‘बीटी’मधील दोष दूर न केल्यास मोठी समस्या : पवार

‘बीटी’मधील दोष दूर न केल्यास मोठी समस्या : पवार
‘बीटी’मधील दोष दूर न केल्यास मोठी समस्या : पवार

पुणे : ‘बीटी’ कापूस वाणांमुळे कापसाचे उत्पादन वाढले आहे. तसेच त्याचे प्रतिकूल परिणामही आता दिसू लागले आहेत. राज्यात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, कापसावर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक नुकसानीत सापडले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी बीटी कापूस वाणांतील दोष तत्काळ दूर करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. अन्यथा कापूस उत्पादकांना भविष्यात आणखी फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल, अशी भीती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

सृष्टी आॅरगॅनिक्स अॅग्रो प्राॅडक्टस अॅँड सर्व्हिसेसच्या (एलएलपी) वतीने सेंद्रिय फळे भाजीपाला व अन्नधान्याच्या थेट विक्री केंद्राचे उद्‍घाटन माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी पवार बोलत होते. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सर्जेराव निमसे, डाॅ. शंकरराव राऊत, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, सृष्टी आॅरगॅनिक्स अॅग्रो प्राॅडक्टस अॅँड सर्व्हिसेसचे संस्थापक श्रीराम पिंगळे, सेंद्रिय शेतीचे सल्लागार यतीन पटवर्धन आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की आज जनुकीयदृष्ट्या सुधारित वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावही वाढला आहे. कपाशीवर फवारणी करताना नुकताच काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. याविषयी कायमस्वरूपी उपाययोजनांची पावले उचलावी लागतील. अन्यथा पुढील वर्षी बीटीच्या वाणाचा मोठा परिणाम होऊन कापूस उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठीच येत्या १७ डिसेंबरला नागपुपात एका बैठकीचे आयोजन केले अाहे.

आरोग्यासाठी सेंद्रिय शेती महत्त्वाची देशातील कोणत्याही राज्यकर्त्यासमोर धान्योत्पादन वाढ करण्याचा मोठा प्रश्न असतो. आज अन्नधान्याची उपलब्धता वाढली आहे. परंतु कीटकनाशकांचा वापरही वाढत असून, त्याचे परिणामही जाणवू लागले आहेत. म्हणून विचार करून काही कार्यक्रम हाती घेतले. त्यामध्ये शेतमालाला भाव वाढून दिले. त्याचा परिणाम एवढा झाला की आज मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. आता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला महत्त्व दिले पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती ही महत्त्वाची आहे. असे असले तरी सेंद्रिय शेतीतून संपूर्ण देशाची गरज लक्षात घेता ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे देश पातळीवर पुरेल एवढे उत्पादन करण्यासाठी चर्चा करून मार्ग काढावा लागेल. सेंद्रिय शेती करताना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी गांडूळखत, शेणखत यांचा वापर वाढावा लागेल. सेंद्रिय शेतमालाच्या विक्रीसाठी पुण्यातील साखर संकुल, मगरपट्टा, नांदेड सिटी येथे येत्या एक ते दीड महिन्यात विक्री केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे विक्रीची काही प्रमाणात समस्या सुटेल. याशिवाय आणखी काही ठिकाणीही जागा उपलब्ध करून केंद्र सुरू केले जातील. अनेक ठिकाणी शेतकरीही प्रयत्न करत आहेत.

ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन घ्यावे लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सर्जेराव निमसे म्हणाले, रासायनिक खतांच्या वापरामुळे कर्करोग वाढत असल्याचा नुकताच अहवाल आला आहे. त्यामुळे सेंद्रिय भाजीपाल्याचे महत्त्व वाढत आहे. परदेशांतही सेंद्रिय भाजीपाल्याचे महत्त्व अधिक आहे. आपल्याकडे सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन करताना अनेक अडचणी आहेत. परंतु शेतकऱ्यांनी कमी होत असलेल्या शेती क्षेत्रामुळे घरच्याघरी सेंद्रिय खते उपलब्ध करून त्याचा वापर करण्याची गरज आहे. सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन घेताना चांगल्या ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्याचे उत्पादन घ्यावे.

सेंद्रिय शेतीचे संयुक्तपणे मार्केटिंग हिताचे सेंद्रिय शेतीबाबत सध्या लोकांच्या गरजा व अपेक्षा वाढत आहेत. त्यांची खरेदी करण्याची क्षमता सुधारली पाहिजे. सेंद्रिय शेतमालसाठी चांगल्या व्यक्तींनी पुढे येऊन विक्री केंद्र उभे करण्याची गरज आहे. सेंद्रिय शेतमालाचा एकच ब्रँड तयार करावा लागेल. ब्रँड तयार केल्यामुळे उत्पादकांना रास्त दर मिळून ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचा माल मिळेल. देशात आणि परदेशांत कुठेही या मालाची विक्री करता येईल. शेतकरी गट व कंपन्यांनी एकत्र येऊन सेंद्रिय शेतीचे मार्केटिंग संयुक्तपणे केल्यास शेतमाल विक्रीच्या समस्या कमी होतील. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात तुषार काकडे यांनी प्रास्तविक केले व आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com