरज नाही. त्यामुळे महाबीजने बियाणे पाकिटाची किंमत करावी.’’

श्री. पुंडकर म्हणाले, ‘‘यंदा नांदेड ४४ बीटी वाणाच्या बियाण्याची २३ हजार पाकिटे मराठवाड्यात उपलब्ध करून देण्यात आली. पुढील वर्षी तीन ते साडेतीन लाख पाकिटे उपलब्ध करून दिले जातील. यंदा राज्यात या वाणांचा प्रायोगिक स्वरूपात बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येईल.

डॉ. वासकर म्हणाले, की तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांच्या प्रयत्नांमुळे नांदेड ४४ हा वाण बीटीमध्ये परावर्तित करण्यासाठी चालना मिळाली. पाच वर्षांच्या चाचण्यानंतर गतवर्षी या वाणाचे कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. बागायती क्षेत्रात हेक्टरी ३८ क्विंटल, तर जिरायती क्षेत्रात हेक्टरी २३ क्विंटल उत्पादन मिळाले.

डॉ. बेग म्हणाले, की या वाणाच्या मादी आणि नर यामध्ये बीटी जीनचा अंतर्भाव आल्यामुळे हा वाण सरस ठरणार आहे. प्रास्ताविक सुरेश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन करून प्रा. अरविंद पंडागळे यांनी आभार मानले. या वेळी शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे पाकिटे वाटप करण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com